रत्नागिरी : रत्नागिरीतील सडामिऱ्या आणि जाकिमिऱ्या या गावांतील भाग राज्य शासनाने औदयोगिक क्षेत्राचा जाहीर केल्याने महायुतीतील सत्ताधारी पक्षाच्या आजी – माजी आमदारांमध्ये वाद पेटला आहे. हा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. राज्य शासनाच्या उद्योगमंत्र्यांनी उद्योग विकास वाढीसाठी भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांच्या मिऱ्या गावाचीच निवड केली आहे. येथील खाजगी जमिनी औदयोगिक क्षेत्रासाठी जाहीर केल्याने या वादाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी मिऱ्या येथील खाजगी क्षेत्र शासनाने औदयोगिक क्षेत्राचा जाहीर केल्याने याचा भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी जाहीर निषेध केला आहे. शिवसेना आमदार उदय सामंत आणि भाजपाचे माजी आमदार यांच्यातील वाद हा वर्षानुवर्ष चालत आला आहे.

बाळ माने यांना सलग चार वेळा विधानसभेत हरविल्याने हे दोन्ही आजी माजी आमदार एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. आता तर या औद्योगिक क्षेत्राची घोषणा करुन माजी आमदार बाळ माने यांना डिवचल्या सारखे झाले आहे. शासनाच्या मिऱ्या गावातील औद्योगिक क्षेत्राला खाजगी जमिनी देण्यास येथील स्थानिकांचा विरोध असताना हा भाग औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहिर केल्याने भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांचा रोष महायुतीला सहन करावा लागणार आहे. सत्ताधारी भाजपचे माजी आमदार असतानाही माने यांनी सरकारचा निषेध केल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा…महाराष्ट्र आणि हरियाणात जातीच्या पगड्याचा समान धागा, कोणाला फटका बसणार ?

उदय सामंत हे उद्योगमंत्री असल्याने त्यांनी जाणून बुजून बाळ मानेंना डिवचले असल्याचा स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.
राज्य शासनाने औद्योगिक क्षेत्र जाहीर केल्याने स्थानिकांकडून विरोध करण्यात आला आहे. याविषयी दोन्ही ग्रामपंचायती या निर्णया विरोधात तसा ठराव ही करणार असल्याचे समजते. दरम्यान सरकार आपलं असलं तरी आपण लोकांच्या सोबत असल्याचे बाळ माने यांनी म्हटले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या या निर्णयाचा फटका महायुतीलाच बसण्याची भीती भाजपने नेते व्यक्त करीत आहेत. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाचे रत्नागिरीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रत्नागिरीच्या पारंपारिक मतदार संघावर दावा केल्याने या दोन पक्षातील वाद आता आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे.