आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी आपल्या आमदारकीचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याने ते भाजपाच्या वाटेवर असल्याची कुजबूज सुरू झाली… बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे आभार मानले… उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत अजित पवार यांची आठवण काढताना खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या… मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून भाजपाचा २०२७ मध्ये निवडणुका घेण्याचा डाव होता, असा आरोप रोहित पवार यांनी केला… छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिंदे गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदेंचा शिलेदार भाजपाच्या वाटेवर?

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार महेश शिंदे गटात सुरू झालेली धुसफूस थांबण्याचे नाव घेत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी सातारा दौऱ्यावर आलेले असतानाच त्यांच्या कार्यक्रमाकडे आमदार शिंदे यांनी पाठ फिरवल्याने हा वाद चव्हाट्यावर आला आहे. शिंदे यांच्या कार्यक्रमांची मला काहीही माहिती किंवा निमंत्रण नसल्याचे शिंदे यांनी सांगितले; तर शंभूराज देसाई यांनी पक्षात पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्याची पद्धत नसल्याचे स्पष्ट केले. यादरम्यान महेश शिंदे यांनी आपल्या मनातील खदखद उघडपणे बोलून दाखवली. इतक्यावरच न थांबता त्यांनी आपल्या आमदारकीचे श्रेयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. महेश शिंदे यांच्या या भूमिकेमुळे ते भाजपात जाणार असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. त्यातच भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी शिंदे यांच्या निर्णयाचे समर्थन केल्यामुळे या चर्चेला आणखीनच हवा मिळाली आहे.

फडणवीसांनी मानले काँग्रेसचे आभार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळात दिला. बारामतीकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह काँग्रेस पक्षाचेही आभार मानले. अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा आमचा प्रयत्न होता. शरद पवार यांनीही मला फोन करून सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यानंतर मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा करून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. त्यांनीही माझ्या विनंतीला मान देऊन पक्षाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. बारामतीत जरी मी सभा घेतली नसती, तरी बारामतीकरांनी सुनेत्रा वहिनींना निवडून दिले असते, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा : भाजपाच्या उमेदवाराकडे कोट्यवधींची मालमत्ता; ममता बॅनर्जी यांच्याकडे ना घर… ना गाडी!

अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे भावूक

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. आज घेण्यात आलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार सुप्रिया सुळे अत्यंत भावूक झाल्या होत्या. “गेले दोन-अडीच महिने आपल्या सगळ्यांसाठी खूप कठीण होते. दादा आज आपल्यात नाहीत, यावर आजही कोणाचा विश्वास बसत नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवसाची आठवण सांगताना सुप्रिया सुळे यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी सभेला उपस्थित असलेल्या बारामतीकरांचेही डोळे पाणावले होते. बारामती आणि पवार कुटुंबाचे नाते सहा दशकांचे आहे. बारामतीकरांनी कधीही पवारांची साथ सोडली नाही. आता सुनेत्रा वहिनींच्याही असेच पाठिशी उभे राहा, असे आवाहन त्यांनी बारामतीकरांना केले.

रोहित पवार यांचा भाजपावर गंभीर आरोप

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून भाजपाचा २०२७ मध्ये निवडणुका घेण्याचा डाव होता, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ‘अब की बार ४०० पार’ असा नारा दिला होता. जर ते निवडून आले असते तर त्यांनी संविधान बदलले असते, असा दावाही त्यांनी केला. आता खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न हा संविधान बदलण्याचाच प्रयत्न चालू होता. केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या नावाखाली आणलेले मतदारसंघ पुनर्रचना विधेयक विरोधकांच्या एकजुटीमुळे लोकसभेत पराभूत झाले. परंतु ते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी इंडिया आघाडी महिलाविरोधी असल्याचा खोटा प्रचार करीत असल्याची टीकाही रोहित पवार यांनी केली. तसेच २०२९ ला निवडून येण्याची खात्री नसल्याने घाईघाईने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून २०२७ किंवा २०२८ मध्ये निवडणुका घेण्याचा घाट भाजपाने घातल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा : मतदारसंघ पुनर्रचनेवरून संसदेत जम्मू-काश्मीरचा दाखला; विरोधकांनी भाजपाला कसे कोंडीत पकडले?

स्वीकृत नगरसेवक निवडीवरुन शिंदे गटातील वाद

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिंदे गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप या पदासाठी इच्छूक असलेल्या विनोद बनकर यांनी केला. राजेंद्र जंजाळ हे जिल्हाप्रमुख असल्याने ते वरिष्ठांना हव्या त्या पद्धतीने माहिती देतात. खरे तर रविवारी रात्री पर्यंत माझे नाव यादीमध्ये होते; पण अचानक ते जातीयवादातून वगळण्यात आले, असा दावाही बनकर यांनी केला. यादरम्यान शहरातील क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांचा जयघोष तर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा निषेध कार्यकर्त्यांनी केला. पालकमंत्री संजय शिरसा आणि राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून वाद सुरू आहेत. अगदी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोरही वाद झाले होते. आता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरुनही शिवसेनेच्या शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.