आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला… विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून बच्चू कडू यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… ठाणे महापालिकेत नारीशक्ती विधेयकावरून शिंदे गट आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे दिसून आले… महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्षातील वाचाळवीर नेत्यांना अत्यंत कडक शब्दात तंबी दिली… काँग्रेस आणि शरद पवार गटासह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महिला विरोधी चेहरा उघडा करू, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिंदे गटात सामूहिक राजीनामे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भव्य मेळावा तोंडावर आला असताना साताऱ्यात पक्षाला मोठा धक्का बसला. साताऱ्यातील शिंदेसेनेचे शहरप्रमुख नीलेश मोरे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला. शहरातील प्रभावशाली नेत्यासह पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे शिंदे गटात मोठी खळबळ उडाली. मोरे यांनी आपल्या राजीनामा पत्रातून थेट संपर्क प्रमुखांच्या कार्यपद्धतीलाच लक्ष्य केले. कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करायचे आणि श्रेय-निधी मात्र नातेवाईकांना असा आरोप त्यांनी केला. साताऱ्यासारख्या भाजपाच्या बालेकिल्ल्यात आणि दोन्ही राजेंच्या विरोधात शिवसेनेची संघटनात्मक ताकद उभी करण्यासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांनाच जर दुय्यम वागणूक मिळत असेल, तर निष्ठा ठेवून काय उपयोग, असा सवालही मोरे यांनी उपस्थित केला. त्यांच्या या निर्णयानंतर शिंदे काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बच्चू कडूंना विधानपरिषदेची ऑफर?
राज्यात विधान परिषदेसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत असताना वरिष्ठांनी दिलेल्या आश्वासनाचा धागा पकडत महायुतीतील अनेकांना आमदारकी खुणावू लागली आहे. पक्षाकडून विधान परिषदेचे तिकीट मिळावे, यासाठी भाजपासह शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी जोरदार मोर्चबांधणी सुरू केली आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निवडणुकीत धक्कातंत्रांचा वापर करणार असल्याची माहिती आहे. विधान परिषदेसाठी शिंदेसेनेकडून माजी मंत्री बच्चू कडू यांना ऑफर देण्यात आल्याचे वृत्त साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. याबाबत शिंदे आणि कडू यांच्यात मुंबईत बैठकही झाल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार, असे बच्चू कडू यांनी शिंदे यांना सांगितल्याची माहिती आहे.
आणखी वाचा : महिला आरक्षणाचा डाव नेमका कशासाठी होता? भाजपाला काय साधायचे होते? सुहास पळशीकर यांचे विश्लेषण
भाजपा-शिंदे गटात पुन्हा मतभेद
ठाणे महापालिकेत नारीशक्ती विधेयकावरून शिंदे गट आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे दिसून आले. संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांच्या महिला विरोधी भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी ठाणे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपाच्या नगरसेवकांनी प्रस्ताव मांडला होता, मात्र तो प्रस्ताव शिंदेसेनेच्या महापौर शर्मिला पिपळोलकर यांनी पटलावरच घेतला नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी थेट आक्रमक भूमिका घेतली. यावेळी प्रशासनाचा निषेधही करण्यात आला. मात्र, विषय पटलावर घेण्याचा अधिकार महापौरांचा असताना भाजपाने प्रशासनाचा निषेध करुन नेमके काय साधले, असा सवाल आता उपस्थित होत आहे. दरम्यान, असा प्रकार करणाऱ्यांना सभा शास्त्र शिकविण्याची गरज आहे, असा टोला शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी भाजपाला लगावला आहे. यादरम्यान भाजपाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या आवारात प्रशासनाचा निषेध नोंदविला.
मंत्री बावकुळेंची भाजपाच्या नेत्यांना तंबी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्षातील वाचाळवीर नेत्यांना अत्यंत कडक शब्दात तंबी दिली. राज्यातील सामाजिक वातावरण गेल्या काही दिवसापासून विविध घटनांमुळे तापलेले आहे. त्यातच भाजपा व विरोधी पक्षाच्या नेत्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. त्यावरूमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपामधील नेत्यांना तंबी दिली आहे. परतवाडा सारख्या संवेदनशील प्रकरणावर बोलतांना कोणीच बेजबाबदार वक्तव्य करू नये. पोलिसांकडून अधिकृत माहिती घेऊनच या विषयावर बोलावे आणि उगाचच अमरावतीचे आनंदाचे वातावरण दूषित करू नये, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. परतवाडा येथील घटनेवर बोलतांना भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केल्याचे समोर आले होते. त्यावरून बावनकुळे यांनी हा इशारा त्यांनाच दिल्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा : बारामतीतील नवे नेतृत्त्व जय पवार? खासदार पार्थ पवार प्रचारापासून दूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली. राजस्थान, गुजरात, दिल्ली अशा राज्यात भाजपाने महिलांच्या हातात मुख्यमंत्रिपद दिले. त्याउलट विरोधी पक्षांनी कधीही महिलांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. काँग्रेस आणि शरद पवार गटासह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महिला विरोधी चेहरा उघडा करू, असा इशारा मुख्यमंत्री त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिला. लोकशाहीत जनमताचा रेटा यांच्या लक्षात येईल, तेव्हा हे महिला आरक्षणाला पाठिंबा देतील. आम्ही महिलांना संघटित करण्याचे काम करण्यासह राज्यातून १ कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार आहोत. त्यासाठी आम्ही मेळावा बोलावला असून तिथे आमच्या मित्र पक्षांना निमंत्रित केले जाईल, जोपर्यंत महिलांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
