पुण्यासारख्या सुरक्षित मतदारसंघामध्ये भाजपची दमछाक होते की काय, असे चित्र मतदानापूर्वी काही दिवस निर्माण झाले होते. पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह १० जागांवर महायुतीसाठी हीच दमछाक घाट्याची ठरणार, असा अंदाज किमान मतदानोत्तर पाहण्यांत तरी दिसतो आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांनी १० पैकी ६ जागा मिळतील, असा जो कौल दिला आहे, त्यातील बहुतांश पश्चिम महाराष्ट्रातूनच मिळतील, असे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्याची लढत अटीतटीची झाली, तरी भाजप आपली जागा राखेल, असे आत्ता तरी दिसते. शिरूरमध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना तगडी लढत देतील, असे दिसते. मावळमध्ये मात्र विद्यमान खासदार शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना आपली जागा राखण्यासाठी बरेच कष्ट पडलेले दिसतात. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजोग वाघेरे यांनी नंतरच्या टप्प्यात मोठे आव्हान उभे केले होते. बारामतीतील लढतीकडे साऱ्या देशाचे लक्ष होते. तेथील निकालाकडेही त्यामुळे सर्वांच्या नजरा आहेत. अजित पवारांनी ज्या पद्धतीने येथे ताकद लावली होती, त्यामुळे आत्ता तरी येथे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांना समसमान संधी असल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>>उत्तरेतील भाजपचा बालेकिल्ला भक्कमच!

सोलापूरमध्ये भाजपला उमेदवार जाहीर करायला थोडा उशीर झाला. त्याचा फटका बसताना दिसतो आहे. राम सातपुते आक्रमक असले, तरी वंचित बहुजन आघाडीने माघार घेतल्याने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचा मार्ग सुकर होईल, असे म्हटले जाते. सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटलांनी अपक्ष उभे राहून रंगत आणल्याने संजय पाटील यांचा मार्ग खडतर आहे, असे मतदानोत्तर पाहणीच्या आकडेवारीचा सांगावा दिसतो. सातारा आणि माढ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साथ मिळताना दिसते आहे. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला, तर तो धक्कादायक ठरेल. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी असली, तरी ती निश्चित करण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा होता. येथील विद्यमान खासदार शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यासाठी ही निवडणूक सोपी गेलेली नाही. हातकणंगल्यात शिवसेनेचे धैर्यशील माने यांना राजू शेट्टी आणि शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांच्यातील मतविभागणीचा फायदा होईल, असे दिसते.

पश्चिम महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार आहे, तेथील बहुतेक लढती महायुतीसाठी कठीण आहेत, असे मतदानोत्तर पाहणीचा कल सांगतो आहे. नगरचा विचार करता, तेथेही सुजय विखे यांच्यासमोर नीलेश लंके यांनी मोठे आव्हान उभे केले असून, शिर्डीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी लढत रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकूण १० जागा लढल्या, त्यातील पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. त्यामुळे मतदानोत्तर पाहणीत या पक्षाला दाखविलेल्या ६ जागांपैकी पश्चिम महाराष्ट्रातूनच सर्वाधिक येतील, असे म्हटले, तर पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुतीवर वर्चस्व ठेवेल, असे दिसते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dominance of mahavikas aghadi in west maharashtra print politics news amy
Show comments