महाराष्ट्रातील आजच्या राजकीय बातम्या : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करून एकनाथ शिंदे यांनी भाजपालाच आव्हान दिले आहे… शिवसेना ठाकरे गटाला रामराम करताच आनंद दुबे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात जाहीर प्रवेश केला… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीच्या आंदोलनावर केलेल्या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला… भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून त्यांचा जिल्हा बँकेचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला… विधान परिषदेच्या पाच जागांवर जर विरोधक निवडून आल्यास ते पुढील सहा वर्षे फक्त आंदोलनच करत बसतील, असा टोला भाजपा नेत्याने लगावला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

एकनाथ शिंदे यांचे थेट भाजपालाच आव्हान

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना जाहीर पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपालाच आव्हान दिले आहे. महायुती म्हणून निवडणुका लढवत असलो, तरी काही ठिकाणी अपवाद म्हणून मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष बाब म्हणजे पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा आपल्याला मिळावी अशी आग्रही मागणी शिंदे गटाची होती. मात्र, भाजपाने ही जागा सोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर शिंदे यांनी मंगेश चिवटे यांना उमेदवारी देऊन भाजपासमोर आव्हान उभे केले होते. पण ऐनवेळी चिवटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीतील मतभेद मिटल्याचे संकेत मिळाले होते. आता मात्र त्यांनी अपक्ष उमेदवार सानप यांना पाठिंबा दिल्याने ही निवडणूक केवळ उमेदवारांमधील लढत न राहता महायुतीतील राजकीय समन्वयाचीही परीक्षा ठरण्याची शक्यता आहे.

ठाकरेंची साथ सोडताच आनंद दुबे शिंदेसेनेत

शिवसेना ठाकरे गटाला रामराम केल्यानंतर आनंद दुबे यांनी आज शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाची राजकीय ताकद आणखीनच वाढली आहे. ठाकरेसेनेत असताना दुबे यांच्याकडे राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी होती. तसेच ते पक्षाचा हिंदी भाषिक चेहरा असलेले नेतेही म्हणून ओळखले जात होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. पक्षनेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्यामुळे दुबे यांनी हा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. ठाकरेसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आनंद दुबे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ज्या ट्रेनमध्ये झुरळे आहेत, त्यातून मी प्रवास करणार नाही, असे स्पष्ट केले होते. तसेच निवडणूक आयोग आणि एसआयआरच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेशी मी सहमत नव्हतो. मी कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दर्शवू शकत नाही. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे असे दुबे यांनी सांगितले होते.

संजय राऊत यांचा फडणवीसांवर घणाघात

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडी नेत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. विरोधकांना मतदार याद्यांमधील शुद्धीकरण नको असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना लक्ष्य केले आहे. एसआयआरही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. पण त्या यादीतील मृत पावलेल्या मतदारांच्या ठिकाणी भाजपचे लोक जाऊन मतदान करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच फडणवीसांनी शुद्धीकरणाची व्याख्या समजून घ्यावी, अशी टीकाही त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपण एक सुशिक्षित मुख्यमंत्री असल्याचे भान ठेवले पाहिजे आणि संविधानाचा देखील सन्मान केला पाहिजे. निवडणूक आयुक्तांना घरघडी आणि हरकाम्या समजून नये, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून त्यांचा सांगली जिल्हा बँकेचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे. या निर्णयामुळे पडळकर यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सांगली जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी पडळकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्याचवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी ही हरकत फेटाळून लावत पडळकर यांची उमेदवारी वैध ठरवली होती. याविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी घेताना न्यायालयाने पडळकर यांचा अर्ज वैध ठरवला होता. यादरम्यान पडळकर यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची आज दुपारी सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून पळकर यांचा अर्ज वैध ठरवला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांची विरोधकांवर टीका

विधान परिषदेच्या पाच जागांवर जर विरोधक निवडून आल्यास ते पुढील सहा वर्षे फक्त आंदोलनच करत बसतील, असा टोला भाजपाचे नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे लगावला. विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणूक बंडखोरीमुळे चांगलीच गाजत असताना बावनकुळे यांनी आज अमरावतीत महायुतीचा संयुक्त मेळावा घेऊन महायुतीचे सर्व नेते एकत्रित असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेसाठी सोडण्याचा निर्णय हा महायुतीने घेतला. यावेळी महायुतील नेत्यांना संबोधित करताना विरोधक निवडून आले, तर सहा वर्षे घोषणा देतील. आंदोलने करतील, मोर्चे काढतील. शिक्षकांचे मूळ प्रश्न सुटणार नाहीत. फक्त सरकारला शिव्या देत राहतील. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व घटक पक्षांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी विजय महत्वाचा आहे. महायुतीची शक्ती ही निश्चितपणे महाराष्ट्राला दिसेल, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.