आजच्या महत्वाच्या राजकीय बातम्या : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी मोठा दावा केला… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केले… दिशा सालियन प्रकरणात राजकीय हेतूने आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला… अमित शाह काय बोलले हे विरोधकांनी पूर्ण ऐकले असते, तर त्यांची थोबाडे काळी झाली असती, असा टोला फडणवीसांनी लगावला… मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन कोणाच्यातरी इशारावरून सुरू असल्याचा आरोप राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात मोठा दावा
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला. शिवसेनेच्या बाबतीत विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने जो निकाल दिला तो योग्यच असून त्यात घटनेचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही. पक्ष आणि चिन्ह कुणाचे हे आमदार आणि खासदारांच्या संख्याबळावर ठरवण्यात आले आणि निवडणूक आयोगाला तसा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असा दावाही त्यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विचारधारेच्या विरोधात भूमिका घेत काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच आमदार आणि खासदारांनी वेगळी भूमिका घेतली होती. त्यामुळेच ही राजकीय पक्षातील फूट होती, असेही ते म्हणाले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.
फडणवीसांचे मनोज जरांगेंना आवाहन
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले. काही मोजक्याच सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांचा ताफा मुंबईकडे निघाला आहे. मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसण्यावर जरांगे ठाम आहेत. मुंबई पोलिसांकडे त्यांनी परवानगीसाठी याआधीही अर्ज केले होते; पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली. या संपूर्ण घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे यांनी सरकारकडे एकूण १३ मागण्या केल्या होत्या. त्यातील १२ मान्य करण्यात आल्या असून एक मागणी मान्य झाली नाही. त्यामागे कायद्याची काय अडचण होती हे त्यांना समजून सांगण्यात आले. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात लोकांना त्रास होणार नाही असा त्यांनी निर्णय घ्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले. मुंबई-पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना त्यात कुठलेही विघ्न येऊ नये अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ठाकरेंबाबत रोहित पवार काय म्हणाले?
दिशा सालियन प्रकरणात राजकीय हेतूने आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात असून, यापूर्वीही सुशांतसिंह राजपूत प्रकरणात असेच घडले होते, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. नागपुरात माध्यमांशी बोलताना न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत त्यांनी सीबीआयच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. दिशा सालियन प्रकरणात राजकीय दृष्टिकोनातून काही लोकांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले. मात्र, यापूर्वी त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. या प्रकरणातही आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट मिळेल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. सीबीआयवर विश्वास नसला तरी आगामी काळात सीबीआय आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट देईल, असेही ते म्हणाले. पुढील तीन वर्षांत कोणत्याही निवडणुका नसताना आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात असेल, तर लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका मुदतपूर्व घेण्याचा सरकारचा विचार आहे का, अशी शंका वाटत असल्याचे पवार यांनी नमूद केले.
देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर घणाघात
अमित शाह काय बोलले हे विरोधकांनी पूर्ण ऐकले असते, तर त्यांची थोबाडे काळी झाली असती, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. दोन दिवसापूर्वी नवी मुंबईत राजभाषा संमेलन पार पडले. या संमेलनासाठी अमित शाह यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. याच मुद्द्याला हाताशी धरून ठाकरे गटासह मनसेने भाजपावर टीका केली. या टीकेला फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. विरोधकांनी अमित शाह यांचे संपूर्ण भाषण शांतपणे ऐकले असते, तर अशी टीका करण्याची वेळच आली नसती. महाराष्ट्रात मराठी भाषेचे स्थान किती महत्त्वाचे आणि योग्य आहे, हेच शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले होते. त्यांचे भाषण पूर्ण ऐकले असते, तर विरोधकांची थोबाडे काळी झाली असती, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
“जरांगे यांचे आंदोलन कोणाच्यातरी इशारावरून”
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन कोणाच्यातरी इशारावरून सुरू असल्याचा आरोप राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केला. ज्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याचे काम केले त्यांच्याबद्दल आज जनतेत अपप्रचार केला जात असल्याचे लोकांना देखील कळून चुकले आहे, असेही ते म्हणाले. जात प्रमाणपत्र देणाऱ्या समितीकडे प्रत्येक गोष्टीची तपासणी करण्याची जबाबदारी असते. त्यांनी काही चुकीचे केले असेल तर न्यायालयात दाद मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, राज्यात अशा पद्धतीने अराजकतेचे वातावरण निर्माण करणे चुकीचे आहे. ज्यांनी सर्वात जास्त मराठा समाजाला न्याय दिला त्यांच्याबद्दल समाजात भ्रम निर्माण करणे योग्य नाही, असेही आशिष जयस्वाल म्हणाले. तसेच जरांगे पाटील यांचे आंदोलन कोणाच्यातरी इशारावरून सुरू असल्याचा आपल्याला संशय असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या या विधानावर आता जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
