आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाचे पद तातडीने रद्द करण्यात आले… आमदार बच्चू कडू यांच्यावर नाराज असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला… मंत्री संजय शिरसाट यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात डोकावण्याचा अधिकार कुणी दिला? असा संतप्त सवाल आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी उपस्थित केला… मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेशांतर करून प्रत्येक पेट्रोल पंपावर फिरावे आणि इंधनाची स्थिती तपासावी, असा टोला काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी लगावला… उद्धव ठाकरे यांनी मला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द देऊनही प्रत्यक्षात मात्र राज्यमंत्रिपदच दिले होते, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का
उल्हासनगर महापालिकेतील शिंदेसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक विक्कीसिंग दर्शनसिंग लबाना यांचे पद रद्द करण्यात आले. महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ (अ) या राखीव प्रभागातून विक्कीसिंग लबाना हे निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी नियमानुसार आपले जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केले. मात्र, नाशिकच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यामुळेच लबाना यांचे नगरसेवकपद रद्द ठवण्यात आल्याचे समोर आले आहे.
शिवसेना ठाकरे गटात अनेकांचा प्रवेश
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर बक्षीस म्हणून त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. मात्र, बच्चू कडू यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रहारचे अनेक पदाधिकारी नाराज झाले होते. याच नाराजीतून मराठवाड्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ठाकरे गटाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या पक्षप्रवेशाची माहिती देण्यात आली. या पक्षप्रवेस सोहळ्याला विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे, जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मंत्री शिरसाटांवर संताप
मंत्री संजय शिरसाट यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात डोकावण्याचा अधिकार कुणी दिला? असा संतप्त सवाल आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री शिरसाट यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिरसाट यांची तक्रार केली. त्यानंतर आता आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिरसाट यांना सुनावले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात डोकावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही तुमच्या पक्षाचे बघावे, असा संतप्त सवाल चिखलीकर यांनी उपस्थित केला. आमच्या पक्षातील नेमके कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, त्यांची नावे उघड करा, असे आव्हानही त्यांनी शिरसाट यांना दिले.
सतेज पाटील यांचा फडणवीसांना टोला
एकनाथ शिंदे यांना फोडण्यासाठी मुख्यमंत्री रात्री वेशांतर करून जात होते. त्याप्रमाणे प्रत्येक पेट्रोल पंपावर त्यांनी वेशांतर करून फिरावे आणि पेट्रोल-डिझेल शिल्लक आहे की नाही हे तपासावे, असा टोला काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी लगावला. इंधन दरवाढीविरोधात आज कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सामील झाले होते. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्यामुळे देशात महागाई वाढली आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मंत्री छगन भुजबळ हे पेट्रोलचा एक महिना पुरेल इतका साठा असल्याचे सांगतात, तर मुख्यमंत्री फडणवीस दोन महिने पुरेल इतका साठा असल्याचे सांगतात, असे असेल तर मग पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा का लागत आहेत, असा प्रश्न सतेज पाटील यांनी उपस्थित केला.
आमदार बच्चू कडू यांचा मोठा दावा
उद्धव ठाकरे यांनी मला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द देऊनही प्रत्यक्षात मात्र राज्यमंत्रिपदच दिले होते, असा दावा शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी केला. आमच्या मतांमुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना पाठिंबा दिला होता, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता, घरी बोलवून त्याला मंत्रिपद दिले ही माझी चूक झाली, जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत याचा मला आनंद आहे, असे ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
