उमाकांत देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच अंमलबजावणी संचालनालयाकडून ( ईडी) परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थासह सात ठिकाणी गुरूवारी छापे घातले. गेले वर्षभर परब यांच्यावर आरोपसत्र व चौकशी सुरू असताना ईडीने आता कारवाई सुरू केल्याने भाजपकडून नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांच्या निमित्ताने शिवसेनेला ‘लक्ष्य’ करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये नेत्यांच्या प्रवेशासाठी रस्सीखेच होणार आहे. त्यादृष्टीनेही चौकशा टाळायच्या असल्यास भाजपमध्ये यावे,असा इशारा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईतून देण्यात येत असल्याचे मानले जात आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत, यशवंत जाधव, खासदार भावना गवळी यांच्याबरोबरच अनिल परब यांच्यावर केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई सुरू झाली होती. आता परब यांच्यावर छापे टाकून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई व चौकशांचा ससेमिरा सुरू झाल्याचा हा सूचक इशारा असल्याचे मानले जात आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांनी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना काही महिन्यांपूर्वी गजाआड केले. वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर भाजपने त्यांच्याविरूद्धच्या कारवाईच्या मागणीची धार कमी केली. गेले वर्षभर किरीट सोमय्यांनी परब यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर साखर कारखाना व अन्य प्रकरणात आरोप केले, खासदार भावना गवळी, हसन मुश्रीफ, संजय राऊत व अन्य नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांची चौकशीची चक्रे फिरली, तरी रोख प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातच होता. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात शिवसेनेबाबत अद्यापही मैत्रीच्या आशा असल्याची चर्चा होती.

अनिल परब ः मुंबई महापालिकेच्या बुद्धिबळातील शिवसेनेचा वझीर, उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी मुख्य मोहऱ्यावर आक्रमण

मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेना नेत्यांवर कारवाईचा आसूड उगारला आहेे. भाजपने राजकीय दृष्ट्याही शिवसेनेवरील टीका अधिक प्रखर केली आहे. संजय राऊत, मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे पाटणकर, आमदार प्रताप सरनाईक, स्थायी समिती माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या मालमत्तांवर टाच आणून चौकशीचा फास आवळला गेला आहे. शिवसेना व मातोश्रीचे निकटवर्तीय परिवहन मंत्री अनिल परब हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे निकटवर्ती असून त्यांचे आर्थिक व्यवहार सांभाळतात, असा आरोप किरिट सोमय्या यांनी केला आहे.

परब यांना अटक झाल्यास मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. परब यांच्यावरील कारवाई ही शिवसेना नेत्यांना सूचक इशारा असणार आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा मागे लागत नाहीत, शांत झोप लागते,असे सूचक वक्तव्य भाजपवासी झालेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व त्यानंतरच्या निवडणुकीच्या काळात भाजप आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये नेत्यांच्या प्रवेशासाठी रस्सीखेच होणार आहे. त्यादृष्टीनेही चौकशा टाळायच्या असल्यास भाजपमध्ये यावे,असा इशारा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईतून मिळत असल्याचे एका ज्येष्ठ शिवसेना नेत्याने सांगितले .

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed raid on anil parab bjp targets shivsena uddhav thackeray close aid pmw
First published on: 26-05-2022 at 20:45 IST