रवींद्र जुनारकर

चंद्रपूर : राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस नेते आक्रमक झाले. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. गटतट विसरून काँग्रेस नेते यानिमित्ताने एकत्र आले. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात वेगळेच चित्र पहायला मिळाले. आपल्या नेत्यावरील कारवाईच्या निषेधासाठीही येथील काँग्रेस नेते एकत्र आले नाही. नेत्यांनी केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.

पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
Pooja tadas and ramdas tadas
सासऱ्याविरोधात सून! कौटुंबिक अत्याचाराचा आरोप केलेल्या पूजा तडस निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ पक्षाने दिली संधी
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
Yavatmal Shivsena Thackeray
यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटात निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक बदल; अनुभवी व जुन्या शिवसैनिकांना दूर सारत नवीन कार्यकर्त्यांना संधी

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी गांधी चौकात तर विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे नेते, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी प्रियदर्शनी चौकात सत्याग्रह, धरणे आंदोलन केले. राजुरा येथे आमदार सुभाष धोटेंनी या कारवाईचा निषेध केला. जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदार संघात किंवा मोठ्या शहरात काँग्रेस कार्यकर्ते एकत्र येऊन रस्त्यावर उतरलेले दिसले नाही. केवळ प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे सोपस्कार नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पार पाडले.

हेही वाचा… ज्या कोलारमधील भाषणामुळे खासदारकी रद्द झाली, त्याच ठिकाणी राहुल गांधींची पुन्हा जाहीर सभा; यावेळी काय बोलणार?

जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी तशी नवी नाहीच. जिल्ह्यात खासदार धानोरकर आणि माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार यांचे स्वतंत्र गट सक्रिय आहेत. वडेट्टीवार मंत्री असताना चंद्रपूर शहरात किमान आठवडा, पंधरवड्यातून एकदा यायचेच. मात्र, मंत्रीपद गेल्यानंतर ते फार कमी वेळा मुख्यालयात आले. ब्रम्हपुरी मतदार संघाच्या बाहेर न पडणारे वडेट्टीवार चिमूर येथे येत-जात असतात. मात्र, सत्याग्रह आंदोलनासाठी ते जिल्ह्यात आलेच नाही. विधानभवन परिसरातच ते किल्ला लढवत राहिले. परिणामी वडेट्टीवार समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. धानोरकर दाम्पत्याने भद्रावती-वरोरा मतदार संघावर तथा चंद्रपूरवर लक्ष केंद्रित केले आहे. ते सत्याग्रह आंदोलनात सहभागी झाले. मात्र, हे आंदोलन ज्या आक्रमक पद्धतीने होणे गरजेचे होते, तसे झाले नाही. विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या माध्यमातून नरेश पुगलिया यांचे राजकारण सुरू आहे. पुगलिया यांनी आपल्या समर्थकांसह सत्याग्रह केला. या आंदोलनातही इतर नेत्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा येथे रस्त्यावर उतरून या निर्णयाचा विरोध केला. मात्र, त्यांच्यासोबत जिवती, कोरपना, गोंडपिंपरी आणि गडचांदूर या मोठ्या तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते दिसून आले नाही. या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले असते तर ते अधिक प्रभावी ठरले असते. याचबरोबर, काँग्रेसमधील एकोप्याचेही दर्शन झाले असते. मात्र, नेते आपसातील मतभेद आणि गटबाजी संपवायला तयार नसल्याचेच यावरून अधोरेखित झाले.

हेही वाचा… Rahul Gandhi Disqualified : सर्वोच्च न्यायालयात जाण्यास विलंब का होतोय? काँग्रेसने दिले स्पष्टीकरण; जयराम रमेश म्हणाले…

मोठे नेतेच असे वागत असल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधीलही दरी वाढतच चालली आहे. एनएसयूआय, शहर महिला काँग्रेस, ग्रामीण काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनांमध्ये शोधूनही दिसत नव्हते.

हेही वाचा… राहुल गांधींच्या अपात्रतेनंतर संपूर्ण देशात काँग्रेस आक्रमक, वायनाडमध्ये मात्र कार्यकर्त्यांत मरगळ

स्वपक्षाच्या मोठ्या नेत्यावरील कारवाईविरोधात जिल्ह्यातील नेते एकत्र येत नसतील तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते एकवटतील का, असा प्रश्न जिल्हावासीयांना यानिमित्ताने पडला आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरी हे नेते गटतट विसरून एकत्र येतील की नाही, यावरच जिल्हा काँग्रेसचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल.