Latest Political News in Maharashtra : नगपरिषदा आणि नगरपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील मतदान संपताच शिवसेना शिंदे गटाला ठाण्यात मोठा धक्का बसला… निवडणूक प्रचारादरम्यान भाजपा आणि शिंदे गटात टोकाचे वाद झाल्याने महायुती टिकणार की फूट पडणार अशी चर्चा सुरू झाली… कोरेगाव भीमा प्रकरणात चौकशी आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश दिले… भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जाती-धर्मांमध्ये भेद निर्माण करून भांडणे लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला… अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊनही राज्य सरकारने कर्जमाफीसाठीचा आवश्यक प्रस्ताव केंद्र सरकारकडे अद्याप पाठवला नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली. या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊ…

शिंदेसेनेचा बडा नेता ठाकरे गटात

नगपरिषदा आणि नगरपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील मतदान संपताच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला. ठाण्यातील शिंदेसेनेचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आगामी काळात ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. मात्र, त्यांच्या गडालाच ठाकरेंनी खिंडार पाडल्याचे समोर आले आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला ठाकरे गटाचे नेते राजन विचारे, उपनेत्या किशोरी पेडणेकर, जिल्हाप्रमुख केदार दिघे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

निवडणुकीनंतर महायुतीत मोठी फूट?

गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापन केल्यानंतर महायुतीतील तिन्ही घटकपक्ष (भाजपा-शिंदे गट-अजित पवार गट) गुण्यागोविंदाने नांदत होते, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्यात वादाची ठिगणी पडली. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपा विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत पाहायला मिळाली. मतदानाच्या दिवशी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते ठिकठिकाणी एकमेकांना भिडताना दिसून आले. यादरम्यान- भाजपा-शिंदे गटात टोकाचे वाद झाल्याने महायुती टिकणार की फूट पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मला दोन तारखेपर्यंत (२ डिसेंबर) युती टिकवायची आहे. त्यामुळे मी शिंदे गटाकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर काहीही बोलणार नाही, असे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आठवडाभरापूर्वी केले होते.

आणखी वाचा : भाजपा आणि शिंदे सेनेत हाणामारी, अनेक ठिकाणी दगफेकीच्या घटना; महायुतीतील संघर्ष कसा पेटला?

उद्धव ठाकरेंना प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश

कोरेगाव भीमा प्रकरणात चौकशी आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रतिज्ञापत्र सादर देण्याचे आदेश दिले. वकील असीम सरोदे यांनी त्यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली आहे. कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दंगलीसंदर्भात सध्या आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी दंगलीबाबत पत्र दिले होते. त्या पत्राची प्रत पवार यांनी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयोगाने दिले होते, पण पवार यांनी ही प्रत आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्राची प्रत आयोगाला द्यावी अशी नोटीस आयोगाने बजावली. त्यानंतर सकारात्मक उत्तर न आल्याने आयोगाने ठाकरेंना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र सध्या निवडणुकांची धामधूम सुरू असल्याचे ठाकरेंना आयोगासमोर हजर राहता आले नाही. याबाबत आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितल्याची माहिती ठाकरेंची वकील असीम सरोदे यांनी दिली आहे.

भाजपा आणि आरएसएसवर काँग्रेसची टीका

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जाती-धर्मांमध्ये भेद निर्माण करून भांडणे लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ‘काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर देशाने मोठी वाटचाल केली. मात्र, आता सत्तेवर असलेल्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाती, धर्माच्या नावाखाली व्यक्तींमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग सुरू केला आहे’, अशी टीकाही सपकाळ यांनी केली. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या वतीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा-कर्तव्य-त्याग’ सप्ताहाचे उद्घाटन सपकाळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी कुठल्या आहेत, यावरून संघाने घाणेरडे राजकारण केले. गेली ३५ वर्षे सोनिया गांधी देशाच्या सून आहेत. त्यांनी पंतप्रधानपद नाकारून त्याग काय असतो, हे देशाला दाखवून दिले. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनीही पंतप्रधानपद नाकारले, असे सपकाळ म्हणाले.

हेही वाचा : भाजपाचा शिंदेसेनेला इशारा, निवडणुकांचे निकाल लांबणीवर; ठाकरेंचा शहाजीबापूंना टोला, वाचा ५ घडामोडी…

सुप्रिया सुळेंची महायुती सरकारवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना राज्य सरकारने कर्जमाफीसाठी आवश्यक असलेला प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारकडे पाठवला नाही, असे सुळे यांनी म्हटले आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले. अनेक ठिकाणी शेतातील माती देखील वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या. या पावसामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.राज्यातील संकटात अडकलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी करा अशी आम्ही सर्वजणांनी मागणी केली आहे. परंतु हे सरकार कर्जमाफीबाबत गंभीर नाही. तसा प्रस्ताव त्यांनी केंद्राकडे पाठवलाच नाही. खुद्द केंद्र सरकारने याबाबतची सत्य परिस्थिती उघड केली आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे. महायुती सरकारचे प्राधान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला नव्हे तर निवडणुकीच्या प्रचाराला आहे, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला.