मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांवर केलेले आरोप, त्याला विविध घटकांकडून होत असलेला विरोध, स्थानिक भाजप नेत्यांचा असहकार, आमदार रवी राणांचे हुकलेले मंत्रीपद, विरोधकांचे एकजुटीचे प्रयत्न यामुळे राणा दाम्पत्याची राजकीय कोंडी झाल्याचे चित्र आहे.

येथील एक तरूणी रागाच्या भरात घरातून निघून गेल्यानंतर या घटनेचा संबंध ‘लव्ह जिहाद’शी जोडून नवनीत राणा, भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस ठाण्यात घातलेला गोंधळ चांगलाच गाजला. ती तरूणी सातारा येथे सुखरूप सापडल्यानंतर नवनीत राणा तोंडघशी पडल्या. भाजपनेही या प्रकरणातून अलगद अंग काढून घेतले. पोलिसांवर केलेल्या आरोपांमुळे नवनीत राणांवर आता चहुबाजूंनी टीका होऊ लागली आहे. अनेक संघटना राणांच्या विरोधात एकवटल्या आहेत. बेपत्ता झालेल्या तरूणीच्या आईला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आपण केल्याचा राणा यांचा दावा असला, तरी त्या तरूणीच्या तसेच संशयित अल्पसंख्याक समुदायातील युवकाच्या झालेल्या बदनामीचे काय, हा प्रश्न चर्चेत आला.

हेही वाचा… Gyanvapi Mosque : न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेससह विरोधकांचे मौन; कारण काय?

प्रसिद्धीचा हव्यास आणि श्रेय घेण्याची धडपड यामुळे राणा दाम्पत्यावर यापूर्वीही टीका होत आली आहे. हनुमान चालिसा पठण प्रकरणात त्यांना राष्ट्रीय माध्यमांमधून प्रसिद्धी मिळाली खरी, पण त्यांच्या आरोपसत्रामुळे भाजपची चांगलीच अडचण होऊ लागली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांची सत्ता आहे. आता कायदा व‍ सुव्यवस्थेचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत आहे. राणा दाम्पत्याच्या आक्रमक शैलीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याची एकही संधी राणा दाम्पत्याने सोडलेली नाही. सहा महिन्यांपूर्वी राजापेठ उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ महापालिका आयुक्तांच्या अंगावरराणा यांच्या समर्थकांनी शाई फेकली. राणांसह अकरा कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. हे सर्व उद्धव ठाकरे यांच्या आदेशांवरून पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केले, असा आरोप त्यावेळी राणांनी केला होता. त्यांनी पोलीस आयुक्तांवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले आहेत. गणपती विसर्जनानंतर पोलीस आयुक्तांची बदली होईल, असा दावाही त्यांनी केला. हा थेट गृहमंत्रालयाच्या कारभारात हस्तक्षेप असल्याचे आता बोलले जात आहे. पोलीस आयुक्तांनी वसुली पथक नेमून महिन्याला सात कोटी रुपये उद्धव ठाकरेंकडे पोहचवल्याचा आरोप राणांनी केला, पण या प्रकरणाची सीआयडी चौकशी होत असल्याची थाप भाजप कार्यकर्त्यांनाही रुचलेली नाही.

हेही वाचा… सोलापुरातील ‘सुशील’ शिंदेशाही संपवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे- भाजपच्या आक्रमक चाली

राणा दाम्पत्याच्या राजकीय महत्वाकांक्षेने स्पर्धात्मक राजकारणाला जिल्ह्यात बळ मिळाले असले, तरी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. राणा दाम्पत्याने गेल्या अडीच वर्षांत हिंदुत्वाच्या दिशेने केलेला प्रवास हा त्यांच्या परंपरागत मतदारांसाठी देखील अनाकलनीय ठरला आहे. अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा हे दोघेही सत्तापक्षात आहेत. पण, त्यांच्यातील वितुष्ट जगजाहीर आहे. दोघेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. राणा त्यांच्या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करीत आहेत. पण, आगामी महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांची सत्वपरीक्षा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilemma of navneet rana and ravi rana in the politics of criticism print politics news asj
First published on: 14-09-2022 at 11:38 IST