Sardarji Movie ban in India: गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ याने सरदार-३ या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानियासोबत काम केल्याने भारतातून त्याला तीव्र विरोध झाला. या वादावरून दिलजीत याचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनीही भारतात हा चित्रपट प्रदर्शित केला नाही. दुसरीकडे पाकिस्तानात हा चित्रपट प्रदर्शित केल्यावर त्याची बक्कळ कमाई होत आहे. लुधियानाची पोटनिवडणूक आम आदमी पक्षाने जिंकल्यानंतर काँग्रेस आणि भाजपाला धक्का दिला होता. मात्र, आता दिलजीत दोसांझच्या निमित्ताने हे तिन्ही पक्ष एकाच मुद्द्यावर बोलताना दिसत आहेत. य तिन्ही पक्षांतील शीख नेत्यांनी दलजीतला दिली गेलेली वागणूक ही अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.
दिलजीतच्या चित्रपटावरून वाद सुरू झाल्यावर भाजपा नेते सर्वांत आधी त्याच्या बचावासाठी सरसावले होते. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत काम केल्यामुळे दिलजीतवर बंदी जाहीर करत त्याचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आर. पी. सिंग यांनी म्हटले होते, “दिलजीत हा केवळ एक प्रसिद्ध कलाकारच नाही, तर तो या देशातला एक महत्त्वाचा आणि मौल्यवान नागरिक आहे. भारतीय संस्कृती तो राजदूत आहे. राग असेलच, तर चित्रपटावर बहिष्कार टाकून किंवा प्रदर्शित न करून तो व्यक्त करावा. मात्र, दिलजीतच्या देशभक्तीवर हल्ला करणे आणि अशी टोकाची भूमिका मांडणे हे केवळ अविवेकी आहे.”
केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी याआधी दिलजीतवर टीका केली होती. ते आता म्हणाले, “जगभरात पंजाब आणि पगडीचे नाव कमावणाऱ्या अशा व्यक्तीला आपण बदनाम का करावे किंवा त्याचे नुकसान का करावे? पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करून, तो पाकिस्तानी झाला आहे का? हा एक विनाकारणचा वाद आहे.”
भाजपानंतर आता काँग्रेसकडूनही दिलजीतचे समर्थन होऊ लागले आहे. आतापर्यंत काँग्रेसने या मुद्द्यावर मौन बाळगले होते. कारण- त्यांना बहुधा उजव्या विचारसरणीच्या देशविरोधी प्रत्युत्तराची भीती असावी. एका निवेदनात काँग्रेसचे विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा म्हणाले, “दिलजीत दोसांझ भारतीय आणि पंजाबी संस्कृतीला कोची आणि मेट गालासारख्या जागतिक व्यासपीठावर घेऊन गेला आहे. आपण आपल्या देशातील कलाकारांचा आदर करायला हवा.”
आप नेते व पंजाब विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंग संधवान यांनी म्हटले, “दिलजीत दोसांझ यांनी भारतात आणि परदेशात पंजाबी भाषेला ओळख मिळवून दिली. कलाकार आणि लेखक हे सर्वांचेच आहेत. दिलजीतला विरोध करणारे कला आणि कलाकारांमध्ये द्वेषाची भिंत निर्माण करू पाहत आहेत. जोवर माणुसकी प्रेमावर विश्वास ठेवते, तोवर हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही.”
पहलगाम दहशतवादी हल्ल्याआधीच या चित्रपट पूर्ण झाल्याचे निर्मात्यांनी सांगितले. हीच भूमिका निर्मात्यांपैकी एक असलेल्या दिलजीतनेही घेतली होती. चित्रपटाचे आणखी एक सहनिर्माते गुणबीर सिंग सिद्धू यांनी सांगितले, “भारतात चित्रपट प्रदर्शित न केल्याने सुमारे ४० टक्के कमाई कमी होण्याचा धोका आहे. मात्र, कोणाच्याही भावना दुखवल्या जाऊ नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला.”
ठळक मुद्दे:
- ‘सरदारजी ३’ चित्रपटामुळे दिलजीत दोसांझ ट्रोलर्सच्या निशाण्यावर
- पाकिस्तानी अभिनेत्री हानिया त्याच्यासह या चित्रपटात मुख्य भूमिकेत
- पहलगाम हल्ल्यानंतर सर्व पाकिस्तानी कलाकारांच्या अकाउंटवर भारतात बंदी आणण्यात आली
- अभिनेत्री वाणी कपूर व पाकिस्तानी अभिनेता फावद खानची मुख्य भूमिका असलेला ‘अबीर गुलाल’ हा चित्रपटही त्यावेळी चर्चेत होता
प्रदर्शनानंतर अजून तरी चित्रपटात काही अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आलेले नाही. कारण- हा चित्रपट पाकिस्तानात सुपरहिट होण्याच्या मार्गावर आहे. दिलजीतसाठी बोलणाऱ्या सर्व शीख राजकीय नेत्यांनी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याची परवानगी देण्याची मागणी मात्र केलेली नाही. पंजाबी चित्रपट उद्योगावर यामुळे परिणाम होईल, अशी चिंता निर्माण झाली आहे. सुमारे एक दशकापासून पंजाबी चित्रपट भारत-पाक संबंधांच्या चढ-उतारांना पार करण्यात यशस्वी झाले आहेत. पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या इतर पंजाबी चित्रपटांपाठोपाठ सरदारजी-३ देखील पाकिस्तानात प्रदर्शित झाला. २०१६ पासून पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शन व प्रसारणावर बंदी असूनही पाकिस्तानमध्ये या चित्रपटांना भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने याआधी दिले आहे.
दिलजीत याच्यासाठी वाद अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २०२० मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरुद्धच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिलजीतने उघडपणे पाठिंबा दिला होता. याच मुद्द्यावर त्याचा भाजपा खासदार कंगना रनौत यांच्याशी वाद झाला होता. दिलजीतच्या या भूमिका स्पष्टपणे भाजपाविरोधी मानल्या जात असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या शेवटी दिलजीतने त्यांना भेटण्यासाठी येऊन अनेकांना आश्चर्यचकित केले. या भेटीनंतर पंतप्रधानांनी दिलजीतचे कौतुकही केले होते. या बैठकीमुळे मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांच्या जीवनावर आधारित दिलजीतच्या आगामी चित्रपटाचा मार्ग मोकळा सुरळीत होऊ शकतो. तसेच पंजाब ९५ हा चित्रपटही गेल्या तीन वर्षांपासून सेन्सॉर बोर्डाकडे अडकला आहे