Urdu Newspapers Editorial on Donald Trump Iran Threat : गेल्या सहा आठवड्यांपासून पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाला मंगळवारी अखेर १० दिवसांचा ब्रेक लागला. पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणने तात्पुरत्या युद्धविरामाला सहमती दर्शवली. तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा देताना अत्यंत शिवराळ भाषेचा वापर केला होता. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव भारतातील आघाडीच्या उर्दू दैनिकांच्या वार्तांकनात स्पष्टपणे दिसून आला. ‘उर्दू टाइम्स’ आणि ‘सियासत’ यांसारख्या प्रमुख वृत्तपत्रांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी वापरलेल्या शिवराळ भाषेवर तीव्र आक्षेप घेतला. भारतासह जगभरातील अनेक देशांनी या युद्धात तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्याविषयीचा हा आढावा…

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा समाचार

पश्चिम आशियात युद्धाचा वणवा पेटला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (५ एप्रिल) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी तातडीने खुली न केल्यास मंगळवारपर्यंत (८ एप्रिल) त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांसह पायाभूत सुविधांवर हल्ले केले जातील, अशी धमकीच त्यांनी या पोस्टमधून दिली होती. यादरम्यान त्यांनी इराणला उद्देशून वापरलेल्या शिवराळ भाषेचा हैदराबादमधील प्रसिद्ध वृत्तपत्र सियासतने आपल्या ६ एप्रिलच्या अग्रलेखातून समाचार घेतला. इराणच्या जिद्दीमुळे अमेरिका आणि इस्रायलचा युद्धाचा डाव फसत चालला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प कमालीचे हतबल झाले असून त्यांनी स्वत:वरचे नियंत्रण गमावले आहे. शिवराळ भाषेचा वापर करणे हे त्यांच्या मानसिक स्थितीचा पुरावा आहे,असे परखड मत सियासतच्या अग्रलेखातून मांडण्यात आले.

अमेरिकेचे मनसुबे उधळून लावल्याचा दावा

इस्रायलच्या प्रभावाखाली येऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी असा कयास बांधला होता की, इराणबरोबरचे युद्ध अमेरिका काही दिवसांतच जिंकेल आणि सर्वकाही त्यांच्या इच्छेनुसारच घडेल. युद्धाच्या सुरुवातीच्या तासांतच इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाची हत्या केल्यानंतर ट्रम्प यांना हा मार्ग आणखीनच सोपा वाटला होता. तेहरानमध्ये सत्तांतर करून तिथे अमेरिकेच्या तालावर नाचणारे सरकार स्थापन करणे, मध्यपूर्वेमध्ये इस्रायलचे वर्चस्व प्रस्थापित करणे आणि त्यांच्या ग्रेटर इस्रायलच्या स्वप्नाला बळ देणे हा ट्रम्प यांचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेद्वारे अमेरिकेला संपूर्ण जगावर स्वतःचे वर्चस्व सिद्ध करायचे होते. मात्र, इराणने दिलेल्या कडव्या प्रतिसादानंतर ट्रम्प यांचे हे सर्व मनसुबे उधळले गेले. त्यामुळेच ट्रम्प यांनी मानसिक संतुलन गमावून खालच्या भाषेचा वापर करण्यास सुरुवात केली, असेही सियासतच्या अग्रलेखात नमूद करण्यात आले.

आणखी वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली? अमेरिकेच्या २५ व्या घटनादुरुस्तीत नेमके काय? 

अमेरिकेची प्रतिमा मलिन झाल्याची टीका

इराण-अमेरिका युद्धाला आता सहा आठवड्यांचा कालावधी लोटला असून या काळात अमेरिकेने युद्धावरील आपले नियंत्रण पूर्णपणे गमावले असल्याचा दावा उर्दू दैनिकाच्या अग्रलेखातून करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला आपल्या मित्रराष्ट्रांना या युद्धात ओढण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु इराणकडून धोका असूनही आखाती अरब देशांनीही या संघर्षापासून स्वतःला दूर ठेवणेच पसंत केले. दुसरीकडे आपल्या लष्करी शक्तीचा माज असलेल्या इस्रायलची अवस्थाही भीषण दलदलीत अडकल्यासारखी झाली आहे. या सर्व अपयशांमुळे ट्रम्प यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले असल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांची विधाने त्यांच्या मानसिक दिवाळखोरीचे दर्शन घडवतात. जगातील महासत्तेच्या प्रमुखांकडून असभ्य भाषेचा वापर अतिशय निंदनीय आहे. जगावर आपली हुकूमशाही लादण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण मित्रराष्ट्रांना त्यांची भूमिका मान्य नसल्याने जागतिक स्तरावर अमेरिकेच्या प्रतिमेला मोठा तडा गेल्याचेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

इराणच्या भूमिकेचे केले तोंडभरून कौतुक

इराणच्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक करताना अग्रलेखात नमूद करण्यात आले की, इराण या अन्यायकारक युद्धाविरोधात आजही खंबीरपणे उभा आहे. त्यांनी तात्पुरता युद्धविराम नाकारला असून आंतरराष्ट्रीय हमीसह कायमस्वरूपी युद्धबंदीची मागणी केली आहे. अमेरिकेवर विश्वास ठेवता येणार नाही अशी इराणची भूमिका आहे. ट्रम्प यांना केवळ बाहेरूनच नव्हे तर त्यांच्या घरातूनही विरोधाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील लाखो नागरिक या युद्धाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. अग्रलेखाच्या शेवटी ट्रम्प यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वर्तनात तातडीने बदल करायला हवा. त्यांच्या बेजबाबदार आणि उतावीळ वागणुकीमुळे संपूर्ण जगाला ओलीस धरले जाऊ शकत नाही, असा इशाराही अग्रलेखातून देण्यात आला.

हेही वाचा : तमिळनाडूतील ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; पिता-पुत्राची कोठडीत हत्या कशी झाली? करोना काळात काय घडले?

उर्दू टाइम्सच्या अग्रलेखातून इस्रायलचा निषेध

मुंबईस्थित ‘उर्दू टाइम्स’ या वर्तमानपत्रातून डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बेभान झाले असून जगाने त्यांना आवर घातला पाहिजे, असे उर्दू टाइम्सने आपल्या वृत्तात नमूद केले. त्याशिवाय इस्रायलच्या संसदेने पॅलेस्टिनी नागरिकांसाठी संमत केलेल्या मृत्युदंडाच्या नवीन कायद्यावरही वृत्तपत्राने आपल्या १ एप्रिलच्या अग्रलेखात भाष्य केले. इस्रायलमधील कट्टर उजव्या विचारसरणीच्या नेत्यांन पुढाकार घेऊन हा कायदा मंजूर करून घेतला आहे. पॅलेस्टिनी नागरिकांवरील अत्याचाराचा हा नवा अध्याय असल्याची टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे. या कायद्यानुसार इस्रायली नागरिकांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. त्यावर आक्षेप घेताना हा कायदा अत्यंत भेदभावपूर्ण आणि वर्णद्वेषी असल्याचे मत अग्रलेखातून मांडण्यात आले आहे. आधीच अत्याचाराच्या छायेत जगणाऱ्या पॅलेस्टिनी जनतेकडे आता गमावण्यासारखे काहीही उरलेले नाही. या नवीन कायद्यामुळे इस्रायलची जागतिक प्रतिमा अधिक खराब होईल आणि त्यांच्या गुन्हेगारी न्यायव्यवस्थेवर संशयाचे ढग निर्माण होतील, असा इशाराही उर्दू टाइम्सने दिला आहे.