आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : महापालिकांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना उरणमधील शिवसेना शिंदे गटाच्या तब्बल ३३ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले… महायुतीत एकमेकांचे पदाधिकारी फोडण्याची स्पर्धा लागली असतानाच मीरा भाईंदरमधील भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला… नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्याने महायुतीला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली… सातारा ड्रग्स कारखानाप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा सातारा अंमली पदार्थ प्रकरणात कोणताही सहभाग नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिंदेच्या शिवसेनेत सामूहिक राजीनामे
राज्यात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. उरण विधानसभा जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना हटवून त्यांच्या ठिकाणी विनोद साबळे यांची नियुक्ती करण्यात आल्याने शिंदे गटातील अनेक पदाधिकारी नाराज झाले आहे. याच नाराजीतून उरण तालुकाप्रमुख दीपक ठाकूर, पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांच्यासह अन्य ३३ पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटातून सामूहिक राजीनामे दिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या उरण नगर परिषदेची निवडणूक ही उलथापालथ घडविण्यास कारणीभूत असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेने भाजपाशी युती न करता स्वतंत्र उमेदवार उभे करून निवडणूक लढविली होती. त्या वेळी प्रचारात एकमेकांनी जोरदार टीका टिप्पणी केली होती. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर युतीमध्ये तणाव निर्माण झाला होता. याबाबत भाजपा श्रेष्ठींनी शिवसेनेच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्याचे सांगितले जात आहे.
ठाकरे गटात पक्षप्रवेशाची लगबग
सत्ताधारी महायुतीत एकमेकांचे पदाधिकारी फोडण्याची स्पर्धा लागली असतानाच शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेशाची लगबग वाढली आहे. आज मीरा-भाईंदरमधील भाजपाचे महामंत्री संदिप तिवारी आणि राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष आझाद पटेल ह्यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधील काँग्रेसचे माजी महापौर रशिद मामू यांनीही त्यांच्या सहकाऱ्यांसह ठाकरे गटाची मशाल हाती घेतली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी खासदार राजन विचारे, शिवसेना नेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिकांची उपस्थिती होती. एकसंध शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनेकांनी ठाकरेंची साथ सोडून भाजपा तसेच शिंदे गटात प्रवेश केला होता. परंतु आता ठाकरेंच्या शिवसेनेतही पक्षप्रवेशाची लगबग दिसून येत आहे.
आणखी वाचा : माणिकराव कोकाटे : रमीच्या वादापासून ते सदनिका घोटाळ्यापर्यंत; दोनदा मंत्रिपद कशामुळे गेलं?
नाशिकमध्ये भाजपाची स्वबळाची तयारी?
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्याने महायुतीला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवली जाईल असे भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी गेल्याच आठवड्यात स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनीही उत्सुकता दाखवल्यामुळे महायुतीचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आता पक्षाकडे सर्व जागांवर सक्षम उमेदवार असल्याने युती करू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधीच भाजपा-शिंदे गटाच्या संभाव्य युतीला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या दोन्ही पक्षांकडून प्रभागनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. महापालिकेच्या ३१ प्रभागात १२२ जागांसाठी दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे.
एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या : काँग्रेसची मागणी
सातारा अंमली पदार्थांच्या कारखानाप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. जिल्ह्यातील सावरी गावात अंमली पदार्थांचा कारखाना असल्याचे उघड झाले आहे. ज्या ठिकाणी हा काळा धंदा सुरू होता, ती जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या नावावर आहे. हा प्रकार सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने उघड करून कठोर कारवाईची मागणी केली होती. भ्रष्टाचाराचा पैसा कमी पडतो की काय म्हणून आता अंमली पदार्थांचा धंदा करुन पैसा मिळवला जात आहे. या सरकारला जनाची तर नाहीच पण मनाचीही नाही, अशी टीका सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भावावर गंभीर आरोप केले होते.
हेही वाचा : वीर सावरकरांना भारतरत्न देण्यापासून नेहरूंनी राष्ट्रपतींना का रोखलं? पत्रांतून खळबळजनक खुलासा
फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा सातारा अंमली पदार्थ प्रकरणात कोणताही सहभाग नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी आजवर केलेल्या तपासात कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. विरोधकांनी केवळ राजकीय स्वार्थापोटी सातारा अंमली पदार्थ प्रकरणात शिंदे यांच्यावर आरोप केल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. महापालिका निवडणुकांमधील जागावाटपाची चर्चा आणि एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश देण्याच्या घटनेमुळे ताणलेल्या राजकीय संबंधाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची पाठराखण केली आहे. साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रग्जचा इतका मोठा साठा जप्त केला, त्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो. जो धंदा चालला होता, त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांचे नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचे आणि निषेर्धाह असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
