खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या दिल्लीत दाखल झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून पक्षात नव्याने उत्साह भरण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जात आहे. या यात्रेमध्ये राहुल गांधी तसेच काँग्रेसचे अन्य नेते कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पायी प्रवास करत आहेत. या प्रवासादरम्यान सामाजिक, कला तसेच अन्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती या यात्रेत सहभागी होत आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे नेतेदेखील या यात्रेला पाठिंबा देत आहेत. नुकतेच डीएमके पक्षाच्या नेत्या तथा खासदार कनिमोझी यांनीही या यात्रेत आपला सहभाग नोंदवला.
हेही वाचा >> नरेंद्र मोदींच्या पोषाखावरील आक्षेपार्ह टिप्पणीनंतर संताप, तृणमूलच्या नेत्याने मागितली माफी




भारत जोडो यात्रा हरियाणा राज्यातून दिल्लीमध्ये दाखल झाली आहे. दिल्लीमध्ये दाखल होण्यापूर्वी शेवटच्या दिवशी या यात्रेत डीएमके पक्षाच्या नेत्या कनिमोझी यांनी यात्रेत आपला सहभाग नोंदवला. सहभागानंतर ‘भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवल्यामुळे मला आनंद झाला आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतातील विविधतेचा उत्सव साजरा केला जात आहे,’ असे मत त्यांनी ट्विटरद्वारे मांडले. तसेच ‘काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांचा देशाला एकसंध ठेवण्याचा दृष्टीकोन आहे. हाच दृष्टीकोन देशातील जनता पुढे घेऊन जाईल,’ असे मत कनीमोझी यांनी व्यक्त केले.
काँग्रेसनेदेखील कनिमोझी यांच्या भारत जोडो यात्रेतील सहभागाची दखल घेतली आहे. कनिमोझी यांचा यात्रेतील फोटो प्रदर्शित करत काँग्रेसने पक्षाच्या ट्विटर खात्यावर याबाबत अधिक माहिती दिली आहे. कनिमोझी यांनी राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. त्यांनी द्वेषभावनेविरोधात देशात प्रेम, सौहार्द, बंधुभाव पसरवण्याचा संदेश दिला, असे काँग्रेसने म्हटले आहे.
दरम्यान, भारत जोडो यात्रा सध्या दिल्लीमध्ये दाखल झाली आहे. दिल्लीमध्ये आल्यानंतर या यात्रेत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी सहभाग नोंदवला.