सतीश कामत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिपळूण : गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर बाजूला फेकले गेलेले माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते हे शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीचा लाभ उठवत अचानक सक्रीय झाले आहेत. शिवसेना आमदारांची बंडखोरी ही गीते यांच्यासाठी राजकीय पुनरुज्जीवनाची संधी ठरली असून गेल्या काही दिवसांत गीते यांनी रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत पक्षसघंटनेच्या बैठका घेत ठाकरे कुटुंबाच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे अनंत गीते सदस्य आहेत. परंतु शनिवारच्या बैठकीला हजेरी लावण्याऐवजी गीतने यांनी रायगड लोकसभा मतदार संघात कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात येऊन दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी लोटे येथे घेतली. सध्याच्या अडचणीच्या काळात शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना केले. अर्थात गीते यांची ही मोहीम पक्षनिष्ठेपेक्षा सध्याच्या राजकीय परिस्थितीत मैदान आपल्यासाठी मोकळे असल्याचे लक्षात आल्यामुळे आहे, अशीही चर्चा आहे. पण गीते सक्रीय झाल्यामुळे रायगडबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातही शिवसेनेअंतर्गत राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे. कारण या दोन्ही जिल्ह्यांमधील कुणबी समाजात गीते यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बंडखोर आमदारांच्या विरोधात पक्षकार्यकर्त्यांच्या असलेल्या तीव्र भावनांच्या लाटेवर स्वार होण्याचा हा प्रयोग गीते यांना पुन्हा शिवसेनेत मानाचे स्थान मिळवून देऊ शकेल, अशी शक्यता आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघात गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते सुनील तटकरे यांनी पराभव केला. तेव्हापासून ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. ‘ मातोश्री’शीही त्यांचा संपर्क तुटला होता. विशेषत: मध्यंतरी श्रीवर्धन येथील शिवसेनेच्या एका मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केल्याने त्यांना पक्षाच्या सभा, बैठकांपासून ते अगदी नुकत्याच राबवण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानापासूनही दूर ठेवण्यात आले होते. गीते यांनीही रायगड, रत्नागिरी येथील राजकीय कार्यक्रम टाळले होते. तसेच एखाद्या कार्यक्रमाला आले तर राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टाळत होते.

मुंबईत गेले पाच दिवस बैठकांचे सत्र सुरू असतानाही गीते मात्र त्यापासून दूर होते. पण त्यांच्या लोकसभा मतदार संघातील आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि योगेश कदम बंडखोर गटात सहभागी झाले असल्याचे पाहून ते एकदम सक्रीय झाले आहेत. या चौघांच्या बंडाने त्यांना शिवसेनेत पुन्हा महत्त्वाची भूमिका मिळण्याची संधी चालून आली आहे. या संदर्भात गीते म्हणाले की, मी रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या समर्थनासाठी कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून मते जाणून घेतली. कार्यकर्ते आणि मतदार पक्षाबरोबर आहेत. माझ्या मतदार संघात शिवसेनेसाठी वातावरण चांगले आहे. बंडखोरांना कार्यकर्ते त्यांची जागा दाखवतील.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to mla rebellion in shiv sena anant geete gets opportunity to back in party politics print politics news asj
First published on: 28-06-2022 at 09:14 IST