आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिंदेसेनेचे आमदार संजय जाधव यांनी भाजपाच्या नेत्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली… ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे सेनेचे खासदार फोडणार असल्याच्या चर्चांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिला… काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले… महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फोडाफोडीला ऊत आला असून, कोणतीही नीतिमत्ता उरलेली नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली… माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मुंबईचा नामवंत वकील पाठवला होता, असा दावा करुणा मुंडे यांनी केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
भाजपाच्या नेत्यावर गंभीर आरोप
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपाच्या नेत्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. भाजपाचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे हे दुसरे अशोक खरात असल्याची टीका आमदार गायकवाड यांनी केली. विजयराज यांनी त्यांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आमदार गायकवाड यांनी केला. विजयराज यांच्या शाळेत शिकलेल्या अनेक माजी विद्यार्थिनींच्या जीवनात आता वाद होत आहेत, अनेक विद्यार्थिनी व पालकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत असल्याचे धक्कादायक विधानही गायकवाड यांनी केले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून विजयराज यांच्यावर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही आमदार गायकवाड यांनी केली. दुसरीकडे भाजपाच्या नेत्याने गायकवाड यांच्या सर्व आरोप फेटाळून लावले आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पूर्णविराम
शिवसेना ठाकरे गटातील आठ खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गुप्तबैठक झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केले. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच संपूर्ण राज्यभरात ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली. यावरून संबंधित खासदारांनी अशा कोणत्याही बैठकीला आम्ही उपस्थित नव्हतो, असे स्पष्टीकरणही दिले. मात्र, तरीदेखील या वृत्तांवरून तर्क-वितर्कांना उधाण येतच राहिले. अखेर खुद्द एकनाथ शिंदेंनीच या प्रकरणावर पडदा टाकणारा खुलासा केला असून त्यासंदर्भातली पोस्ट शिवसेनेच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट केली. उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा : Assam Election 2026 : आसाममध्ये भाजपाची हॅट्ट्रिक की काँग्रेसची मुसंडी; हे ५ मुद्दे ठरवणार सत्ता कोणाची?
प्रणिती शिंदे यांचा भाजपावर गंभीर आरोप
सोलापूरच्या राजकारणात भाजपा विरुद्ध प्रणिती शिंदे असा राजकीय सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नुकतीच नागपूरला बदली झाली. त्यावरून प्रणिती शिंदे यांनी जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य केले. जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपाच्या नेत्यांच्या दबावातून आपली बदली नागपूरला करून घेतली, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला. “मी दोन महिन्यांपूर्वी सांगितले त्याप्रमाणे पहिली विकेट जिल्हाधिकारी यांची गेली आहे. सोलापूरला नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार घेतला आहे. कारण जुन्या जिल्हाधिकाऱ्यांनी कदाचित स्वतःहून नागपूरला बदली करून घेतली असेन, असे माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या. त्यांच्या आरोपांवर आता भाजपाचे नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
फोडाफोडीच्या राजकारणावर वडेट्टीवार यांची टीका
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फोडाफोडीला ऊत आला असून, राजकारणात कोणतीही नीतिमत्ता उरलेली नाही, अशी टीका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. कोणाला तरी आधी डोक्यावर घ्यायचे आणि नंतर पायाखाली तुडवायचे ही आता एक फॅशनच झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यातील सत्ताधारी गोटात सर्व काही आलबेल नसल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेत असूनही अस्वस्थ आहेत, त्यांचे मंत्रीही अस्वस्थ आहेत. राज्याला कर्जबाजारी करून हे सत्तेचे खेळ सुरू आहेत. जनतेच्या प्रश्नांकडे बघायला वेळ नाही. मुंबई महापालिकेतील नगरसेवक निधीच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला. राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित असले पाहिजे. विकास निधी देताना मात्र सर्वांना समान न्याय मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्याचे सरकार विरोधकांच्या नगरसेवकांना निधी न देता लोकशाहीची घातक पद्धत रुजवत आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा : ममता, स्टॅलिन, हिमंता की विजयन? सत्तेच्या संघर्षात कोणाचे पारडे जड?
करुणा मुंडे यांचा खळबळजनक दावा
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत आहेत. त्यांच्याविरोधात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यादरम्यान एबीपी माझाशी बोलताना करुणा मुंडे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मुंबईतला एक नामवंत वकील पाठवला होता, असे करुणा यांनी म्हटले आहे. जर अजित दादांच्या अपघाताचा एफआयआर झाला असता तर मी उमेदवारी अर्ज मागे घेतला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
