Vidhan Parishad Election Mahayuti Seat Sharing Dispute : राज्यात २२ जून रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत निर्माण झालेली नाराजी तूर्तास शमली. मात्र, हा वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागल्याने सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले. या जागावाटपातील वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये विशेष नाराजी असल्याचे दिसून आले. शिंदे गटाने सुरुवातीला विधान परिषदेच्या सात जागांची मागणी केली होती; पण प्रत्यक्षात त्यांना केवळ चारच जागांवर समाधान मानावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर
महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने तब्बल ११ जागांवर आपले उमेदवार उभे केले, तर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अवघ्या दोनच जागा सोडण्यात आल्या. महायुतीच्या जागावाटपाच्या या निर्णयामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरल्याचे दिसून आले. विशेषत: ज्या जिल्ह्यांमध्ये शिंदेसेनेच्या नेत्यांना आपल्या पक्षाचा दावा अधिक मजबूत असल्याचे वाटत होते, त्या ठिकाणच्या जागा ऐनवेळी मित्रपक्षांना सोडण्यात आल्याने त्यांच्यातील नाराजी आणखीनच वाढत गेली. शिंदे गटातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, हा वाद केवळ जागांच्या संख्येपुरता मर्यादित नसून पक्षाचे आक्रसत चाललेले राजकीय अस्तित्व आणि शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजपाच्या वाढत्या वर्चस्वाशी संबंधित आहे. शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपाचा प्रभाव वाढत असल्याने पक्षात सध्या नाराजीचे वातावरण आहे. अनेक स्थानिक नेत्यांना असे वाटत होते की, काही भागांमध्ये शिवसेनेला अपेक्षित राजकीय स्थान मिळत नाही. निवडणूक प्रक्रियेदरम्यान हीच नाराजी उघडपणे समोर आली, असेही या नेत्याने स्पष्ट केले.
पारंपरिक बालेकिल्ल्यांत शिवसेना बॅकफूटवर?
महायुतीतील जागावाटपाचा हाच पॅटर्न राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये पाहायला मिळाला. एकसंध शिवसेनेचा पारंपारिक गड म्हणून ओळखला जाणारा छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला गेला, तर कोकण पट्ट्यात शिवसेनेचे प्रभुत्व असलेला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आला. यादरम्यान भाजपाने आपल्याकडे खेचून घेतलेल्या जळगाव मतदारसंघावरूनही महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठी चर्चा रंगली. याउलट, शिवसेनेच्या ताब्यात राहिलेल्या ठाणे-पालघर मतदारसंघात मात्र कोणताही वाद पाहायला मिळाला नाही. छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात महायुतीत सर्वात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. या मतदारसंघातून शिंदेसेनेचे आमदार व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार सुहास शिरसाट यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या घडामोडीनंतर अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये भाजपाचा वाढता प्रभाव उघडपणे टीका केली.
अब्दुल सत्तारांचे बंड आणि महायुतीतील संघर्ष
भाजपाने आधी आमचे हात-पाय तोडले, आता ते मुंडकेही छाटत आहे, अशा शब्दांत सत्तार यांनी आपली नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिंदेसेनेचा घटलेला प्रभाव अधोरेखित करताना सत्तार म्हणाले की, आमच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्षपद नाही, महानगरपालिका नाही आणि आता विधानपरिषदेची जागाही राहिलेली नाही. या वादामागे स्थानिक राजकीय समीकरणांचाही मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष उफाळून आला. या बँकेवर सत्तार समर्थकांचे वर्चस्व असल्याने समीर सत्तार यांची बंडखोरी ही जिल्हा बँकेवरील नियंत्रण कायम ठेवण्यासाठी दबावतंत्राचा भाग असल्याचे अनेकांचे मत होते. जिल्ह्यातील ही बँक अत्यंत प्रभावशाली संस्था मानली जाते. दरम्यान, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा वाद निवळला. या बैठकीनंतर समीर सत्तार यांनी विधानपरिषदेचा आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
हक्काची जागा गमावल्याने शिवसेनेत नाराजी
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आल्यानंतर कोकणातही महायुतीत असाच संघर्ष पाहायला मिळाला. राष्ट्रवादीने या जागेवरून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली. त्याला शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या गोटातून तीव्र विरोध झाला. कारण- त्यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचे नाव या जागेसाठी चर्चेत होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर गोगावले यांनी मवाळ भूमिका घेतली आणि हा वाद मिटला. हा वाद मिटतो न मिटतो, तोच शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नंतर त्यांनी माघार घेतली असली तरी या घडामोडींमुळे महायुतीतील नाराजी स्पष्टपणे दिसून आली. मुलीने निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे आमदार महेंद्र दळवी यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. कोकणातील काही नेत्यांनी आपली राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. हा लढा पक्षासाठी आणि जिल्ह्यातील पक्षाचे महत्त्व कायम राखण्यासाठी आहे, असे दळवी यांनी स्पष्ट केले.
‘नाशिक-जळगाव’ अदलाबदलीवरून वाद
जळगाव मतदारसंघातील वादातून महायुतीतील संघर्षाची एक वेगळीच बाजू समोर आली. उत्तर महाराष्ट्रातील या जागेवर शिवसेनेचाच हक्क असायला हवा, असा युक्तिवाद पक्षातील काही नेत्यांनी केला होता. त्यासाठी भाजपसोबत ‘जळगाव आणि नाशिक’ जागांच्या संभाव्य अदलाबदलीबाबत चर्चाही झाली होती. मात्र, अंतिम जागावाटपाच्या सूत्रानुसार नाशिकची जागा शिवसेनेला तर जळगावची जागा भाजपाकडे गेली. नाशिकमधून शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असतानाच भाजपाशी संबंधित गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. या घडामोडींमुळे महायुतीत काही काळ राजकीय तणाव निर्माण झाला होता. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने केलेल्या मध्यस्थीनंतर हा वाद अखेर मिटला. दरम्यान, भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, बहुतांश वाद हे स्थानिक पातळीवरील राजकीय महत्त्वाकांक्षांमुळे निर्माण झाले होते. बऱ्याच जणांना हे ठाऊक होते की, त्यांच्याकडे जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ नाही. मात्र, केवळ आपले म्हणणे आणि आपल्या भावना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचाव्यात यासाठीच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
