आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे योग्य नाही, असे मत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर मांडले… कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटले असून नागपुरात संतप्त आंदोलकांनी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली…नवी दिल्लीत आज सुरू असलेल्या आंदोलनाचे श्रेय फक्त भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना जाते, असा उपरोधिक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला… संसद भवनाजवळ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वाड्रा यांनी तीव्र शब्दात निषेध केला… भाजपाचे नेते सुरुवातीपासूनच घोटाळेबाज असल्याचे म्हणत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकेची तोफ डागली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिंदे गटाची भूमिका भाजपासाठी अडचणीची?
दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरून संसद भवनाकडे निघालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सामील झालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. या घटनेत काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे वृत्त आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांचे आंदोलन हे शांततेच्या मार्गाने चालू होते. विद्यार्थ्यांवर लाठीमार व्हायला नको होता आणि त्याचे समर्थन आम्हीही करणार नाही, असे मंत्री शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यांच्या याच विधानाला हाताशी धरून विरोधक भाजपाला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. यादरम्यान सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले असताना त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर सरकारने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आंदोलन दडपण्याचा केंद्र सरकारचा कोणताही हेतू नाही. लवकरच विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक तोडगा निघणार असल्याचे मला वाटते, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.
नागपुरात भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी
दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. मुंबईसह पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यांवर उतरून केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातही दुपारच्या सुमारास आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी केली. संविधान चौकातून सुरू झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे तसेच विविध मागण्यांचे फलक घेतले होते. अनेक वर्षे मेहनत करूनही परीक्षा रद्द होणे किंवा निकालांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे ही चिंतेची बाब असल्याचा सूर विद्यार्थ्यांमधून दिसून येत होता. केंद्र सरकारने याबाबत कठोर उपाययोजना करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी केली. आंदोलनावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
संजय राऊत यांचा सरन्यायाधीशांना टोला
NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये सामील झालेल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार करत अश्रूधुरांचा वापर केला. याच मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच त्यांनी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना उपरोधिक टोलाही लगावला. ‘मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल सरन्यायाधीशांचे आभार’ अशा आशयाची पोस्ट संजय राऊत यांनी समाजमाध्यमांवर शेअर केली. आज जे आंदोलन सुरू आहे त्याचे श्रेय हे फक्त सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच जाते. त्यांनी देशातील मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल आभार, असे राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. त्यांच्या या पोस्टची सध्या समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.
विद्यार्थ्यांवरील लाठीमारानंतर काँग्रेसचा संताप
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सामील झालेल्या विद्यार्थ्यांनी संसद भवनावर मोर्चा काढून घोषणबाजी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दिल्ली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांवर लाठीमार केला. या सर्व घडामोडींवरून आता दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका होत आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या तथा खासदार प्रियंका गांधी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी या लाठीचार्जवरून सरकारला खडे बोल सुनावले. आपलीच मुले आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज कशाला? असा प्रश्न प्रियांका यांनी उपस्थित केला. एकीकडे सर्वजण सरकारला चर्चा करा, असे म्हणत आहेत. आपल्या शिक्षण व्यवस्थेत काही त्रुटी असून इतरही काही अडचणी आहेत. मात्र, सरकार यावर बोलायला आणि चर्चा करायला तयार नाही. उलट विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचा मारा आणि लाठीचार्ज केला जात आहे. हे नेमके कशासाठी अशी टीकाही त्यांनी केली आहे.
अखिलेश यादव यांची भाजपा सरकारवर टीका
दिल्लीच्या जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारवर लक्ष्य केले आहे. हे सरकार नसून निव्वळ अहंकार आहे. या सरकारने श्रद्धांजली वाहण्यातही भेदभाव केला असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे अत्यंत हताश होऊन अनेक विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले आहे. मात्र, या सरकारने त्यांच्याप्रति एक अवाक्षरही काढले नाही किंवा त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. यापेक्षा मोठा सरकारचा अहंकार दुसरा काय असू शकतो, असा शब्दात अखिलेश यांनी सरकारला सुनावले आहे. भाजपाचे लोक सुरुवातीपासूनच घोटाळेबाज असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. देशात आतापर्यंत २० हून अधिक वेळा विविध परीक्षांचे पेपर लीक झाले, मात्र या प्रकरणांमधील मुख्य आरोपींना पकडले जात नाही. कारण- या पेपरलीक प्रकरणांमागे भाजपशी संबंधितच लोक आहेत, अशी टीकाही अखिलेश यांनी केली आहे.
