scorecardresearch

शिवसेनेचे आमदार वैभ‌‌‌‌व नाईक आणि राजन साळवींच्या सरकार हात धुवून मागे लागले

साळवी यांचे स्वीय सहाय्यक सुभाष मालप, तर बांधकाम व्यवसाय असलेल्या आमदार नाईक यांच्याकडून फ्लॅट विकत घेतलेल्या सामान्य नागरिकांनासुध्दा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.

Eknath Shinde government, MLA Vaibhav Naik, Rajan Salvi, anti corruption bureau
शिवसेनेचे आमदार वैभ‌‌‌‌व नाईक आणि राजन साळवींच्या सरकार हात धुवून मागे लागले ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

सतीश कामत

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर राहिलेले कोकणातील आमदार राजन साळवी आणि वैभव नाईक यांच्या मालमत्तेची चौकशी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता या दोघांशी संबंधित राजकीय कार्यकर्ते आणि ग्राहकांना लक्ष्य केले आहे. साळवी यांचे स्वीय सहाय्यक सुभाष मालप, तर बांधकाम व्यवसाय असलेल्या आमदार नाईक यांच्याकडून फ्लॅट विकत घेतलेल्या सामान्य नागरिकांनासुध्दा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सहा आमदारांपैकी योगेश कदम, उदय सामंत आणि दीपक केसरकर हे तिघेजण शिंदे गटामध्ये सहभागी झाले आहेत. पण भास्कर जाधव, राजन साळवी आणि वैभव नाईक हे तीन ज्येष्ठ आमदार अजूनही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. त्यातही साळवी आणि नाईक यांची राजकीय ताकद लक्षात घेऊन त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच गेल्या काही महिन्यात या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे नोटीसा पाठवून त्यांची दोन वेळा चौकशी करण्यात आली. आता पुढची कडी म्हणजे, नाईक यांचा बांधकाम व्यवसाय असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून सदनिका खरेदी केलेल्या सामान्य नागरिकांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटिसा पाठवल्या असल्याची माहिती स्वतः नाईक यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. त्याचबरोबर त्यांच्या आमदार निधीतून आर्थिक सहाय्य मिळालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांनाही नोटीस बजावून गेल्या सोमवारी रत्नागिरीतील कार्यालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. आमदार नाईक यांच्या निधीतून झालेल्या कामांच्या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, अशा आशयाची ही नोटीस आहे. ग्रामपंचायतींच्या सरपंचांना नोटीस बजावण्याची ही कोकणातील पहिलीच वेळ आहे. पण त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास नकार देऊन ओरोस येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयातच ही चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… राज ठाकरे आणि राजू शेट्टी यांची दुसरी पिढी एकत्र

खरे तर आमदार निधीचे वाटप संबंधित लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीला थेट देऊ शकत नाही. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चाळणीतून मंजूर झाला तरच हा निधी त्या योजनेची अंमलबजावणी करणारा विभाग किंवा ग्रामपंचायतीला थेट अदा केला जातो. लोकप्रतिनिधीची भूमिका केवळ शिफारशीपुरती असते. पण मला पाठिंबा देणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देण्याच्या एकमेव हेतूने या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. अर्थात आम्हाला त्याचा दबाव वाटत नाही. उलट, आम्ही त्याची मजा घेत आहोत.

हेही वाचा… अमरावतीतही भाजपाला जोरदार धक्‍का

दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार साळवी यांचे स्वीय सहाय्यक मालप यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात गुरुवारी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. पण ती उशिरा मिळाल्याने ते हजर राहिले नाहीत.या बाबत बोलताना मालप यांनी, आपल्याप्रमाणेच सगळ्या मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांचीसुद्धा चौकशी करावी, अशी मागणी केली.

हेही वाचा… नागपूरमध्ये पदवीधर पाठोपाठ शिक्षकमधील पराभव भाजपच्या जिव्हारी

या व्यतिरिक्त शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष उदय बने नोटीस जारी झाल्याची जोरदार चर्चा आहे. आपल्याला तशी नोटीस मिळाली नसल्याचे बने यांनी स्पष्ट केले आहे. मात्र चौकशीसाठी बोलावले तर संपूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 11:46 IST