कर्नाटकात काँग्रेसने नेतृत्वबदल घडवून आणण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. काँग्रेस नेते दोड्डलाहल्ली केंपेगौडा अर्थात डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद देण्याची तयारी काँग्रेसने पूर्ण केली आहे. विनाअडथळा ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. दरम्यान, काँग्रेसच्या या रणनीतीमुळे भाजपा व एनडीएला कर्नाटकसाठी केलेले पूर्वनियोजन व रणनीति बदलावी लागणार आहे. कर्नाटकात भाजपाला प्रदेशाध्यक्ष नियुक्त करायचा होता. परंतु, काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडी घडत असल्याने भाजपाने प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती पुढे ढकलली. याच कालावधीत पंजाब, हरयाणा, दिल्ली आणि त्रिपुरा या राज्यांच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा भाजपाने केली.

“भाजपाला कर्नाटकात रणनीति बदलावी लागणार”

भाजपाच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, डी. के. शिवकुमार यांनी आतापर्यंत प्रशासक म्हणून छाप पाडलेली नाही. जर मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांनी उत्तमपणे प्रशासन हाताळले, तर भाजपासाठी अडचणी आणखी वाढतील. “डी. के. शिवकुमार हे एक चांगले प्रशासन देऊ शकतात, अशी अपेक्षा कर्नाटकातील मतदारांना आहे. शिवकुमार हे त्यांच्याकडे असलेल्या पैशांसाठी तसेच ‘मसल पॉवर’साठी ओळखले जातात. ते उत्तम प्रशासक ठरले, तर त्यांना कोणत्याच अडचणी येणार नाहीत. कर्नाटकात असलेल्या सत्ता विरोधी लाटेचाही भाजपाला उपयोग होणार नाही. त्यामुळे भाजपाला रणनीति बदलावी लागेल”, असे सूत्राने सांगितले.

डी. के. शिवकुमार व सिद्धरामय्या

कर्नाटकात मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी डी.के. शिवकुमार यांनी प्रयत्न सुरू केले होते. सत्तेचा अर्धा कालावधी संपल्यानंतरही शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद मिळत नव्हते. परंतु, त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींविरोधात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची सिद्धरामय्या यांची इच्छा नव्हती, तरी त्यांनी चेहऱ्यावर स्मित हास्य कायम ठेवले होते. तर शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत मुख्यमंत्री पद स्वीकारत असल्याचा संदेश दिला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा करताच शिवकुमार व सिद्धरामय्या यांचे एकमेकांना आलिंगन करतानाचे फोटो व्हायरल झाले.

कर्नाटकात डी. के. शिवकुमार यांची प्रतिमा कशी?

शिवकुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी काही दिवसांत पार पडेल. ते वोक्कालिगा समाजातून येतात. कर्नाटकात वोक्कालिगा समाजाची लोकसंख्या १० टक्के आहे. २०२८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वोक्कालिगा समाज काँग्रेसच्या बाजूने असेल, यासाठी शिवकुमार प्रयत्न करतील. काही भाजपा नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार हे बंगळुरूतील एक यशस्वी उद्योजक आहेत. तसेच त्यांचे त्या भागातील भाजपा आमदारांशी चांगले संबंध आहे. “काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवकुमार यांच्याशी कशा प्रकारे जुळवून घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण भाजपाच्या अनेक नेत्यांचे त्यांच्याशी संबंध आहेत. ईडीने शिवकुमार यांच्याविरोधात एका मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास केला होता. त्यामुळे भाजपा शिवकुमार यांच्या नेतृत्वातील सरकार भ्रष्ट असल्याचा प्रचार करू शकतो”, अशी माहिती भाजपाच्या एका माजी खासदाराने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.

कर्नाटकात भाजपाला येदियुरप्पांशिवाय पर्याय नाही?

कर्नाटकात भाजपा लिंगायत मतपेढीवर अवलंबून आहे. कर्नाटकातील एकूण लोकसंख्येपैकी ११.१ टक्के लोकसंख्या लिंगायत समाजाची आहे. भाजपाकडे अनेक लिंगायत नेते आहेत, परंतु, त्यांपैकी कोणीही बी. एस. येदियुरप्पा यांच्याइतके प्रभावी नाही. येदियुरप्पा यांचे पूत्र आणि कर्नाटक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या टीममध्ये पद मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. तर लिंगायत समाजातील नेते बसनगौडा पाटील यत्नाळ यांना पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

“विजयेंद्र यांची पुन्हा नेमणूक केली, तरी जो पाठिंबा बी. एस. येदियुरप्पा यांना मिळतो तो पुन्हा मिळेलच असे नाही”, अशी प्रतिक्रिया एका भाजपा नेत्याने दिली. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनंत कुमार या ब्राह्मण नेत्याचे २०१८ साली निधन झाले. त्यांच्यानंतर बी.एस. येदियुरप्पा यांनाच लोकप्रियता मिळाली. येदियुरप्पा यांच्याशिवाय भाजपाकडे सध्या कोणताही प्रभावी नेता कर्नाटकात नाही.

भाजपा नेत्या शोभा करंदलाजे यांची ‘वोक्कालिगा’वरील पकड

काँग्रेसने वोक्कालिगा समाजातील शिवकुमार यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवल्याने विजयेंद्र यांना लिंगायत मतपेढी अधिक बळकट करण्यास मदत मिळेल, असे काही भाजपा नेत्यांना वाटते. तर भाजपा नेत्या व केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे या वोक्कालिगा समाजातून येतात. त्यांचाही योग्य मान ठेवणे भाजपासाठी महत्त्वाचे असेल.

करंदलाजे या त्यांच्या निर्भयपणासाठी ओळखल्या जातात. दरम्यान, त्या येदियुरप्पा यांच्या गटापासून सध्या दूर आहेत. त्यांचे कर्नाटकातील स्थान पाहता त्यांना पक्षात एकटे पाडले जाऊ शकत नाही. करंदलाजे यांचा लोकसभा मतदारसंघ मागील निवडणूकीत बदलण्यात आला होता. त्या बंगळुरू नॉर्थमधून निवडून आल्या आहेत. त्यांचा या मतदारसंघात इतर वोक्कालिगा समाजातील नेत्यांशी सामना रंगणार आहे. माजी उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण आणि चार वेळा आमदार राहिलेल्या एस. आर. विश्वनाथ या वोक्कालिगा समाजातील प्रभावी नेत्यांचे त्यांना नव्या मतदारसंघात आव्हान असणार आहे.

जेडीएससमोर नेत्यांना एकजूट ठेवण्याचे आव्हान

शिवकुमार यांची मुख्यमंत्री पदावर नियुक्ती केल्याने कर्नाटकातील भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जेडीएसचे नेते व माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. एच.डी. कुमारस्वामी हे सध्या केंद्रीय मंत्री आहेत. भाजपा व एनडीएकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला उमेदवार घोषित करावे, अशी मागणी कुमारस्वामी यांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडे लावून धरली आहे. परंतु, कुमारस्वामी हे देखील वोक्कालिगा समाजातून येतात. त्यामुळे शिवकुमार व कुमारस्वामी हे दोघेही मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्यास कुमारस्वामी यांना वोक्कालिगा समाजाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कुमारस्वामींसाठी एक नवे आव्हान निर्माण झाले आहे. भाजपाच्या एका सूत्राने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यास जेडीएस पक्षातून मोठ्या प्रमाणात वोक्कालिगा नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. नेत्यांना एकजूट ठेवणे हेच जेडीएसच्या पक्षनेतृत्वासमोर आव्हान असेल.

सोशियो – इकॉनॉमिक एज्युकेशनल सर्वेच्या २०१५ मधील एका अहवालानुसार, कर्नाटकात वोक्कालिगा व लिंगायत समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या २१.३ टक्के इतकी आहे. दरम्यान, हा सर्वे जुना झाल्याचे सांगून आता फेटाळला जातो.