राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभेसाठी उमेदवार प्रशांत यादव यांना शिवसेना शिंदे गटाने मोठी ऑफर देऊ केली आहे. तरी त्यांना प्रवेश देण्यावरून शिवसेना शिंदे गट आणि नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन महायुतीमधील पक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी प्रशांत यादव यांना महायुतीत घेण्यास नकार दिल्याने शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना शिवसेना शिंदे गटात घेतले आहे. आता शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील काही पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात येण्यासाठी गळ घालू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार गटाचे प्रशांत यादव यांच्याशी गाठीभेटी वाढवल्या आहेत.
प्रशांत यादव यांच्या वाशिष्टी डेअरी नावाच्या प्रकल्पाला वारंवार शिंदे गटाचे नेते भेटी देऊ लागले आहेत. प्रशांत जाधव यांना शिंदे गटात घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठी ऑफर देऊ केली आहे. यादव यांच्या पक्षप्रवेशावरुन महायुतीतील सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चांगलाच नाराज झाला आहे. अजित पवार गट आणि शिंदे गट या प्रकारामुळे आता एकमेकाला पाण्यात बघू लागला आहे.
सत्ताधारी या दोन्ही पक्षांमध्ये वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली असताना, महायुतीतील प्रमुख नेत्यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाचे नेते व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशांत यादव यांना शिंदे गटात घेण्यासाठी मोठा जोर लावला आहे. यादव यांच्या प्रवेशासाठी उदय सामंत यांचे बंधू आमदार किरण सामंत यांनी याआधीच प्रशांत यादव यांना भेट घेऊन शिवसेनेत येण्याची ऑफर केली होती.
यानंतर काही दिवसातच पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशांत यादव यांच्या वाशिष्टी डेअरीला सदिच्छा भेट दिली. या भेटीमागील नेमके कारण पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले होते. यावेळी उदय सामंत यांनी प्रशांत यादव यांना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली असल्याचे जाहीर केले.
शिवसेना शिंदे गटाच्या या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्यासह काही नेत्यांनी प्रशांत यादव यांना महायुतीत घेण्यास नकार दिला आहे. यावरून सत्ताधारी या दोन पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाला डिवचण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटांनीच पहिले केले असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले आहे. प्रशांत यादव यांच्या पक्षप्रवेशाने या दोन पक्षातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता जिल्ह्यातून वर्तवली जात आहे.
यापूर्वी शिवसेना ठाकरे गटात असलेले अजित यशवंतराव यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंतर त्यांनी शिवसेनेची वाट धरली होती. परंतु आता त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. मात्र हा त्यांचा प्रवेश शिवसेने शिंदे गटाला डिवचण्यासाठी केला गेला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या सर्वांचा वचपा काढण्यासाठी प्रशांत यादव यांना शिवसेनेत घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत मोठा खटाटोप करत आहेत असे चर्चिले जात आहे. प्रशांत यादव यांच्या शिवसेना प्रवेशाने महायुतीतील या दोन पक्षांमध्ये चांगलीच जुंपणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
अजित यशवंतराव यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला डिवचण्याचे काम केले आहे. त्यामुळे सुरुवात त्यांनी केली आहे. त्याचा शेवट शिवसेनेकडून आम्ही करणार आहोत. आमच्या पक्षात घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला नाराज होण्याचे कोणतेच कारण नाही.
– पालकमंत्री उदय सामंत