नांदेड: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग, माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक दिग्गज मागील काही वर्षांत नांदेडमधील ‘आनंद निलयम’ या प्रासादतुल्य बंगल्यात येऊन गेले. काँग्रेस पक्षातील अनेक घडामोडींचे केंद्र राहिलेल्या या बंगल्यात आता येत्या सोमवारी भाजपाच्या नेत्यांचे पाय लागणार आहेत!

शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर गृहनिर्माण संस्थेतील वरील बंगला खा.अशोक शंकरराव चव्हाण यांचा आहे. भाजपा नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौरा कार्यक्रमात वरील बंगल्यावर ते जाणार असल्याचे नमूद करण्यात आल्यानंतर आवश्यक ती तयारी सुरू झाली असल्याचे सांगण्यात आले.

अशोकरावांचे पिताश्री, माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी नांदेडमधील आपले पहिलेवहिले हक्काचे घर याच वसाहतीत १९५०च्या दशकात बांधले तेव्हा त्यास कोणतेही नाव नव्हते. मध्यमवर्गीय परिवाराला साजेल, असे या घराचे तेव्हाचे स्वरूप होते. त्यांच्या हयातीतच या घराचा थोडा विस्तार झाला, पण त्यांच्यानंतर शेजारची दोन घरे बाजारमूल्याने खरेदी करून चव्हाण कुटुंबाने गेल्या दशकाच्या उत्तरार्धात मूळ घरे पाडून मोठ्या सलग भूखंडावर मोठी नि भव्य वास्तू उभी केली. ही वास्तू म्हणजेच ‘आनंद निलयम’.

वरील बंगल्यात ९ वर्षांपूर्वी देशाचे माजी पंतप्रधान आणि इतर काँग्रेस नेते भोजनानिमित्त भेट देऊन गेले. आता अमित शहा, देवेन्द्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते चव्हाणांच्या घरी जाणार असल्याने मोठी लगबग सुरू झाली असून केंद्रीय गृहमंत्र्यांचा नांदेड दौरा यशस्वी व्हावा, यासाठी खा.अशोक चव्हाण सर्वच बाबींचे सूत्रधार बनले आहेत.

यानिमित्ताने काही जुने संदर्भ समोर आले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी वसंतदादांचे समर्थक म्हणून समजले जाणारे सुधाकरराव नाईक शंकररावांच्या भेटीसाठी थेट त्यांच्या घरी आले असता, शंकररावांनी त्यांना विश्रामगृहावर भेटायला या असा निरोप देऊन परत पाठवले होते. शंकररावांनी काही काळ ‘मसकाँ’ हा पक्ष स्थापन केला होता तेव्हा सार्‍या घडामोडी त्यांच्या या (मूळ) घरातून झाल्या होत्या. १९९६ ते ९९ दरम्यान शंकरराव आणि अशोक चव्हाण सत्तेमध्ये नसताना, याच घरात एका रात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केल्यामुळे ही बाब तेव्हा राज्यभर गाजली होती

चव्हाण कुटुंबाचे हे घर सतत सुरक्षा कवचाखाली राहिले. शंकरराव व अशोक चव्हाण या दोघांनीही काँग्रेसमधील सत्ताकाळात उच्च श्रेणीची सुरक्षा व्यवस्था अनुभवली. भाजपावासी झाल्यानंतर अशोक चव्हाण यांची सुरक्षाविषयक श्रेणी वाढली आहे. आता ते या पक्षाचे खासदार, त्यांची मुलगी आमदार असल्याने सर्वसाधारण परिवारांची वसाहत असलेल्या शिवाजीनगर गृहनिर्माण संस्थेतील या बंगल्याला मोठे वलय प्राप्त झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलग १९ वर्षे मंत्री आणि मग २ वर्षे मुख्यमंत्री राहिल्यावरही शंकररावांचे मुंबईत स्वतःचे घर नव्हते. मुख्यमंत्रीपद गेल्यावर त्यांना आपले बिर्‍हाड आमदार निवासात हलवावे लागले होते. नंतरची अनेक वर्षे वरील बाब एक दंतकथा बनली होती. शंकररावांचे नांदेडमधील निवासस्थान त्यांच्या साधेे व सच्चेपणाचे प्रतीक मानले जात होते, पण त्यांच्या पश्चात या घराचा मोठा विस्तार होऊन घरासमोरच्या उंच भिंतीवर ‘आनंद निलयम’ हे नाव विराजमान झाले असून तेथे विद्यमान केंद्रीय गृहमंत्र्यांच्या स्वागतासाठीची सज्जता होत आहे.