Todays Top Political News in Maharashtra : ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारीबाबत संभ्रम असलेले शिंदे गटातील अनेकजण उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली… काही झाले तरी आम्ही निवडणूक लढवणारच, असा आक्रमक भाजपा-शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच मोठं बंड होणार असल्याची चर्चा रंगली… भाजपाला पंतप्रधान मोदी आणि ईव्हीएमवरच माज असून महापालिका निवडणुकीत त्यांचे स्वप्न गाडण्यासाठी मतदारांना एकत्र येण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले… पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांमध्ये युती झाल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली… नगर परिषदेच्या निवडणुकीत ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केले, त्यांना स्वर्गात जागा मिळणार असल्याचे अजब विधान शिंदे सेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी केले. या सर्व घडामोडींच्या घेतलेला हा सविस्तर आढावा…

शिंदेंचे अनेक शिलेदार ठाकरेंच्या संपर्कात?

ठाणे महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. अनेक वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणूकांसाठी या दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळेल या आशेवर अनेकजण आहेत. परंतु महायुतीमुळे आपली उमेदवारी निश्चित होईल का याविषयी त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. याच कारणामुळे शिवसेना शिंदे गटातील अनेकजण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे महापालिकेच्या अनेक प्रभागांवर आजवर एकसंध शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. यावेळी मात्र काही प्रभागात भाजपाने उमेदवार देण्याची तयारी केल्याने शिंदेंच्या सेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावरूनच काही प्रभागात नाराजीनाट्य सुरू असून मध्यरात्रीच्या छुप्या बैठका पार पडत आहेत. नुकतीच राजन विचारे यांच्या कार्यालयात मध्यरात्री एक बैठक पार पडली. यावेळी त्यांना भेटण्यास भाजपासह शिंदे गटातील काही पदाधिकारी हजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

निवडणुकीआधीच महायुतीत मोठं बंड?

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवसाचा कालावधी उरला असताना शिंदे गट आणि भाजपाकडून अद्यापही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. यापार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक सुरू झाली असून त्यातील काहींनी थेट बंडखोरीचा इशारा दिला आहे. पक्षांनी कारवाई केली तरी चालेल पण आम्ही महापालिका निवडणूक लढवणारच असल्याचा आक्रमक पवित्रा काही उमेदवारांनी घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच महायुतीत बंडखोरांचे चक्रीवादळ आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा आणि शिंदे गटाने आपापल्या प्रभागातील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून ठेवली आहे. दोन्ही पक्षांनी याद्या जाहीर केल्यानंतरच उमेदवारांना नामांकन अर्ज भरण्यासाठी दिले जाणार आहे. या कालावधीत कोणी बंडखोरी केली तर त्यांना विविध प्रकारची आश्वासने देऊन गार केले जाण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : भाजपाच्या मित्रपक्षात मोठी फूट? आमदारांनी दिले बंडाचे संकेत; नेमकं काय घडतंय?

राज ठाकरे यांची भाजपावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमवरच भाजपाचा माज असून महापालिका निवडणुकीत त्यांचे स्वप्न गाडण्यासाठी मतदारांनी एकत्र यावे, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मुंबईसाठी आपण आपला राग, राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजे. भाजपाला मुंबई ताब्यात घ्यायची असून मुंबईसह संपूर्ण महानगर प्रदेश गुजरातला जोडायचा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. राज ठाकरे यांनी आज सकाळी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यास पक्षातील सर्व नेते, उपनेते, तसेच स्थानिक पातळीवरील गट आणि शाखा अध्यक्षांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी भाजपावर टीका करताना पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमवर भाजपा निवडणुका जिंकण्याचा माज करीत असून अनेकांना त्यांच्याकडे गेलो तर तिकीट मिळेल अशी भाबडी आशा आहे. मात्र त्यांच्याच लोकांवर तिकीट न मिळण्याची टांगती तलवार आहे, याकडेही ठाकरे यांनी नेत्यांचे लक्ष वेधले.

शहाजीबापू पाटील यांचे अजब विधान

नगर परिषदेच्या निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) धनुष्यबाणाला मतदान केले, त्यांना स्वर्गात जागा मिळणार, असे अजब विधान माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले. नुकत्याच पार पडलेल्या सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाने नगराध्यक्ष पदासह १५ प्रभागांमध्ये प्रचंड मतांनी विजय मिळवला. या विजयानिमित्त आज शिंदेसेनेकडून सांगोल्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदा माने यांच्यासह विजयी उमेदवार व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केले, त्यांना स्वर्गात जागा मिळणार असल्याचे विधान शहाजीबापू पाटील यांनी केले. त्यांच्या विधानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला शहरातील रस्ते, नगरपरिषद इमारतीसाठी नव्याने व भुयारी गटाराच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे शहाजीबापूंनी सांगितले आहे.

हेही वाचा : ठाकरे गटात जोरदार इनकमिंग; भाजपात मोठी बंडखोरी होणार? शिंदेसेनेत वादाची ठिगणी? वाचा ५ घडामोडी…

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये अखेर युती

पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांमध्ये युती झाल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यादरम्यान घोषणा करताना अजित पवारांनी एक सूचक विधानही केले. पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अजित पवार म्हणाले. महापालिकेची निवडणूक लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी (शरद पवार यांची राष्ट्रवादी) हे एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचे काम होत आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये या भावना होत्या. शरद पवार साहेबांच्या पक्षात आपल्या विचाराचे काही खासदार आहेत. त्यांनाही आपण दिल्लीत आवाज उठवण्याचे काम सांगू शकतो. त्यामुळे तिथेही काही अडचण नाही, असेही अजित पवार म्हणाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.