सक्तवसुली संचलनालयाने (ED) गुरुवारी (दि. ५ ऑक्टोबर) रोजी पश्चिम बंगालचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते रथीन घोष यांच्या संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर धाड टाकली. पश्चिम बंगालमधील महानगरपालिकेतील नोकर भरती घोटाळ्यामध्ये रथीन घोष यांचे नाव घेण्यात आले आहे. केंद्रीय यंत्रणेने २४ परगणा आणि कोलकातामधील काही ठिकाणीही छापेमारी केली असल्याची माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. अनेक महानगरापालिकांमध्ये नियमांचे उल्लंघन करून आणि पैशांच्या बदल्यात नोकर भरती घोटाळा झाला असल्याची माहिती बाहेर आल्यानंतर कलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणाची खोलवर चौकशी करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर ईडीने या प्रकरणात हस्तक्षेप करत सदर कारवाई केली. ज्या महापालिकेमध्ये घोटाळा झाला, त्या महापालिकेवर २०१४ ते २०१९ या काळात रथीन धोष अध्यक्ष म्हणून काम करत होते, त्यामुळे त्यांची चौकशी होत असल्याची माहिती मिळत आहे. ईडीने केलेल्या आरोपानुसार, रथीन घोष हे मध्यमार्ग महापालिकेचे अध्यक्ष होते, त्या काळात सदर घोटाळा झाला. महापालिकेतील अनेक पदांची भरती काढून पैशांच्या बदल्यात नोकरी दिली गेली, असा आरोप करण्यात आला आहे. ईडी सदर घोटाळ्यातील पैशांच्या देवाणघेवाणीचा माग काढत आहे. तृणमूल काँग्रेस पक्षातील सध्या क्रमांक दोनचे नेते समजले जाणारे अभिषेक बॅनर्जी यांनी दोनच दिवसांपूर्वी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर ही कारवाई झाली आहे. केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजनांसाठीचा पश्चिम बंगालच्या वाट्याचा निधी दिला नाही, असा आरोप करत तृणमूल काँग्रेसच्या वतीने चलो दिल्लीचा नारा देण्यात आला होता. केंद्राकडून निधी मागण्यासह गेल्या काही काळापासून तृणमूलच्या नेत्यांविरोधात केंद्रीय यंत्रणांची जी कारवाई सुरू आहे, त्याबद्दलचा असंतोषही या आंदोलनातून खदखदत होता. कोण आहेत रथीन घोष? रथीन घोष हे उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यममार्ग विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी २०११, २०१६ आणि २०२१ साली असा सलग तीन वेळा याठिकाणाहून विजय मिळविला आहे. मुळचे काँग्रेसी असलेले रथीन घोष यांनी तृणमूल काँग्रेसची १९९८ साली स्थापना होताच, ममता बॅनर्जींच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतली. त्याच वर्षी त्यांनी डाव्यांच्या विरोधात मध्यममार्ग महापालिकेवर विजय मिळविला आणि तृणमूल काँग्रेसचे जिल्ह्यातील पहिले महापालिका अध्यक्ष होण्याचा मान मिळवला. जिल्ह्यातील महापालिका मंडळाचेही अध्यक्षपद भूषविणारे तृणमूल काँग्रेसचे ते पहिले नेते ठरले. २००४ साली तृणमूल काँग्रेसचा स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत पराभव झाला. मात्र घोष यांनी आपले नगरसेवक पद कायम ठेवण्यात यश मिळवले. मध्यममार्ग मतदारसंघात केलेल्या विकासकामामुळे ते याठिकाणी लोकप्रिय आहेत. चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या घोष यांनी तीन वेळा महापालिकेचे अध्यक्षपद भूषविले आहे. मध्यममार्ग शहरात असलेली त्यांची लोकप्रियता आणि नेतृत्वगूण पाहून पक्षाने २०११ साली त्यांना आमदारकीचे तिकीट दिले. सलग तीन वेळा विधानसभेत विजय मिळवूनही त्यांना मंत्रिपदासाठी २०२१ ची वाट पाहावी लागली होती. २०२१ साली पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी घोष यांचा कॅबिनेटमध्ये समावेश करून त्यांना अन्न व पुरवठा खात्याची जबाबदारी दिली. आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत घोष यांच्याशी निगडित एकही वाद निर्माण झालेला नाही.