आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिवसेना शिंदे गटाचे जवळपास २५ आमदार भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला… शिंदेसेनेचे रायगडचे उपजिल्हा प्रमुख मनोज शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली… अंबादास दानवे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाबरोबर आर्थिक सेटलमेंट केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी केला… सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या कोणतेही कारण नसताना लक्ष्य केले जात असल्याची खंत पार्थ पवार यांनी व्यक्त केली… महापौर रितू तावडे यांचा कार्यकाळ फक्त स्पष्टीकरण देण्यातच जाणार का, असा खोचक टोला ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लगावला. या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
शिंदे गटाचे आमदार भाजपात जाण्याच्या तयारीत?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या पक्षाला भविष्यात भाजपात विलीन व्हावेच लागेल. दोन्ही पक्षाचे प्रत्येकी २५ असे ५० आमदार आगामी काळात भाजपात प्रवेश करतील, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून त्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २५-३० आमदारांसह हा पक्ष भाजपामध्ये विलीन होईल. त्याचे नेतृत्व कुणाकडे असेल हे आताच सांगत नाही. शिंदेसेनेतील २५ आमदारही भाजपामध्ये विलीन होण्याच्या मानसिकतेत आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच असे सांगण्यात आले आहे. यादरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सर्वोच्च न्यायालयातील पुन्हा एकदा लांबणीवर पडली. त्यावरही संजय राऊत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेच्या प्रमुख नेत्याची पक्षातून हकालपट्टी
शिवसेना शिंदे गटाचे रायगडचे उपजिल्हा प्रमुख मनोज शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरपालिका निवडणुकीपासून मनोज शिंदे हे सुनील तटकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे उत्तर रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी केला आहे. पक्षात गद्दारी खपवून घेतली जाणार नाही म्हणत त्यांनी शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याचे केणे यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे रायगडमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या कारवाई नंतर मनोज शिंदे यांची प्रतिक्रीया अद्याप समोर आलेली नाही.
आणखी वाचा : शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला भाजपाचा ब्रेक? ठाकरे-पवारांचे खासदार फोडण्यास मनाई? महायुतीत काय घडतंय?
अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप
अंबादास दानवे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाबरोबर आर्थिक सेटलमेंट केल्याचा गंभीर ठाकरे गटाचे पदाधिकारी कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केला. आरोप ठाकरे गटातील दोन पदाधिकाऱ्यांनी केला. शिंदेसेना आणि भाजपाच्या उमेदवाराला मतदान करू नका हा पक्षाने काढलेला व्हीप आम्ही समजू शकतो; पण आपले उमेदवार उभे करून त्यांच्या भांडणाचा फायदा करून घेण्यापासून का रोखले? असा सवालही डोणगावकर यांनी उपस्थित केला. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीआधी आमच्या आठ सदस्यांची ठाण्याच्या महापौर बंगल्यावर एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर तिथे अंबादास दानवे हे एका सदस्याला घेऊन नंतर आले होते. शिंदे यांच्याबरोबर दानवे यांचीही बैठक झाली होती, असा दावाही डोणगावकर यांनी केला. याआधी ठाकरे गटाचे सदस्य संजय निकम यांनी दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
राष्ट्रवादीतील कथित वादावर पवारांचे स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल असा संघर्ष रंगल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या कथित वादावर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तटकरे आणि पटेल यांना कोणतेही कारण नसताना लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी एक्स अकाउंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. आमच्या पक्षात कोणताही वाद नाही आणि तटकरे आणि पटेल हे आजही आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत आहेत. अशा वरिष्ठ नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असून, याचा ठामपणे निषेध केला पाहिजे, असे पार्थ यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
हेही वाचा : भाजपाला मदत करणारे ७ नगरसेवक निलंबित; शिंदे गटातील नेत्याला अटक, काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…
ठाकरे गटाचा महापौर रितू तावडेंना टोला
महापौर रितू तावडे यांचा कार्यकाळ फक्त स्पष्टीकरण देण्यातच जाणार का, असा खोचक टोला ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लगावला. मुंबईतील मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाची पेडणेकर यांनी गुरुवारी पाहणी केली. या कामाला आधीच उशीर झाला असून हा कालावधी कसा भरून काढणार, असा सवाल करत त्यांनी सत्ताधारी महायुतीवर टीका केली. आम्ही सत्तेत होतो तेव्हा मिठी नदीतील गाळ काढण्याची कामे लवकर सुरू होत होती. यंत्रसामग्री आणण्याचे कामही वेळेत केले जात होते. यंदा तब्बल १२ ते १५ दिवस उशीरा काम सुरू झाले. हा कालावधी कसा भरून काढणार, गाळ काढण्याचे काम कसे करणार, असेही पेडणेकरण म्हणाल्या. गाळ काढण्याची कामे नीट झाली नाहीत तर आमचे लक्ष असेलच आणि मुंबईकरही पाहत आहेत, असाही इशारा त्यांनी दिला.
