सौरभ कुलश्रेष्ठ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारून शिवसेनेची साथ सोडण्यास कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी खासदारपुत्र श्रीकांत शिंदे यांचे राजकीय भवितव्य सुरक्षित करणे हा एक प्रमुख घटक असल्याचे मानले जात आहे. श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी मतदारांचा पगडा असल्याने भाजपच्या मदतीशिवाय विजय अशक्य असल्यानेच खासदारपुत्राचे राजकीय भवितव्य हाही एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत निर्णायक मुद्दा ठरल्याचे मानले जात आहे.

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. शिवसेनेचा हा लोकसभा मतदारसंघ राखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपले पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना मैदानात उतरवले आणि तब्बल अडीच लाख मतांनी विजय मिळवला. त्यानंतर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतही श्रीकांत शिंदे यांनी तब्बल ३ लाख ४४ हजार मतांनी विजय मिळवला. या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारास चांगली लढतही देता आलेली नाही.

कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण व मुंब्रा कळवा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील मुंब्रा-कळवा हा जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ सोडला तर बाकी सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये हिंदुत्ववादी मतदारांचा प्रभाव आहे. त्यामुळेच चार मतदारसंघात भाजप-शिवसेनेचे आमदार आहेत. तर कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील हे आमदार असले तरी ते शिवसेनेच्या उमेदवाराला अगदी थोडक्या मतांनी पराभूत करून निवडून आले. शिवाय मनसेही पूर्वीपासून हिंदुत्वाशी जवळीक ठेवणारा असाच राहिला आहे. आता तर मनसेनेही हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे. कल्याण डोंबिवली ते अंबरनाथ, उल्हासनगर या पट्ट्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हिंदुत्वाचा प्रभाव आहे. कल्याण-डोंबिवली तर संघाचा बालेकिल्ला मानला जातो.

अशा हिंदुत्ववादी विचारांचा पगडा असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या मदतीशिवाय श्रीकांत शिंदे यांचा विजय शक्य नाही. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेना-भाजप अशी लढत झाल्यास श्रीकांत शिंदे यांचे भवितव्य धोक्यात येणार हे स्पष्ट आहे. या उलट आतापर्यंत दोनवेळा खासदार झालेले श्रीकांत शिंदे हे भाजपसोबत जाऊन तिसऱ्यावेळीही खासदार होतील. पुढच्या निवडणुकीत खासदार झाल्यावर त्यावेळीही देशात भाजप सरकारच सत्तेवर येईल आणि त्यावेळी श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही संधी मिळेल असे समीकरण मांडण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे-कल्याण या आपल्या प्रभावाखालील भागात हिंदुत्ववादी मतदारांचे गणित आणि त्यातून खासदारपुत्राचे राजकीय भवितव्य यांचाही विचार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करताना केल्याचे समजते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde more worried about his son mp dr shrikant shinde carrier print politics news asj
First published on: 22-06-2022 at 12:25 IST