आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील धाराशिव जिल्ह्यातील दोन प्रभावशाली नेत्यांनी आपल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला… माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने अमरावतीसह संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली… राहुरी आणि बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वावर केलेल्या विधानावरून ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर वादात सापडल्या… सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान झालेल्या गोंधळावरून मंत्री शंभुराज देसाई यांनी पुन्हा गंभीर आरोप केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदेसेनेच्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

शिवसेना शिंदे गटाच्या धाराशिव जिल्ह्यातील दोन नेत्यांनी आपल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला. अनिल शिंदे आणि बाळासाहेब समुद्रे अशी राजीनामा देणाऱ्या स्थानिक नेत्यांची नावे आहे. दोघांनीही धनुष्यबाणाची साथ सोडून करुणा मुंडे यांच्या स्वराज्य शक्ती सेना पक्षात प्रवेश केला आहे. अनिल शिंदे हे जिल्ह्यात नाभिक सेनेचे काम पाहत होते; तर बाळासाहेब समुद्रे यांच्याकडे शिंदे गटाच्या मागासवर्गीय सेलच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी होती. दोघांनाही करुणा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अनिल शिंदे आणि बाळासाहेब समुद्रे या दोन्ही नेत्यांनाही शिंदे गटात न्याय मिळत नव्हता. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही त्यांना भेटता येत नव्हते. त्यामुळे संतप्त होऊन ते आज स्वराज्य शक्ती सेना पक्षात सामील झाले आहेत. आगामी काळात आमच्या पक्षात आणखीनच प्रवेश होतील, असा विश्वासही करुणा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

बच्चू कडू यांनी रचला हत्येचा कट?

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री बच्चू कडू यांनी आपल्या भावाच्या हत्येचा कट रचला, असा गंभीर आरोप भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर अमरावतीसह संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. विशेष म्हणजे, या खुनाच्या कटाचे ऑडिओ क्लीप आपल्याकडे असल्याचा दावाही तायडे यांनी केला आहे. तशी तक्रारही त्यांनी अमरावती ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी पोलिसांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण तायडे यांनी विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा पराभव केला होता. त्यांच्या तक्रारीनुसार, गेल्या डिसेंबर महिन्यात बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी एक बैठक झाली होती. या बैठकीत अभिजीत तायडे यांना अपघातात ठार मारण्याबाबत चर्चा झाली. एका गोपनीय साक्षीदाराने या संभाषणाचे रेकॉर्डिंग केले असून त्या संभाषणाची क्लिप असलेला ‘पेन ड्राईव्ह’ तक्रारदाराने पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. आमदार प्रवीण तायडे हे विधिमंडळाच्या अधिवेशनात व्यस्त असल्याने ही तक्रार देण्यास विलंब झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा : अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण म्हणजे नक्की काय? भाजपाचा खटाटोप नेमका कशासाठी?

संजय राऊत यांचा काँग्रेसवर संताप

बारामती व राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत राजकीय वाद निर्माण झाला आहे. या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार देण्याची तयारी केल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. जळगावात माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, काँग्रेस हा पक्ष बिहार, पश्चिम बंगाल, नागालँड असेल अशा सगळ्या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी पुढे जातो आणि निकाल लागल्यानंतर कळते की आपण कुठे आहोत. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे; त्या ठिकाणी त्याच पक्षाने निवडणूक लढवायला हवी. या दोन्ही जागांसंदर्भात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते बसून निर्णय घेतील आणि तो घ्यावा लागेल. राहुरीमध्ये लढण्याची आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा आहे; पण भाजपाला मदत होईल अशी भूमिका कुणी घेऊ नये, असा महाविकास आघाडीचा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

किशोरी पेडणेकरांचे वादग्रस्त विधान

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या एका विधानामुळे वादात सापडल्या. मुंबईतील शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करावे अशी ठरावाची सूचना त्यांनी महासभेच्या पटलावर ठेवली. या सूचनेचे समर्थन करताना पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरही लहानपणी मनाचे श्लोकचा प्रभाव होता असे विधान केले. इतिहासात असे कोणतेही दाखले नसताना त्यांनी केलेल्या या विधानामुळे त्या चांगल्याच अडचणीत सापडल्या असून पेडणेकर यांनी तत्काळ याबाबत दिलगिरी व्यक्त केली. मनाचे श्लोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे संविधान यांचा संबंध मी जोडला. त्यामुळे कोणाची मने दुखावली असतील तर मी माफी मागते; पण माझा उद्देशच वेगळा होता. पुन्हा असे विधान माझ्याकडून कधीच होणार नाही, अशा शब्दात त्यांनी माफी मागितली.

हेही वाचा : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी आश्विनी भिडेच का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या या निर्णयामागची कारणे कोणती?

मंत्री शंभूराज देसाई यांचा गंभीर आरोप

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी मोठा गोंधळ झाला होता. त्यावरून विधानसभेतही आरोप-प्रत्यारोप झाले होते. या संपूर्ण प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता संबंधित घटनेच्या दिवशीचे ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाल्याने चर्चेचा नवा विषय ठरला आहे. हे चित्रीकरण उपलब्ध व्हावे यासाठी विरोधी सदस्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. यावर संबंधित घटनेच्या दिवशी ही यंत्रणा तांत्रिक कारणामुळे अगोदरच बंद असल्याचे जिल्हा परिषदेकडून कळवण्यात आले आहे. यादरम्यान निवडणुकीवेळी झालेल्या गोंधळाचे पुरावे उपलब्ध होऊ नये म्हणून ही यंत्रणा मुद्दाम बंद ठेवल्याचा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.