गेहलोत-पायलट ही खरगेंची डोकेदुखी, वादावर तोडगा हे पहिले मोठे आव्हान | dispute between Ashok gehlot and sachin pilot, to resolve matter is big challenges ahead of Mallikarjun Kharge | Loksatta

गेहलोत-पायलट ही खरगेंची डोकेदुखी, वादावर तोडगा हे पहिले मोठे आव्हान

गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद ‘भारत जोडो’ यात्रेवर विपरित परिणाम करेल अशी भीती काँग्रेसला वाटू लागली आहे. गेहलोत यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पायलट यांना ‘गद्दार’ असे म्हणत थेट अपमान केला आहे.

गेहलोत-पायलट ही खरगेंची डोकेदुखी, वादावर तोडगा हे पहिले मोठे आव्हान
गेहलोत-पायलट ही खरगेंची डोकेदुखी, वादावर तोडगा हे पहिले मोठे आव्हान

महेश सरलष्कर

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा राजस्थानमध्ये येण्याआधीच मुख्यमंत्री अशोक गेहलोत व मुख्यमंत्रीपदाचे स्पर्धक सचिन पायलट यांच्यामधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. या वादावर तोडगा काढणे हे मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी पक्षाध्यक्ष म्हणून पहिले मोठे आव्हान ठरले आहे.

गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद ‘भारत जोडो’ यात्रेवर विपरित परिणाम करेल अशी भीती काँग्रेसला वाटू लागली आहे. गेहलोत यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पायलट यांना ‘गद्दार’ असे म्हणत थेट अपमान केला आहे. भाजपच्या कच्छपी लागलेल्या नेत्याला राजस्थानचे मुख्यमंत्रीपद देता येणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. गेहलोत यांची ही आक्रमक भूमिका म्हणजे गांधी कुटुंबाच्या नेतृत्वाला दुसऱ्यांदा दिलेले आव्हान मानले जात आहे! त्यामुळेच काँग्रेसच्या वतीने पक्षाध्यक्ष खरगे वा अन्य नेत्यांकडून राजस्थानमधील सत्तासंघर्षावर अजून तरी भाष्य करण्यात आलेले नाही. काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी संक्षिप्त निवेदन प्रसिद्ध केले असून, ‘भारत जोडो यात्रेला प्रचंड यश मिळाले असून यात्रा उत्तर भारतातही तितकीच यशस्वी करणे हीच आत्ताच्या घडीला प्रत्येक काँग्रेसवासीची जबाबदारी असली पाहिजे’, असे म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये ‘भारत जोडो’ यात्रेला अभूतपूर्व यश मिळाले होते. आत्ता ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये असून त्यानंतर तिचा प्रवास १४ दिवस राजस्थानमधून होणार आहे. राजस्थानमधील दोन बलाढ्य नेत्यांच्या राजकीय रस्सीखेचीत यात्रेच्या आयोजनावर परिणाम होऊ नये, याची दक्षता काँग्रेसला घ्यावी लागत आहे.

हेही वाचा… राहुल यांची शेगाव सभा विक्रमी, पण जनमानसावर परिणाम किती ?

काँग्रेसचे नवनियुक्त पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना गेहलोत व पायलट यांच्यातील संघर्षावर तोडगा काढावा लागणार आहे. पक्षाध्यक्ष म्हणून खरगे यांनी राजस्थानच्या प्रभारीपदाचा अजय माकन यांचा राजीनामा स्वीकारला असला तरी, मूळ समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष सल्ला-मसलत केलेली नाही. खरगे यांनी पक्षाध्यक्ष झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या जागी सुकाणू समिती स्थापन केली. या सुकाणू समितीची ४ डिसेंबर रोजी दिल्लीत बैठक होणार असून पक्षांतर्गत अन्य मुद्द्यांपेक्षा गेहलोत-पायलट वादावर खरगेंना या बैठकीत वरिष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागणार आहे. गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पायलट यांनी बंडखोरी करून राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. गुरुग्राममधील पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून त्यांनी भाजपशी संधान बांधले होते. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही पायलट यांच्या संपर्कात होते. केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान हॉटेलमध्ये जाऊन पायलट यांची भेट घेत होते. राजस्थानमधील काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न झाला होता व त्याचे पुरावेही आहेत, असे अनेक आरोप गेहलोत यांनी मुलाखतीमध्ये केले आहेत.

हेही वाचा… महेश लांडगे : क्रीडाप्रेमी आमदार

खरगेंनी पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवरी अर्ज भरण्याआधी गेहलोत हे पक्षाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत होते. मात्र, पक्षाध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्रीपद पायलट यांच्याकडे सुपूर्द करण्याची रणनिती काँग्रेसच्या नेतृत्वाने आखली होती. त्यासाठी तत्कालीन राज्य प्रभारी अजय माकन यांना राजस्थानला पाठवण्यात आले होते व त्यांनी पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली होती. माकन यांची कृती दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाच्या सूचनेनुसार झाल्याची चर्चा रंगली होती. पण, जयपूरमध्ये बोलवलेली बैठक आमदारांनी पाठ फिरवल्यामुळे ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की माकन यांच्यावर ओढवली होती. ही बैठक रद्द होणे, हे गेहलोत यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिलेले पहिले आव्हान होते. माकन यांना राजस्थानमध्ये पाठवण्याची खेळी यशस्वी न झाल्याने गेहलोत व पायलट यांच्यातील वाद उग्र बनला. आता भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने या वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. गुर्जर समाजाच्या नेत्याला (सचिन पायलट) मुख्यमंत्री केले नाही तर, भारत जोडो यात्रेमध्ये अडथळे आणण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर, गेहलोत हे पायलट यांच्याविरोधात पुन्हा आक्रमक झाले आहेत. हा वाद आणखी विकोपाला जाऊ नये, यासाठी काँग्रेसकडून तूर्तास सबुरी दाखवली जात आहे. ‘अशोक गेहलोत हे ज्येष्ठ आणि अनुभवी राजकीय नेते आहेत. त्यांचे सचिन पायलट यांच्याशी असलेले मतभेद योग्य पद्धतीने सोडवले जातील. त्यातून काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल असे प्रयत्न केले जातील’, असे जयराम रमेश यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 11:24 IST
Next Story
राहुल यांची शेगाव सभा विक्रमी, पण जनमानसावर परिणाम किती ?