उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा लोकसभा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिंदेसेनेतून बिनविरोध निवड झाली आहे. आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणाऱ्या सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ राबवून उद्धव ठाकरेंच्या खासदार – आमदारांना स्वत:च्या पक्षात सामील करून घेतले. या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकार व राज्यातील महायुती सरकारमध्ये असलेली त्यांची स्थिती आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

एकनाथ शिंदे यांचे पुढील लक्ष्य उद्धव ठाकरेंचे आमदार असतील अशी चर्चा आहे. तसेच ‘ऑपरेशन टायगर’चा वापर भाजपाला लोकसभेत दोन-तृतियांश खासदारांचे समर्थन मिळावे म्हणून करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपाला महत्त्वाचे घटना दुरूस्ती विधेयक संसदेत मंजूर करून घ्यायचे आहेत. त्यासाठी दोन-तृतियांश खासदारांचे समर्थन आवश्यक आहे. त्यात मतदारसंघांची पुनर्रचना आणि ‘एक देश एक निवडणूक’ या विधेयकांचा समावेश आहे, असे म्हटले जात आहे.

महायुतीतील काही नेत्यांच्या मते, एकनाथ शिंदे यांनी त्यांचे महत्त्व वाढवण्यासाठी रणनीति तयार केली आहे. २०२९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांना कडवे आव्हान देण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांचा पक्ष वाढवत आहेत.

भाजपा मधील एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले, “कॅडर-बेस्ड पार्टीत निर्णय सहमतीने घेतले जातात. पण, एखाद्या महत्त्वाकांक्षी नेत्याने त्याला मिळणारा पाठिंबा वाढवणे नैसर्गिक आहे. हे कोणत्याही पक्षात होऊ शकते, भाजपाही अपवाद नाही. ऑपरेशन टायगर अंतर्गत खासदारांच्या पक्ष प्रवेशाला भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून संमती मिळाली होती. परंतु, आमदारांचे पक्षांतर का होणार आहे, हा प्रश्न आहे. शिंदे हे त्यांचा पक्ष स्वत: चालवतात. त्यामुळे २०२९ ला समोर ठेवून पक्षाचा विस्तार करण्याचा त्यांना अधिकार आहे. याचप्रमाणे भाजपाही स्वत:चा विस्तार करेल.” दरम्यान, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांचे मुंबई ते नागपूर विमानातील फोटो प्रकाशित झाल्याच्या काही दिवसांतच सचिन अहिर यांचे पक्षांतर झाल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे अन् मुख्यमंत्री फडणवीसांचा एकाच विमानाने प्रवास

एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला शह देण्याचा प्रयत्न?

भाजपाचे राज्यात राजकीय व्यवस्थापन करणाऱ्या एका नेत्याने म्हटले, “ऑपरेशन टायगर हे लोकसभेत मतदारसंघांची पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षण लागू करण्यासाठी राबवण्यात आल्याचे आम्हाला कळवण्यात आले. याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम होतो हा वेगळा मुद्दा आहे. आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत.”

विरोधी पक्षातील आमदारांना महायुतीत घेऊ नका, असे आवाहन भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाच्या नेतृत्वाला केले आहे. “महत्त्वाच्या विधेयकांसाठी शिवसेनेचे खासदार आमच्या सोबत आले, मी त्यांचे स्वागत करतो. पण, आपल्याला विरोधी पक्षातील आमदारांची विधानसभेत आणि विधानपरिषदेत गरज काय आहे?” असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

विधानसभेत एकूण २८८ सदस्य संख्येपैकी महायुतीचे २४० आमदार आहेत. तर महाविकास आघाडीचे ४६ आमदार आहेत. विधानपरिषदेत एकूण ७८ सदस्यसंख्येपैकी महायुतीचे ६२ तर महाविकास आघाडीचे १२ आमदार आहेत.

एकनाथ शिंदेंच्या सेनेतील एका नेत्याने म्हटले, “शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे हे एक महत्त्वाकांक्षी व्यक्ती आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पद न मिळाल्याने ते नाराज आहेत. आता भाजपा हाय कमांडच्या नजरेत भरण्यासाठी जे काही शक्य असेल ते एकनाथ शिंदे करतील. २०२९ मध्ये महत्त्वाचे पद मिळवण्यासाठी शिंदे महत्त्वाकांक्षी आहेत.”

“ऑपरेशन टायगर नव्हते, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस होते”, कोण म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी शिंदे पक्षाचा विस्तार करत आहेत, असे विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी आरोप केला की, “हे ऑपरेशन टायगर नव्हते, तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस होते. २०२९ चे नियोजन करून देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्यासाठी हे केले गेले.”

महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. “आपण काय करतोय, कुठ पर्यंत जातोय, याला काही मर्यादा आहेत का नाही, प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही विकले जाणाऱ्यांचा आहे, देहविक्रीला हे तयार असतील तर गिऱ्हाईक आहेतच, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. इतिहासात ज्या-ज्या वेळी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांच्याच पक्षात नवे विरोधक निर्माण झाले. ही प्रक्रिया भाजपमध्ये सुरू झाली आहे.”

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध कसे?

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांमध्ये मागील काही वर्षांत अनेकदा उतार-चढाव आले. २०१४ ते २०१९ दरम्यान एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये ‘लो-प्रोफाइल’ मंत्री होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी असलेली युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केली. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसह बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद घेण्यासाठी भाग पाडण्यात आले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर समीकरण बदलले. भाजपाला १३२, शिंदेसेनेला ५७ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. त्यामुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले. तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पद न मिळाल्याने घुसमट होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभेत फटका बसल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यामुळे महायुतीचा विधानसभेत दणदणीत विजय झाला असा दावा शिंदेसेनेच्या नेत्यांकडून वारंवार केला जातो.