विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका एरव्ही फारशा दखलपात्र नसतात. पण या वेळी या निवडणुकांना राजकीय रंग आला. लोकसभा वा विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका या चुरशीच्या होत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील तीन पक्षांमधील मतभेद समोर आले. पुणे शिक्षक मतदारसंघात उमेदवार उभा करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला आव्हान दिले होते. पण उमेदवार माघार घेत शिंदे यांनी भाजपशी दोन हात करण्याचे टाळले. त्याच वेळी या निवडणुकीमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटातील बेदिली आणखी वाढली आहे.
पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर तर पुणे व अमरावती शिक्षक अशा पाच मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे. महायुतीत भाजपने तीन जागा लढवित शिंदे व अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा सोडली. शिंदे यांना पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघ हवे होते. भाजपने पुणे सोडण्यास नकार दिला. शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांनी वाजत गाडत उमेदवारी अर्ज दाखल केला. आता माघार नाही, अशी घोषणा केली. चिवटे यांचा अर्ज दाखल करण्याकरिता शिंदे गटाचे मंत्री उपस्थित होते. तसेच शिंदे यांनी ही जागा लढण्याचे सुतोवाच केले होते. पण माघारीच्या दिवशी शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतले. चिवटे यांना माघार घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार चिवटे यांनी माघार घेतली.
गेले काही दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे हे सातत्याने परस्परांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे. शिंदे हे नेहमी दिल्ली वाऱ्या करून भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेत असतात. गेल्याच आठ्वड्यात त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतीपरी मदत देण्याचे आश्वासन मोदी यांनी आपल्याला दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. दुष्काळी मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याआधी शिंदे यांनीच भेट घेतली. मग फडणवीस यांनी नवी दिल्लीत जात गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत जास्तीत जास्त मदत मिळण्याची मागणी केली. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे हे भाजपला टक्कर देतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण शेवटच्या क्षणी माघार घेत शिंदे यांनी भाजपची नाराजी स्वीकारण्याचे टाळले आहे. महायुतीचा धर्म पाळत दिल्लीश्वरांची मर्जी सांभाळली आहे.
राष्ट्रवादीतील संघर्ष वाढला
अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादीतीली अंतर्गत वाद पराकोटीला गेले आहेत. उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांच्या विरोधात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असा वाद सुरू आहे. पुणे पदवीधरमध्ये सध्या राष्ट्रवादीचा आमदार आहे. यामुळेच पुणे पदवीधर हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळायला हवा होता, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. महायुतीच्या चर्चेत पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने दावाच केला नाही. यावरून पक्षात तीव्र भावना होती. पुण्याची जागा आम्हाला मिळाली नाही हे सामुहिक अपयश आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी करून एक प्रकारे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसरीकडे, ही जागा न मिळाल्याने कार्यकर्ते हताश झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत प्रफुल्ल पटेल यांनी नाराजीची भावना व्यक्त केली. पटेल आणि तटकरे यांच्या विधानांमुळे राष्ट्रवादीतील वादात आणखी भर पडली.
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पक्षाचे अस्तित्वच फारसे जाणवत नाही. पक्ष सत्तेत असल्याने कार्यकर्ते अजून बरोबर आहेत. पण पक्षाच्या आमदारांमधील अस्वस्थता वाढू लागली आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते होते. त्यामुळे ते पक्षाच्या आमदारांची काळजी घेत असत. आमदारांच्या मतदारसंघांमध्ये अधिक निधी मिळेल याकडे त्यांचे लक्ष असे. अर्थ खाते हे फडणवीस यांच्याकडे असल्याने आता राष्ट्रवादीच्या आमदारांना पूर्वीसारखा निधी मिळत नाही. साहजिकच त्यांची नाराजी वाढू लागली आहे. अर्थ खाते मिळावे म्हणून राष्ट्रवादीची मागणी असली तरी त्याला मुख्यमंत्र्यांनी दाद दिलेली नाही. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीला हे खाते मिळण्याची शक्यता कमीच आहे.
