scorecardresearch

Premium

एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?

शिवसेनेवर हक्क सांगायचा असेल, तर ठाकरे यांना दूर करून पक्षप्रमुख पदावर शिंदे यांना दावा करावा लागणार आहे.

एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?

उमाकांत देशपांडे

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करण्याची शक्यता असून केंद्रीय निवडणूक आयोगापुढील सुनावणीसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी करण्यात येत आहे. विधिमंडळ गटनेते पदाबरोबरच पक्षाची सूत्रेही आपल्याकडेच आहेत आणि विधिमंडळ पक्षाबरोबरच संघटनेतील महत्त्वाचे पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत, हे शिंदे यांच्याकडून आयोगापुढे मांडले जाणार आहे.

खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाकडे राहणार, या मुद्यावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे व शिंदे गटाला सात ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे व पुरावे सादर करण्यासाठी आयोगाने मुदत दिली आहे. विधिमंडळातील किती आमदार व लोकसभेतील खासदार बरोबर आहेत, त्यांच्या पाठिंब्याची पत्रे आणि लोकसभा अध्यक्ष व विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या गटाला मान्यता दिल्याची पत्रे शिंदे यांनी सादर केली आहेत. पण पक्षावर पकड असून संघटनेतील बहुसंख्य पदाधिकारी बरोबर असल्याचे पुरावे शिंदे यांना द्यावे लागणार आहेत.

हेही वाचा : मिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती

शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीत २०१८ ते २०२३ या कालावधीसाठी उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदी निवड केल्याची कागदपत्रे आयोगास सादर करण्यात आली आहेत. शिवसेनेवर हक्क सांगायचा असेल, तर ठाकरे यांना दूर करून पक्षप्रमुख पदावर शिंदे यांना दावा करावा लागणार आहे. त्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक किंवा अधिवेशन घेण्यात आले व शिंदे हे पक्षप्रमुख निवडले गेले, हे शिंदे यांना दाखवावे लागणार आहे.

हेही वाचा : पुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटातील राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी, जिल्हा, तालुका प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वांच्या पाठिंब्याने शिंदे हेच पक्षाचे प्रमुख असल्याचे आयोगापुढे सिध्द केले जाणार आहे. त्यादृष्टीने शिंदे यांची पक्षप्रमुख निवड बुधवारी करावी, असा विचार असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. आयोगापुढे शपथपत्र सादर करून तसा दावा करता येईल. पण बहुसंख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड झाली, हे दाखवून देण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया पार पाडण्याचा विचार करण्यात येत आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना संघटनेवरही ताबा किंवा सूत्रे हाती घेतल्याचे दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे संबंधितांनी सांगितले.

दरम्यान, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडेच राहील. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ते आम्हालाच मिळेल. ते काढून घेण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, आम्ही कायदेशीर लढा देवू, असे शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी ‘ लोकसत्ता ‘ ला सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या