जयेश सामंत
ठाणे : तीन राज्यातील मोठया विजयामुळे ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या महत्वाच्या जागांवर दावा सांगत दबावतंत्राचे राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांना जशास तसे उत्तर देण्याची रणनिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आखली आहे. त्याचच भाग म्हणून ठाणे, कल्याणसह भिवंडी लोकसभा मतदारसंघावरही दावा करण्याची तयारी पक्षाने केली आहे. यातून भाजप आणि शिंदे सेनेतील अंतर वाढतच जाणार आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होताच ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या काही नेत्यांनी आक्रमक वक्तव्य करण्यास सुरुवात केली. कल्याण पुर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी रविवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना कल्याणसह ठाणे, भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार असेल असे वक्तव्य करत स्थानिक खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. खासदार शिंदे यांनी आपण अशा वक्तव्यांकडे लक्ष देत नाही असे प्रतीउत्तर दिले. त्यावर गायकवाड यांनी ‘ज्यांनी गद्दारी करुन कमी वेळेत अमाप पैसा आणि सत्ता मिळवली त्यांच्यासाठी सगळेच विदुषक’ असे ट्वीट केले. हा वाद ताजा असताना कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी गायकवाड यांचे समर्थन केले. खासदार शिंदे यांना एकत्रितपणे घेरण्याची रणनिती कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि मनसे आमदारांकडून होत असताना गेले काही महिने या प्रकारांकडे दुर्लक्ष करणारे शिंदे गटाचे नेते बुधवारपासून प्रतीहल्ल्याची रणनिती आखण्यासाठी अचानक सक्रिय झाल्याचे पहायला मिळाले.
हेही वाचा… धनंजय-पंकजा मुंडे एकत्र येतील, पण कसे ?
जिल्ह्यातील नेत्यांचे बैठकांचे सत्र
मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांची तातडीची एक संघटनात्मक बैठक बुधवारी ठाण्यातील टेंभी नाका येथे बोलविण्यात आली होती. या बैठकीत आमदार गणपत गायकवाड यांच्या वक्तव्याबद्दल उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. कल्याण आणि ठाणे हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे हे मतदारसंघ भाजपला सोडण्याचा प्रश्नच येत नाही अशी स्पष्ट भूमीका या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. पक्षाचे समन्वयक नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक यांच्यासह ठाणे, पालघर जिल्ह्यातील पक्षाचे नेते या बैठकीत उपस्थित होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असून जिल्हा परिषद तसेच पंयाचत समित्यांमध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे. कल्याण पश्चिम, शहापूर, भिवंडी ग्रामीण या भागात शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे या मतदारसंघावर दावा सांगावा असेही या बैठकीत ठरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून येतात तो मतदारसंघ ठाणे लोकसभेत येतो. त्यामुळे ठाणे लोकसभेवर भाजपने दावा सांगणे हा आपल्याला डिवचण्याचा डाव असल्याने यापुढे या नेत्यांना जशास तसे उत्तर द्यायला हवे असेही या बैठकीत ठरल्याचे समजते.
हेही वाचा… खासदार शिंदे गटाचा, तयारी भाजपाची; पालघर लोकसभेत भाजपाची कुरघोडी?
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पक्षाची संघटनात्मक बैठक बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस घेण्यात आल्या. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यादृष्टीने ही बैठक घेण्यात आली. जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ घेतील. – नरेश म्हस्के, समन्वयक शिवसेना
शिंदे यांच्या पक्षाने भिवंडीच काय महाराष्ट्रातील ४८ जागांवर दावा करावा. त्यांचा तो अधिकार आहे. मी भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्यामुळे माझ्या मतदारसंघात मी माझ्या पक्षाला वाढविण्यासाठी प्रयत्न करत रहाणार. – गणपत गायकवाड, आमदार भाजप