Eknath Shinde Operation Tiger BJP Break : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीला भाजपाने ब्रेक लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी सहा खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती. या खासदारांना आपल्या गोटात खेचून केंद्रातील दोन मंत्रिपदे आपल्या पदरात पाडून घेण्याची शिंदे यांची तयारी होती. मात्र, या सगळ्याला भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी अचानक रेड सिग्नल दिल्याचे सांगितले जात आहे. नेमकी काय असू शकतात यामागची कारणे? त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

ठाकरे-पवारांचे प्रत्येकी सहा खासदार फुटणार?

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच गेल्या महिन्यात १७ मार्चला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजधानी दिल्लीचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा रंगली. त्याद्वारे शिंदे गटाकडून ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाचे प्रत्येकी सहा खासदार फोडले जाणार असल्याची कुजबुज सुरू झाली. मात्र, आमचा एकही खासदार फुटणार नाही, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. दुसरीकडे शरद पवार यांच्या गटातील सहा खासदार फुटणार असल्याचा दावाही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी फेटाळून लावला.

शिंदे गटाची नेमकी रणनीती काय?

ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीमागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी रणनीती होती. शिंदे गटाला केंद्रात आणखी दोन मंत्रिपदे हवी असून, त्यासाठी खुद्द शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे यांची नावे चर्चेत होती. त्यामुळे ही दोन्ही मंत्रिपदे मिळवण्यासाठी शिंदे गटाने ठाकरे आणि पवारांचे प्रत्येकी सहा खासदार फोडण्याची तयारी दर्शवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये भाजपाकडे सर्वाधिक २४० खासदार आहेत. त्यांना चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीचे १६ आणि नितीश कुमार यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या १२ खासदारांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय शिंदे गटाच्या सात खासदारांचाही केंद्र सरकारला पाठिंबा आहे. यादरम्यान शिवसेना ठाकरे गटासह शरद पवार गटाचे प्रत्येकी सहा असे १२ खासदार जर शिंदे गटाच्या गळाला लागले असते, तर त्यांच्या खासदारांची संख्या १९ पर्यंत पोहोचली असती. मात्र, भाजपाने सध्या तरी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीला रेड सिग्नल दिला आहे. मागील दिल्ली भेटीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना भेट दिली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

आणखी वाचा : भाजपाला मदत करणारे ७ नगरसेवक निलंबित; शिंदे गटातील नेत्याला अटक, काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…

भाजपाचा रेड सिग्नल नेमका कशासाठी?

सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीच्या अंतर्गत विरोधकांचे खासदार फोडणार असले तरीही त्यावर नियंत्रण मात्र भाजपाचेच आहे. केंद्रात पुरेसे संख्याबळ असल्यामुळे भाजपाला सध्याच्या परिस्थितीत दुसरे पक्ष फोडण्याची तशी गरज नाही. एकसंध शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली होती आणि त्यामुळेच पक्षातील नेते शिंदे यांच्या रणनीतीशी सहमत नसल्याचे सांगितले जात आहे. भाजपातील अंतर्गत सूत्रांच्या मते, ठाकरे आणि शरद पवार गटाचे खासदार शिवसेनेत सामील झाल्यास शिंदे यांचे दिल्लीसह महाराष्ट्रातील राजकीय वजन आणखीनच वाढेल. त्याच जोरावर ते राज्यातील भाजपाच्या नेत्यांवर दबावतंत्राचा वापर करू शकतात. यापूर्वीही शिंदे यांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून भाजपातील नेत्यांवर दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या पदांसाठी त्यांनी ही राजकीय खेळी खेळली होती. हीच बाब लक्षात आल्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीला ब्रेक लावल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : शिंदेंच्या शिलेदाराची आमदारकी धोक्यात? एकनाथ खडसेंचा भाजपावर गंभीर आरोप; वाचा ५ घडामोडी…

भाजपाला नेमकी कशाची भीती?

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी टोकाचे राजकीय शत्रुत्व घेण्याची भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची अजिबात इच्छा नाही. जर शरद पवार यांच्या गटाच्या खासदारांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये येण्याची इच्छा असेल, तर त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील व्हावे आणि त्यानंतरच केंद्र सरकारला पाठिंबा द्यावा, असे भाजपाच्या केंद्रातील पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, सध्याच्या घडीला भाजपाला आपले केंद्रातील संख्याबळ वाढवण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यामुळे एखादा विरोधी पक्ष फोडण्यापेक्षा त्याचे राजकीय अस्तित्व ठेवून, आपल्या बरोबरच्या मित्रपक्षांना नियंत्रणात ठेवणे हे भाजपाला अधिक महत्त्वाचे वाटत असावे. याच कारणांमुळे भाजपाने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीला ब्रेक लावल्याचा अंदाज आहे. यादरम्यान भाजपाने शिंदे गटाच्या मोहिमेला ब्रेक लावला असला तरीही त्यांना केंद्रात आणखी दोन मंत्रिपदे दिली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.