scorecardresearch

‘ईडी’चा ससेमिरा सुरू असताना ‘तिसरी आघाडी’ दिल्लीत आक्रमक

विरोधी पक्ष नेत्यांविरोधात ‘ईडी’च्या कारवायांना वेग आला असताना शुक्रवारी ‘तिसरी आघाडी’ दिल्लीत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले

opposition party leaders togather
(फोटो सौजन्य- के. कविता ट्विटर)

महेश सरलष्कर

मद्यधोरण घोटाळा प्रकरणात ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांना ‘ईडी’ने अटक केली असून ‘भारत राष्ट्र समिती’च्या नेत्या के. कविता यांचीही शनिवारी ‘ईडी’ चौकशी करणार आहे. शिवाय, ‘ईडी’ने शुक्रवारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दिल्ली व बिहारमधील मालमत्तांवर छापे टाकले. विरोधी पक्ष नेत्यांविरोधात ‘ईडी’च्या कारवायांना वेग आला असताना शुक्रवारी ‘तिसरी आघाडी’ दिल्लीत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी १३ मार्चपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून ‘भारत राष्ट्र समिती’ने विरोधी पक्षांना दिल्लीत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जंतर-मंतरवर सुमारे डझनभर विरोधी पक्षांच्या महिला नेत्या एकदिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसल्या. या आंदोलनामध्ये ‘माकप’चे महासचिव सीताराम येचुरीही सहभागी झाले. ‘राजकारणामध्ये महिलांनाही समान संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाले पाहिजे’, असे येचुरी म्हणाले. हे विधेयक संमत झाल्यास संसद तसेच, विधानसभांमध्ये एक तृतियांश जागा महिलांसाठी राखीव असतील. त्यासाठी घटनादुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन भाजपने दिले होते. लोकसभेत पूर्ण बहुमत मिळून देखील या मुद्द्याकडे भाजपने दुर्लक्ष केले.

आणखी वाचा- अर्थसंकल्पीय तरतुदींचा भाजपला कितपत फायदा?

दिल्लीत भाजप आणि केंद्र सरकार विरोधात आक्रमक होण्यासाठी महिला आरक्षण हा अचूक मुद्दा असल्याने ‘भारत राष्ट्र समिती’ने दिल्लीत विरोधी पक्षांना जमवून शक्तिप्रदर्शन करण्याचा घाट घातला आहे. या वर्षी तेलंगणामध्ये विधानसभेची निवडणूक असून तिथे राजकीय वातावरण तापू लागले आहे. असे असताना दिल्लीतील मद्यधोरण घोटाळा प्रकरणामध्ये ‘आप’चे मनीष सिसोदिया यांच्यासह के. कविता यांनाही लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होत आहे. ‘भारत राष्ट्र समिती’ने कथित ‘तिसऱ्या आघाडी’च्या खांद्यावरून भाजपविरोधातील लढाई तीव्र केली आहे.

आणखी वाचा- निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकात भाजपला खिंडार? दोन बडे नेते काँग्रेसच्या वाटेवर

रायपूरच्या महाअधिवेशनामध्ये काँग्रेसने विरोधी पक्षांना तिसरी आघाडी उभारण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ‘भारत राष्ट्र समिती’ने काँग्रेसवरच टीका केली. हैदराबादमध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये आप, माकप, भाकप, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस या बिगरकाँग्रेस-बिगरभाजप विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. काँग्रेसने प्रादेशिक पक्षांशी जुळवून घ्यावे अन्यथा काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांची मोट बांधावी व ‘तिसऱ्या आघाडी’ सक्रिय करावी अशी चर्चा या बैठकीत झाली होती. ‘ईडी’ची कारवाई हा देखील प्रादेशिक पक्षांच्या एकत्र येण्यामागील महत्त्वाचा धागा आहे. मद्य धोरणातील घोटाळा प्रकरणी के. कविता यांची ‘ईडी’कडून चौकशी होत असताना थेट दिल्लीत भाजपविरोधात शक्तिप्रदर्शन करून केंद्र सरकारला इशारा दिला जात आहे.

आणखी वाचा- पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान, ८० दिवसांनंतर जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस नेता म्हणाला, “मला मोठा धडा मिळाला…”

दिल्लीतील ‘आप’ सरकारने उत्पादन शुल्क धोरणात बदल करून मद्यविक्री खुली केली होती. हे धोरण बदलताना मद्य विक्रेत्यांच्या नफ्याचे प्रमाण ५ टक्क्यांवरून १२ टक्के केले होते. या निर्णयामागे विक्रेत्यांची दक्षिणेतील लॉबी सक्रिय होती व या लॉबीने ‘आप’च्या नेत्यांना १०० कोटींची लाच दिल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे. या प्रकरणी ‘ईडी’ने सिसोदियांना अटक केली असून के. कविता या देखील वादाचा भोवऱ्यात सापडल्या आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 14:35 IST