दीपक महाले

एकनाथ खडसे ऊर्फ नाथाभाऊ. संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेला राजकारणी. स्पष्टवक्ता, संघटन कौशल्य हे गुण आणि राजकारणात उत्तर महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा चेहरा. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातून राजकीय जीवनाची सुरुवात. उच्चशिक्षणासाठी अकोला शहरातील वास्तव्यात महाविद्यालयाच्या निवडणुकांमध्ये भाग घेऊन विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून येऊन नेतृत्वाची सुरुवात युवा अवस्थेतच केली. अकोला येथे १९७४ मध्ये बॉलपेन तयार करण्याचा कारखाना सुरू करून व्यावसायिकतेचा अनुभवही त्यांनी घेतला. शिक्षण घेऊन परत आपल्या मुक्ताईनगरातील शेतीकडे त्यांनी लक्ष दिले. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, विविध कार्यकारी सोसायटी, खरेदी-विक्री सोसायटीत प्रतिनिधीत्व करण्यासह जगजीवनदास इंग्लिश स्कूल, आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा आदी विविध संस्थांमध्ये त्यांचा सहभाग वाढला. स्वत:च्या वेगळेपणामुळे त्यांच्याकडे या विविध स्तरांवरील नेतृत्व येत गेले. यातूनच एक राजकारणी नेतृत्व घडत गेले.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा (पूर्वीचा एदलाबाद मतदारसंघ) पारंपरिकरीत्या काँग्रेसचा म्हणून जिल्ह्यात ओळखला जात होता. १९९० पासून २०१४ पर्यंत विधानसभेच्या सहा निवडणुका खडसे यांनी भाजपकडून लढविल्या. प्रत्येक वेळी त्यांचा विजय झाला. अभ्यासपूर्ण भाषणांद्वारे त्यांनी विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात स्वत:चा ठसा उमटविला. १९९५ ते १९९९ या कालावधीत भाजप- शिवसेना युती शासनात खडसे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, अर्थमंत्री, पाटबंधारेमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. १९९९ नंतर २०१४ पर्यंत ते सातत्याने विरोधी पक्षात राहिले. २००९ ते २०१४ या काळात ते विरोधी पक्षनेते देखील होते. अभ्यासू भाषणांमुळे २०००-२००१ या वर्षी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाकडून ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.

राममराजे नाईक – निंबाळकर : पवारांचे विश्वासू आणि साताऱ्यातील आधारस्तंभ!

भाजपचे बलाढ्य नेते म्हणून ओळखले जाणारे खडसे २०१४ मध्ये भाजप-सेनेची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद गेले. तेव्हापासून खडसे यांच्या नाराजीत वाढच होत गेली. भाजपमध्येही जणूकाही ते दुर्लक्षित झाले. मे २०१६ मध्ये त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले. यात भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरण, दाऊद इब्राहिमच्या बायकोशी कथित संवादासह अन्य आरोपांचा समावेश होता. त्यामुळे चार जून २०१६ रोजी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर भोसरी भूखंड वगळता अन्य आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे निष्पन्न होऊनही त्यांना नंतर मंत्रिपद मिळाले नाही.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारीही नाकारण्यात आली. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना भाजपने उमेदवारी दिली. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र पाटील यांनीही उमेदवारी मागे घेत चंद्रकांत पाटील यांना समर्थन दिले होते.

श्रीकांत भारतीय : अभाविप कार्यकर्ता ते भाजपचे पडद्यामागील रणनीतीकार

पुढे भाजपमध्ये होत असलेली घुसमट सहन न होऊन अखेर खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला तोंड देण्यासाठी राष्ट्रवादीला खडसे यांना रसद पुरविणे गरजेचे झाले होते. विधान परिषदेसाठी त्यांना संधी देण्यामागे राष्ट्रवादीचे हे बेरजेचे राजकारण आहे. या माध्यमातून पावणेतीन वर्षांनी खडसे यांचे राजकीय पुनर्वसन होत आहे.