आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिंदेसेनेचे जळगावातील काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा करत खासदार संजय राऊतांनी मोठी खळबळ उडवून दिली… अशोक खरातच्या बुवाबाजीत राज्यातील ३९ आमदार अडकल्याचा गंभीर आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीने केला… ठाकरे गटातील बडा नेता ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… मी कुठल्याही बाबाकडे जात नाही, तरीही मला मंत्रीपद मिळते, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले… बच्चू कडू हे नाव नसून तो एक ‘बिच्छू’ (विंचू) आहे, अशा जहाल शब्दांत भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांनी टीकेची झोड उठवली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिंदे गटात लवकरच मोठी फूट?
शिवसेना शिंदे गटात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त करत खासदार संजय राऊत यांनी जळगाव हा संभाव्य घडामोडींचे केंद्र ठरू शकतो, असे खळबळजनक विधान केले. जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता शिंदे गटातील तीन आमदार थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. “एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश होता. आता शिंदे गटात फूट पडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमच्याकडे ठोस माहिती आहे की, हे आमदार सध्या गिरीश महाजन यांच्या संपर्कात आहेत आणि योग्य वेळ येताच ते आपला राजकीय निर्णय जाहीर करतील,” असेही राऊत म्हणाले. त्यांच्या या दाव्यामुळे शिंदे गटात लवकरच मोठी फूट पडणार असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.
बुवाबाजीत ३९ आमदार अडकल्याचा आरोप
भोंदू अशोक खरातच्या बुवाबाजीत राज्यातील ३९ आमदार अडकल्याचा गंभीर आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीने केला. या सर्व आमदारांची यादी राज्य सरकारने तातडीने जाहीर करावी आणि त्यांचे राजीनामे घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. या आमदारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी राज्यभरात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. भोंदू बाबा अशोक खरात याच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांच्या अश्लील चित्रफिती मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यामुळे बळी पडलेल्या महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेला ठेच पोहोचली आहे. या चित्रफिती समाज माध्यमांतून तातडीने हटविण्याची कारवाई राज्य सरकारने करावी, असेही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे.
आणखी वाचा : ठाकरेंना आव्हान देणाऱ्या अन्नामलाईंना भाजपाने तिकीट नाकारलं? चर्चेचं कारण काय?
ठाकरेसेनेचा नेता शिंदे गटाच्या वाटेवर?
शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांची एक कथित ऑडिओ क्लीप समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. या ऑडिओ क्लीपमध्ये एक मुस्लीम कार्यकर्ता ‘साहब तुम शिंदेंकी शिवसेना मत जाओ’ अशी विनंती त्यांना करताना दिसत आहे. त्यावर ‘अभी तो मै गया नही, आगे वक्त वक्त की बात है’ असे उत्तर खासदार जाधव यांनी दिले आहे. त्यांच्या या उत्तराने ते ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याच्या चर्चेला हवा मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार जाधव हे गैरहजर राहिल्याची चर्चा होती. त्यातच दोन दिवसांपूर्वीच जाधव यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरेंचा निष्ठावान शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
रामदास आठवले यांच्या विधानाची चर्चा
मी कुठल्याही बाबाकडे जात नाही, तरीही मला मंत्रीपद मिळते, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. त्यांच्या या विधानाची सध्या समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे. रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या कार्यकारणी बैठक पुण्यात झाली. त्यानंतर आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘नाशिकचे खरात, त्याच्या चुकीमुळे गेले आहेत जेलच्या दारात, अशा ओळी सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खरात प्रकरणावर भाष्य केले. माझा कुठल्याही बाबावर विश्वास नाही, कुठल्याही बाबाकडे मी जात नाही. तरीही मला माझे पद, मंत्रीपद मिळत आहे. कोणीही भोंदू बाबांवर विश्वास ठेवू नये. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी आठवले यांनी मांडली.
भाजपा आमदाराची बच्चू कडूंवर जहरी टीका
बच्चू कडू हे नाव नसून तो एक ‘बिच्छू’ (विंचू) आहे, अशा जहाल शब्दांत भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांनी टीकेची झोड उठवली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजकीय वैमनस्यातून आपल्याला अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे पोलिसांत दिली. त्यांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणावरून सध्या दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बच्चू कडू यांनी या आरोपांचे खंडन केले असताना बच्चू कडू हे नाव नसून तो एक ‘बिच्छू’ (विंचू) आहे, अशा जहाल शब्दांत प्रवीण तायडे यांनी कडू यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
