डॉ. वजाहत मिर्झा – सहा पदांवर असलेले कॉंग्रेस नेतृत्वाचे लाडके व्यक्तीमत्त्व

डॉ. वजाहत मिर्झा हे कॉंग्रेस नेतृत्वाचे लाडके व्यक्तीमत्त्व असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

नितीन पखाले

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली. हे त्यांच्याकडे देण्यात आलेले सहावे पद. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी काँग्रेस पक्षात स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून तब्बल सहा महत्त्वाच्या पदांवर विराजमान असलेले आ. डॉ. वजाहत मिर्झा हे कॉंग्रेस नेतृत्वाचे लाडके व्यक्तीमत्त्व असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. एकानंतर एक पद आणि आमदारकी मिळाल्यावरही यवतमाळमधील मतदारांचे ते लाडके होऊ शकतील का? आणि कॉंग्रेसबद्दल लोकांमध्ये ममत्त्व निर्माण करून जिल्ह्यात रसातळाला गेलेल्या काँग्रेसचे तारणहार होऊ शकतील का? हा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

पुसद येथील रहिवासी असलेले डॉ वझाहत यांचे वडील आथर मिर्झा हे शिक्षक होते. ते पुसद येथे एक साप्ताहिक चालवायचे. वझाहत यांचे शालेय शिक्षण पुसद येथे झाल्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. वडील काँग्रेस विचारधारेचे असले तरी घरात राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मात्र काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद हे १९८० मध्ये वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले व जिंकले. या काळात गुलामनबी यांचा आथर मिर्झा यांच्याशी स्नेह जुळला आणि पुढे गुलामनबी आझाद हे मिर्झा परिवाराचे राजकीय गॉडफादरच झाले. वझाहत यांच्या वडिलांनी त्या काळात अल्पसंख्याक समाजाशी निगडीत अनेक शैक्षणिक संस्थाची उभारणी केली. गुलामनबी आझाद यांच्या नावानेच या कुटुंबियांच्या अनेक संस्था आहेत.

आथर मिर्झा यांच्यानंतर ही जबाबदारी डॉ. वझाहत यांच्याकडे आली आणि त्यांनी वडिलांपेक्षा एक पाऊल पुढे टाकत राजकारणात प्रवेश केला. गुलामनबी आझाद यांचे बोट धरून वझाहत यांनी थेट दिल्ली गाठली. अल्पसंख्याक समाजातील एक उच्चशिक्षित तरुण म्हणून काँग्रेसनेही डॉ. वजाहत मिर्झा यांना जवळ केले. पक्षासाठी आंदोलने, कार्यकर्त्यांची फळी अशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना डॉ. मिर्झा काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष झाले. २०१८ मध्ये डॉ. वझाहत मिर्झा यांना काँग्रेसने थेट विधानपरिषदेची उमेदवारी दिली व ते अविरोध निवडून आले. गुलामनबी आझाद यांचे मार्गदर्शन आणि काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची साथ यामुळे डॉ. मिर्झा आमदार झाले. यवतमाळ जिल्ह्यात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची सोबत, विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी जुळलेले सूर यामुळे त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही.

डॉ. वजाहत मिर्झा हे सध्या यवतमाळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, विधान परिषदेचे सदस्य, राज्यमंत्री दर्जा असलेल्या वक्फ बोर्डाचे अध्यक्ष, यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष, अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी नेमलेल्या अभ्यासगटाचे सदस्‍य आणि आता काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशी अर्धा डझन पदे सांभाळत आहेत. एका शिक्षकाचा मुलगा ते आमदार असा प्रवास असलेल्या डॉ. वजाहत मिर्झा यांचा हा उंचावता राजकीय आलेख पक्षातील कार्यकर्त्यांसह जनसामान्यांना अचंबित करणारा आहे. आ. डॉ. वजाहत मिर्झा वक्फ मंडळाचे अध्यक्ष असताना या मंडळाच्या अनेक समस्या कायम आहेत. आमदारकीची चार वर्ष उलटूनही पुसदमध्ये कुठल्याही विकासकामांत या पदाचे प्रतिबिंब उमटत नाही. अभ्यागत मंडळावर असूनही वैद्यकीय महाविद्यालयातील अनागोंदी कायम आहे.

काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी दिग्गज रिंगणात असताना दिल्लीवरून डॉ. वजाहत मिर्झा यांचे नाव आले. दिल्लीतून गुलामनबी आझाद, महाराष्ट्रात अशोकराव चव्हाण आणि स्थानिक पातळीवर माणिकराव ठाकरे यांचा पाठिंबा असल्यामुळे त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाला कोणीही विरोध केला नाही. मात्र आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्षसंघटन वाढीसाठी कोणतेही ठोस प्रयत्न किंवा केंद्र सरकारविरोधात आंदोलन करून वेगळी छाप डॉ. मिर्झा यांना अद्यापही पाडता आली नाही. त्यांच्या सभोवताली सामान्य कार्यकर्ता कधी रमला नाही. विधान परिषदेचे आमदार म्हणूनही डॉ. मिर्झा यांची कामगिरी नजरेत येण्यासारखी नाही. पुसद हा राजकीयदृष्ट्या बलदंड तालुका आहे. येथे राष्ट्रवादी आणि भाजपला शह देण्यासाठी डॉ. मिर्झा यांचा उपयोग होईल, हा काँग्रेसचा डाव अपयशी ठरल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. डॉ. मिर्झा यांच्यामुळे काँग्रेसचा हक्काचा मतदार असलेला अल्पसंख्याक समाज जिल्ह्यात नव्या जोमाने काँग्रेससोबत जुळेल, असेही चित्रही डॉ. मिर्झा यांच्या पदांमुळे जिल्ह्यात निर्माण झाले नाही. शिवसेना आणि भाजपच्या राजकारणात काँग्रेसचे जिल्ह्यातील अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. पक्ष नेतृत्वाकडे असलेला संघटन कौशल्याचा, जनतेच्या प्रश्नांवर तुटून पडण्याचा अभाव अशी अनेक कारणे यासाठी सांगितली जातात. तरीही पक्षश्रेष्ठी आ. डॉ. वजाहत मिर्झा यांच्यावर मेहरबान का आहे, हा प्रश्न पक्षात अनेकांसाठी अनाकलनीय आहे. तब्बल सहा महत्त्वाच्या पदांवर आ. डॉ. वजाहत मिर्झा यांची नियुक्ती करून काँग्रेसने आपल्याच ‘एक व्यक्ती, एक पद’ या संकल्पास तडा दिल्याची चर्चा आहे. 

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dr wazahat mirza who is haveing six posts is the favorite personality of congress leadership pkd

Next Story
हरियाणाच्या स्थानिक राजकारणात ‘आप’ ची उडी, नागरी निवडणुकींच्या रिंगणात काँग्रेसची मोठी परीक्षा
फोटो गॅलरी