जयेश सामंत / नीलेश पानमंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदारांचे बंड, त्यानंतर झालेला सत्ताबदल आणि शिवसेना नेमकी कुणाची यावरून सुरू असलेला न्यायालयीन वाद ताजा असताना शुक्रवारी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने ठाण्यात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून शिवसेनेच्या येथील हक्काच्या मतदारांना पुन्हा एकदा भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला एकीकडे भगदाड पडले असताना उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवणारे खासदार राजन विचारे यांनी टेंभी नाका या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ‘निष्ठे’ची हंडी उभारत शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची छबी असलेले फलक झळकवत शिंदे गटाने हिंदुत्वाचा नारा देत शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना थेट शिवसेनाप्रमुखांच्या जुन्या भूमिकांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. दहीहंडीच्या थरांवर रचले गेलेले हे राजकीय थर दिवसभर ठाण्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले होते.

करोनाचा संसर्ग कमी होताच राज्य सरकारने यंदा सर्वच उत्सवांवरील निर्बंध हटवले आहेत. त्यातच राज्यात झालेल्या सत्ताबदलाचा केंद्रबिंदू ठाणे असल्याने येथील दहिहंडी उत्सवाला यंदा राजकीय रंग चढणार हे स्वाभाविक मानले जात होते. शिंदे यांच्या बंडाला ठाणे जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व आमदारांनी पाठिंबा दिला आहे. शिवाय जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक शहरातून तसेच ग्रामीण भागातही शिवसेनेत उभी फुट पडली असून आपला बालेकिल्ला मजबून राहावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी शपथ ग्रहण करताच जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पक्षात एकीकडे मोठी पडझड होत असली तरी ठाण्याचे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी मात्र अजूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही. शिंदे यांच्या बंडानंतर सुरुवातीचे काही दिवस खासदार विचारे यांच्या भूमिकेबद्दल संभ्रमाचे वातावरण होते. नंतरच्या काळात मात्र विचारे यांनी जाहीरपणे मातोश्रीवरील भेटीगाठी सुरू केल्या. त्यामुळे ठाण्याच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाविरोधात विचारे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघटनेची बांधणी करण्यास मातोश्रीवरून सुरुवात झाली आहे. विचारे यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना सोबत घेत वेगवेगळे कार्यक्रम हाती घेण्यास सुरुवात केली असून जुन्या ठाण्यातील शिवसेनेच्या काही शाखांमधून त्यांना प्रतिसाद मिळताना दिसत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मध्यरात्री विचारे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक टेंभी नाक्यावर ध्वजारोहण कार्यक्रमासाठी जमल्याने शिंदे गट आणि उद्धव गट ठाण्यात पहिल्यांदा आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले होते.

दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने या दोन्ही गटांकडून शुक्रवारी शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न करण्यात आला. टेंभीनाक्यावर धर्मवीर आनंद दिघे यांनी दहीहंडी उत्सव सुरू केला होता. दिघे यांच्यानंतर जिल्हाप्रमुख या नात्याने एकनाथ शिंदे यांनी हा उत्सव पुढे जोमाने सुरू ठेवला. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे यांच्यासोबत राहिलेले खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील जांभळीनाका भागात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. हे करत असताना यंदा ठाण्याच्या जांभळीनाक्यावरील दहीहंडीत निष्ठेचे थर लावले जातील अशी भूमिका मांडत खासदार विचारे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. विचारे यांच्या या भूमिकेला शुक्रवारी शिंदे गटाने टेंभीनाक्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर लावून आणि हिंदुत्वाचा नारा देत जोरदार उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.

शिंदे गटाने टेंभी नाका येथील उभारलेल्या फलकांमधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जुनी विधाने, त्यांनी हिंदुत्वाचे मांडलेले प्रखर विचार यांची पद्धतशीर मांडणी करत विचारे यांना शह देण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवाय ठाण्यातील जुन्या, कट्टर शिवसेना मतदारांनाही नव्याने साद घालण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. ‘मतदाच्यावेळी शिव्या द्यायच्या आणि नंतर त्यांच्यासोबत आघाडी करायची.., मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, आज जो मानसन्मान मिळतोय तो हिंदुत्वामुळे आणि भगव्या झेंड्यामुळे’, असा मजकूर असलेले फलक टेंभीनाक्यावर शिंदे गटाकडून उभारण्यात आले आहेत. ‘शिवसेनेला जागा कमी पडत असतील तर राष्ट्रवादीसोबत जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना बाळासाहेबांनी नाही म्हटले होते. शत्रू हा शत्रूच असतो’, असेही म्हटले होते. असे फलक लावून बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या विधानांचीही आठवण शिंदे गटाने ठाकरे गटाला करून दिली आहे.‘ आय एम हिंदू… मॅड मॅड हिंदू’ असा मजकूर आणि बाळासाहेबांची छबी असलेले भले मोठे फलक उभारत शिंदे गटाने हिंदुत्वाचा नारा अधिक प्रबळ करण्याचा प्रयत्न केला आहे. 

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde group gave answer to rajan vichares nishta handi print politics news pkd
First published on: 19-08-2022 at 14:22 IST