आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून पक्षातील काही नेत्यांनी शिवसेना भाजपाच्या दावणीला बांधल्याचा आरोप धाराशिवमधील पदाधिकाऱ्यांनी केला… अशोक खरात प्रकरणात सत्ताधाऱ्यांची नावे समोर येणार असल्याने त्याआधीच त्याचा एन्काऊंटर करतील, असा दावा खासदार प्रणिती शिंदे यांनी केला… कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढवण्याच्या हालचाली सुरू असतानाच महायुतीतील अंतर्गतच मतभेद चव्हाट्यावर आले… शिवसेना शिंदे गटाचे ठाण्याचे पदाधिकारी नरेंद्र मालुसरे यांच्यावर त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला… बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने काम करावे, असे आवाहन भाजपाच्या नेत्याने केले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
भाजपामुळे शिंदे गटात वाद उफाळला?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला. धाराशिवच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर शिवसैनिकांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढाच वाचून दाखवला. यावेळी पक्षातील काही नेत्यांनी भाजपाच्या दावणीला शिवसेना पक्ष बांधल्याचा आरोप केला. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी संतप्त होत या शिवसैनिकांना खडेबोल सुनावले. सोलापुरात धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. या सर्व नेत्यांच्या समोरच धाराशिव येथील पदाधिकारी आक्रमक झाले. यावेळी खासदार शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत ‘पदाधिकाऱ्यांना शिस्त नाही, बोलायला दिले तर तुम्ही एकमेकांबरोबर मारामारी करता का? अशी आक्रमक भूमिका मांडली. भाजपामुळेच शिंदे गटात हा वाद पेटला असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली.
खासदार प्रणिती शिंदेंचा खळबळजनक दावा
अशोक खरात प्रकरणात सत्ताधाऱ्यांची नावे समोर येणार असल्याने त्याआधीच त्याचा एन्काऊंटर करतील, असा सनसनाटी दावा काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. भाजपामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान धोक्यात आले आहे. देशाच्या लोकशाहीला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. संविधान टिकवणे गरजेचे झाले असून हीच खरी जयंती आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी माध्यमांना दिली. संसदेत तीन दिवसांचे अधिवेशन होणार असून महिला आरक्षणाचा विधेयक पारित होणार आहे, महिला आरक्षण अगोदरच दिलेले आहे. तीस महिन्यांनंतर सत्ताधारी पक्षाला जाग आली, अशी टीकाही शिंदे यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर केली.
महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढवण्याच्या हालचाली सुरू असतानाच महायुतीतील अंतर्गतच मतभेद चव्हाट्यावर आले. आजवर विरोधकांकडून गोकुळच्या कारभारावर टीकास्त्र डागले जात असताना भाजपाचे चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळ दूध संघातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. गोकुळ दूध संघातील वाढलेल्या तीन हजार संस्था या बेकायदारीत्या मंजूर केल्या आहेत, असे सांगत या भ्रष्टाचाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईडीमार्फत चौकशी करायला हवी, मागणी त्यांनी केली. ही मंजुरी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या इशाऱ्यानुसार पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी महेश कदम यांनी केल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. त्यांच्या या आरोपाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर कार्यकर्त्यांचा हल्ला
शिवसेना शिंदे गटाचे ठाण्याचे पदाधिकारी नरेंद्र मालुसरे यांच्यावर त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून हल्ल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण प्रसारित झाले आहे. नरेंद्र मालुसरे हे शिंदे गटाचे उपविभागप्रमुख आहेत. सोमवारी मध्यरात्री ते टेंभीनाका येथे गेले होते. त्यांनी शाखेजवळ दुचाकी उभी केली होती. दुचाकी काढत असताना अनिल चाचड, जयंत उर्फ जॅकी भोईर यांच्यासह त्यांचे दोन साथीदार तेथे आले. महापालिका निवडणूकीपासून दूर राहण्यास सांगितले होते, असे म्हणत नरेंद्र यांना जॅकी भोईर आणि अनिल यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणामुळे शिवसेना शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्रिपदावरून भाजपामध्येच अस्वस्थता? नितीश कुमार यांच्यानंतर बिहारची सूत्रे कोणाकडे?
सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी भाजपा मैदानात
बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने काम करावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा मोठा विजय व्हावा यासाठी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निर्भिडपणे प्रचार करावा आणि मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही ते म्हणाले. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ भाजपच्या बूथ प्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष शेखर वढाणे, बाळासाहेब गावडे, रंजनकुमार तावरे, वासुदेव काळे, प्रवीण माने यांच्यासह पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
