आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : ठाण्यातील दिवा परिसरातून निवडून आलेल्या शिंदेसेनेच्या नऊ नगरसेवकांविरोधात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने थेट न्यायालयात धाव घेतली… आमदार रोहित पवार यांच्या खळबळजनक दाव्यानंतर महायुतीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाची थट्टा नको, अनेक देशांत लॉकडाऊन लागले आहे, असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला… नाशिकमधील खरात प्रकरणाची चर्चा मागे पडावी म्हणून मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला… सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपाच्या एका दिग्गज नेत्याचा फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदेंचे ९ शिलेदार ठाकरे गटाच्या रडारवर

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दिवा परिसरातून निवडून आलेल्या शिंदेसेनेच्या नऊ नगरसेवकांविरोधात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने थेट न्यायालयात धाव घेतली. या नगरसेवकांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात कथितरित्या चुकीची, अपूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात न्यायालयात रिट पिटीशन दाखल करण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाचे पदाधिकारी ॲड. रोहिदास मुंडे यांनी दिली. या प्रकरणात रमाकांत मढवी, शैलेश पाटील, आदेश भगत, दीपक जाधव, साक्षी मढवी, दर्शना म्हात्रे, अर्चना पाटील, दिपाली भगत आणि स्नेहा पाटील या नगरसेवकांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांनुसार निवडणूक शपथपत्रात चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण मानले जाते. जनप्रतिनिधींनी मतदारांपासून तथ्य लपविल्यास संबंधित निवडणूक रद्द होण्यासह लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील तरतुदींनुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे ॲड. रोहिदास मुंडे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या याचिकेमुळे शिंदे गटातील नगसेवकांचे पद धोक्यात आल्याची चर्चा आहे.

महायुतीत लवकरच राजकीय भूकंप?

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राजकीय हालचालीबाबत मोठा दावा करीत राज्यात नवीन चर्चेचा विषय निर्माण केला. सध्या सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भविष्यात भाजपामधूनच निवडणूक लढवतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. “काहीही झाले तरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपामधूनच लढणार आहेत. त्यांच्यासोबत २२ आमदारांचेही ठरलेले आहे. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांचेही जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता मोघम बोलून चालणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तटकरे यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक झाली, तर ते निवडून येणार नाहीत. शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल, असा दावा त्यांनी केला.

पंतप्रधानांच्या आवाहनाची थट्टा नको : फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाची थट्टा नको, अनेक देशांत लॉकडाऊन लागले आहे, असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांत खनिज तेलाचा तुटवडा निर्माण होण्याचे चिन्हे आहेत. आयातीसाठी सध्या मोठ्या प्रमाणावर परदेशी चलन खर्च होत असल्याने पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेल काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचक इशारा दिला आहे. सध्या वैश्विक संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला सकारात्मक पद्धतीने घ्यायला हवे. अनेक देशांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनसारखी स्थिती आहे, पेट्रोल महाग झालंय, ३-४ दिवस इंधन मिळत नाहीये. अशा संकटाच्या काळात आर्थव्यवस्था रुळावर ठेवण्यासाठी पंतप्रधान काही उपाय सुचवत असतील तर त्याला गांभीर्याने घ्यायला हवे. आणि विरोधकांना त्यावर अंमल करायचा नसेल तर किमान त्यांनी चेष्टा तरी करु नये, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.

इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

नाशिकमधील खरात प्रकरणाची चर्चा मागे पडावी म्हणून मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला, असा आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला. केवळ आरोप आहे म्हणून मतीन पटेलच्या घरावर जर कारवाई झाली मग अशीच कारवाई अशोक खरातवर का नाही, खरे तर खरात प्रकरणातील धागेदारे लांबपर्यंत गेले आहेत. त्याची चर्चा होऊ नये म्हणून भाजपाचे नेते हे सारे घडवून आणत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही घर बेकायदा नाही. एकच मतीन पटेल याचे घर तेवढे अनाधिकृत होते. ते महापालिकेने पाडले, बरे झाले अशी तिरकस प्रतिक्रिया जलील यांनी दिली. सरकारला अशोक खरात प्रकरणाची चर्चा वळवायची आहे. कारण त्याचे धागेदारे अनेक बड्या नेत्यांपर्यंत जातात, पण ती चर्चा सुरू राहिली तर सरकारला अडचणीची ठरली असती. त्यातून लक्ष बाजूला जावे म्हणून हे सारे घडवून आणले जात आहे, असा दावाही त्यांनी केला. निदा खान प्रकरणात नगरसेवक मतीन पटेल याने मदत केली नाही, त्याचे स्वरुप काय होते, याचा तपास पोलीस करतील. मात्र, केवळ माध्यमाच्या आधारित न्याय कसोटी लावत अन्याय केला जात असल्याचा एमआयएमचा दावा आहे, असेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील खरातच्या पाया पडतानाचा फोटो

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांचा एक फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. या फोटोत चंद्रकांत पाटील हे नाशिक येथील भोंदू अशोक खरात याच्या पाया पडताना दिसून येत आहेत. या फोटोबरोबरच दमानिया एक पोस्टही लिहिली आहे. चंद्रकांत पाटील हे राज्याचे माजी मंत्री आहेत. तसेच ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी किमान अशा माणसाच्या पाया पडण्याआधी स्वतःच्या वयाचा विचार करायला हवा होता, असेही दमानियांनी म्हटले आहे. अंजली दमानिया यांनी खरातवर प्रकरणावरून भाजपाच्या नेत्यावर टीका केल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करीत भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, सिन्नरमधील पराभूत उमेदवार उदय सांगळे, विधान परिषदेचे आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, दादा भुसे यांचे पीए रामदास खेडकर, दीपक केसरकर, एकनाथ शिंदे, प्रभाकर काळे, सुनील तटकरे आणि शरद पवार पक्षाचे जयंत पाटील हे सगळे अशोक खरातच्या संपर्कात होते, असा आरोपही अंजली दमानियांनी केला आहे.