scorecardresearch

कल्याणच्या अदलाबदलीच्या चर्चेने भाजपमध्ये अस्वस्थता

सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले गणपत गायकवाड कमालीचे अस्वस्थ झाले असून थेट मुख्यमंत्री पिता-पुत्रांवर त्यांनी सुरू केलेले शाब्दिक हल्ले त्यामुळे चर्चेत आले आहेत.

Discomfort in BJP over kalyan
कल्याणच्या अदलाबदलीच्या चर्चेने भाजपमध्ये अस्वस्थता (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत यांच्याकडून भाजपची मुस्कटदाबी सुरू आहे, असा जाहीर आरोप करत चर्चेत आलेले कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या आक्रमकतेमागील खरे कारण काय याविषयीची जाहीर चर्चा सध्या ठाणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

कल्याण पूर्व हा खासदार शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. आपल्या समर्थकाला येथून उमेदवारी मिळावी यासाठी खासदार आग्रही असल्याची चर्चा असून लगतच असलेला कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपला तर पूर्व शिंदे गटाला असे नवे समिकरण जुळविण्याचे प्रयत्नही सुरू झाल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले गणपत गायकवाड कमालीचे अस्वस्थ झाले असून थेट मुख्यमंत्री पिता-पुत्रांवर त्यांनी सुरू केलेले शाब्दिक हल्ले त्यामुळे चर्चेत आले आहेत.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

हेही वाचा – मराठवाडा पॅकेजचा महायुतीला फायदा किती?

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्वात बकाल आणि समस्याग्रस्त विधानसभा क्षेत्र म्हणून कल्याण पूर्वची ओळख आहे. २००९ मध्ये येथून गणपत गायकवाड अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून गेले. या भागातील मातब्बर नेते पुंडलिक म्हात्रे यांचा त्यांनी केलेला पराभव त्यावेळी गाजला होता. गायकवाड हे मुळचे केबल व्यावसायिक. त्यावेळी सर्वसामान्यांचे मनोरंजनाचे एकमेव साधन म्हणून ‘केबल’ टिव्हीकडे पाहिले जात असे. सलग पाच वर्षं मतदारसंघात फुकट केबल जोडण्या देऊन गायकवाड प्रसिद्धीच्या झोतात राहिले. पुढेही त्यांनी हा शिरस्ता कायम ठेवला. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या आघाड्यावर उघड्यावर पडलेला हा मतदारसंघ फुकट केबलच्या तारांवरून गायकवाडांना विधानसभेत पाठवित राहिला. २०१४ मध्ये गायकवाड भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून लढले आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासमोर जेमतेम दोन हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. हा पराभव एकनाथ शिंदे यांच्या जिव्हारी लागला. महापालिका हद्दीत शिवसेनेची सद्दी तसेच पूर्वेत शिवसेनेचे जादा नगरसेवक, असे असताना विधानसभेत मात्र गायकवाड निवडून जात असल्याने शिंदे पिता-पुत्र कायम अस्वस्थ राहिल्याचे पहायला मिळते.

पुन्हा गायकवाड यांचा पिंड तसा आक्रमक असल्याने शिंदे पिता-पुत्रांना कुर्निसात घालण्याचा त्यांचा स्वभाव नाही. तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांचे ते कट्टर समर्थक. पुढे बदललेल्या राजकीय गणितात त्यांनी आपल्या निष्ठा देवेंद्र फडणवीस यांच्या चरणी अर्पण केल्या. याचा फटका त्यांना काही प्रमाणात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसला. त्यांच्याविरोधात शिवसेनेने धनजंय बोडारे या ज्येष्ठ नगरसेवकाला अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले. बोराडे हे खासदार शिंदे यांचे निष्ठावंत. गायकवाड यांच्या पराभवासाठी बोडारे तन, मन, धनाने आणि शिंदेकृपेने रिंगणात उतरले खरे, मात्र त्यांचा टिकाव लागला नाही. तेव्हापासून गायकवाड आणि शिंदे यांच्यातील दरी आणखी वाढली.

कल्याणची अदलाबदल?

सलग तीन वेळा निवडून आल्यानंतरही युतीच्या राजकारणात मानेवर सतत टांगती तलवार असल्याने आमदार गायकवाड कमालीचे अस्वस्थ आहेत. लगतच असलेला कल्याण पश्चिमेचा मतदारसंघ पाच वर्षांपूर्वी युतीच्या राजकारणात भाजपकडून शिवसेनेकडे आला. २०१४ मध्ये भाजपच्या नरेंद्र पवार यांनी शिवसेनेचा येथून पराभव केला होता. २०१९ मध्ये मात्र युतीच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आणला. नाराज झालेले नरेंद्र पवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरले मात्र विश्वनाथ भोईर यांच्यापुढे त्यांची डाळ शिजली नाही. विद्यमान आमदार भोईर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. असे असले तरी भोईर यांची बंडखोरी येथील निष्ठावंत शिवसैनिकांना रुचलेली नाही. या पार्शभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून नरेंद्र पवार आपल्याला उमेदवारी मिळाली अशा थाटात कामाला लागले आहेत. जणू काही उद्या विधानसभेच्या निवडणुका आहेत अशापद्धतीने त्यांचा झंझावती प्रचार सुरू झाला आहे. हे पाहून शिंदे गटात अस्वस्थता आहेच शिवाय लगतच गायकवाडदेखील संभ्रमात आहेत. कल्याण पश्चिमेच्या बदल्यात शिंदे पिता-पुत्र पtर्व मतदारसंघ मागून घेतील आणि तेथून महेश गायकवाड या त्यांच्या समर्थकाला रिंगणात उतरवतील अशी जाहीर चर्चा सुरू झाली आहे. भिवंडीचे खासदार तसेच केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनीही पवार यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

हेही वाचा – उरणच्या राजकारणाचा रंगतदार प्रवास

दुसरे गायकवाड सज्ज

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात खासदार शिंदे यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड हेदेखील उमेदवारी मिळाल्यासारखे कामाला लागले आहेत. खासदार शिंदेंचे भक्कम पाठबळ असल्याशिवाय महेश गायकवाड एवढे आक्रमक होऊन कामे करू शकत नाहीत याची जाणीव गायकवाड यांनाही आहे. त्यामुळे थेट मुख्यमंत्री पिता-पुत्रांविरोधात जाहीर वक्तव्य करण्याचा धडाकाच गणपत गायकवाडांनी लावला असून पुर्व-पश्चिमेतील ही लढाई येत्या काळात रंगतदार ठरण्याची चिन्हे आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2023 at 15:11 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×