प्रबोध देशपांडे

अकोला जिल्हा भाजप दोन गटात विभागली गेली. प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्त झाल्यानंतर प्रथमच अकोल्याच्या दौऱ्यावर आलेले आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर जिल्हा भाजपतील गटबाजी उघड झाली. पक्षाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना पक्षांच्या फलकावर कुठेही स्थान देण्यात आले नाही. पक्ष प्रवेशाच्या जाहीर कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी त्यांचा नामोल्लेख देखील टाळला. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आली असतांना डॉ. रणजीत पाटील जिल्ह्यात पक्षपातळीवर एकाकी पडल्याचे चित्र आहे.

भाजपचा बालेकिल्ला म्हणून अकोला जिल्ह्याची ओळख आहे. गेल्या दोन दशकांमध्ये जिल्ह्यात भाजप पक्षाचा झपाट्याने विस्तार झाला. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचपैकी चार जागांवर भाजपचा झेंडा फडकला, बाळापूरची एकमेव जागा देखील भाजपसोबतच्या युतीमध्ये शिवसेनेने जिंकली. एकेकाळी शिवसेनेचा गड असलेला विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर देखील भाजपने ताबा मिळवला. जिल्ह्यात भाजपचे एक खासदार, तर सहा आमदार आहेत. अकोला जिल्हा परिषद वगळता सर्वत्र भाजपचा दबदबा दिसून येतो. गत दोन दशकांपासून जिल्ह्यातील पक्षाचे एकछत्री नेतृत्व माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे यांच्याकडे आहे. पदवीधर मतदारसंघात डॉ. रणजीत पाटील निवडून आल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र मतभेद होऊन पक्षात दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटाकडून शह-काटशहाचे राजकारण सुरू असते. अकोला भाजपमधील गटबाजी ही उघड गुपित आहे. पक्षाच्या वरिष्ठांना देखील याची चांगलीच कल्पना आहे.

दोन्ही गटाकडून वारंवार तक्रारी झाल्यानंतरही वरिष्ठ पातळीवर त्याची फारशी दखल घेण्यात आलेली नाही.जिल्ह्यात धोत्रे गटाचे प्राबल्य असून सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते भक्कमपणे त्यांच्या बाजूने आहेत. गृहराज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देत देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. रणजीत पाटील यांना बळ दिले होते. मात्र, तरीही पक्ष संघटनेतील धोत्रे गटातील वर्चस्वाला धक्का लागला नाही. डॉ. पाटील पालकमंत्री असतांना त्यांच्या कार्यपद्धतीवर खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांनी अनेकवेळा आक्षेप घेऊन जाहीर नाराजी व्यक्त केली. पक्षातील गटबाजी वारंवार चव्हाट्यावर आली. भाजपमधील मतभेदाची दरी मिटण्याऐवजी ती दिवसेंदिवस अधिकच रुंद होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खा. संजय धोत्रे प्रकृती अस्वस्थेमुळे सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यांच्या गैरहजेरीत पक्षाची धुरा जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर समर्थपणे पेलत आहेत. त्यांचा शब्द पक्षात प्रमाण मानला जाते.

आ. रणधीर सावरकर व डॉ.रणजीत पाटील यांच्यात विस्तव देखील जात नाही. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे आमदार म्हणून डॉ. रणजीत पाटील यांची पक्षपातळीवर दखलही घेतली जात नसल्याचे वारंवार दिसून येते. त्याचाच प्रत्यय माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या भाजप प्रवेश सोहळ्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाच्या फलकावर आमदार डॉ. रणजीत पाटील यांना स्थान देण्यात आले नाही. जिल्ह्यातील आमदारांसह आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे देखील छायाचित्र त्या फलकांवर झळकले होते. कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असतांनाही डॉ. रणजीत पाटील यांचे नाव घेण्याचे सुद्धा टाळले. कार्यक्रमाचे आयोजक व पक्षात नव्याने आलेले बळीराम सिरस्कार यांनी देखील डॉ. पाटील यांना महत्त्व दिले नाही. यावरून पक्षातील गटबाजी अत्यंत टोकाला गेल्याचे अधोरेखित होते.

प्रदेशाध्यक्षांकडून दोन्ही गटाला गोंजारण्याचा प्रयत्न

भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यातील भाजपच्या दोन्ही गटाला गोंजारण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या जाहीर कार्यक्रमामध्ये आ.बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्ष आ.रणधीर सावरकर यांच्या कार्यपद्धती व नेतृत्व गुणावर कौतुक वर्षाव केला. त्यानंतर रात्री डॉ. रणजीत पाटील यांच्या निवासस्थानी आ.बावनकुळे यांनी भेट दिली.