राज्यात एकनाथ शिंदे, अजित पवार, नारायण राणे, अशोक चव्हाण असे कितीतरी दिग्गज नेते केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा चुकविण्यासाठी भाजपला अक्षरश: शरण गेले. कर्नाटकातील काँग्रेसचे बडे प्रस्थ असलेल्या डी. के. शिवकुमार यांनाही अशाच पद्धतीने घेरण्यात आले होते. भाजपमध्ये जाण्याऐवजी तुरुंगात जाणे त्यांनी पसंत केले. काँग्रेसप्रती ठेवलेली निष्ठा त्यांना आता फळाला येत आहे.
डोडाहल्ली केंपेंगौडा शिवकुमार म्हणजेच कर्नाटकच्या राजकारणात प्रसिद्ध असलेले डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अखेरीस पूर्ण होत आहे. कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झालेल्या शिवकुमार यांचा राजकीय प्रवास तसाही थक्क करणारा आहे. १९८५ मध्ये माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले तरी शिवकुमार यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुढील निवडणुकीत ते विजयी झाले. १९८९ पासून सतत आठ वेळा विधानसभेची निवडणूक लढलेले शिवकुमार काँग्रेसचे ‘मॅन फ्रायडे’ किंवा संकटमोचक म्हणून ओळखले जातात. कर्नाटकच्या राजकारणात तेव्हा देवेगौडा यांचे चांगले वर्चस्व होते. देवेगौडा यांना शह देण्यासाठी वोक्कलिंग या त्यांच्याच समाजातील शिवकुमार यांना काँग्रेसने ताकद दिली. तेव्हापासून देवेगौडा कुटुंबिय आणि शिवकुमार यांच्यात कायमच संघर्ष बघायला मिळाला. देवेगौडा यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा शिवकुमार यांनी एकदा पराभवही केला होता.
तत्कालीन मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांनी शिवकुमार यांच्यातील गुण हेरून त्यांना राजकीय ताकद दिली. २००२ मध्ये विलासराव देशमुख यांचे सरकार संकटात आले असता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांना बंगळुरू सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. तेव्हा शिवकुमार आणि रोशन बेग या दोन तत्कालीन मंत्र्यांनी आमदारांची सारी खबरदारी घेतली होती. अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी गुजरातमधील काँग्रेस आमदारांना सुरक्षितस्थळी हलविण्यात शिवकुमारच आघाडीवर होते.
केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर काँग्रेसमधील बड्या नेत्यांच्या विरोधात फास आवळला गेला. त्यात शिवकुमार हे सुद्धा होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यास कारवाई टाळण्याचा आलेला निरोप त्यांना धुडकावून लावला. ईडीने शिवकुमार यांना अटक करून दिल्लीच्या तिहार तुरुंगात डांबले होते. तेव्हा शिवकुमार यांची तुरुंगात जाऊन सोनिया गांधी यांनी भेट घेतली होती. ५० दिवसांच्या तुरुंगवारीनंतर त्यांना जामीन मंजूर झाला. तेव्हापासून काँग्रेसमध्ये त्यांचे महत्त्व वाढले. पक्षातील लढवय्या नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली.
राज्यात शिंदे, अजित पवार, राणे, अशोक चव्हाण या नेत्यांनी कारवाईच्या भीतीने नांगी टाकली. शिवकुमार मात्र कॅाग्रेसपासून दूर गेले नाहीत. कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले. तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी सिद्दरामय्या आणि शिवकुमार यांच्यात स्पर्धा होती. नेतृत्वाने सिद्धरामय्या यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविताना अडीच वर्षांचे सूत्र निश्चित केले. अडीच वर्षे पूर्ण झाल्यावर शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला. सिद्धरामय्या खुर्ची सोडण्यास तयार नव्हते. तेव्हा शिवकुमारे हे कर्नाटकातील ‘एकनाथ शिंदे’ होणार अशी चर्चा सुरू झाली होती. शेवटी पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन. खरगे, राहुल गांधी यांनी शिवकुमार यांना न्याय दिला. मुख्यमंत्रीपदाची त्यांची इच्छा पूर्ण होत आहे. २०२८ मध्ये काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून देण्याचे मोठे आव्हान शिवकुमार यांच्यासमोर असेल.
देवेगौडांना आव्हान
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे राजकीय वर्चस्व म्हैसूरू भागात पसरलेल्या वोक्कलिंग समाजावर आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित या समाजाने कायम देवेगौडा यांना साथ दिली. पण अलीकडे काँग्रेस व भाजपने देवेगौडा यांचे वर्चस्व असलेल्या म्हैसूरू भागात अधिक जागा जिंकल्या होत्या. नवीन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे सुद्धा वोक्कलिंग समाजाचे असून ते मुख्यमंत्री झाल्याने हा समाज काही प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता आहे. यातून देवेगौडा यांच्या कुटुंबियासमोर आव्हाव उभे ठाकले आहे.
