आज दिवसभरातील राजकीय घडामोडी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ठाकरे गटाचे जालन्याचे जिल्हाप्रमुख उद्या शिंदेंच्या सेनेत जाणार प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली. अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा उद्याच्या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करणार असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला. रत्नागिरीतील जागा वाटपावरून भाजपा आणि शिंदेच्या सेनेतील वाद शिगेला पोहोचला. महायुतीचे सरकार टिकले तरच लाडकी बहीण योजना सुरू राहील, असा दावा आमदार नरहरी झिरवळ यांनी केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
संजय राऊतांसाठी एकनाथ शिंदेंचा फोन
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणातून ब्रेक घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ते उपचारासाठी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फोन करून संजय राऊतांच्या तब्येची विचारणा केली आहे. मंत्री उदय सामंत यांनी शिंदेंचा फोनवर बोलतानाचा व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. ‘राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मा. खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून प्रकृतीविषयी सविस्तर माहिती घेतली. साहेबांची ही सहृदयता आणि सर्वांप्रती असलेली आपुलकी हीच त्यांची खरी ओळख आहे’, असे सामंत यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं.
ठाकरेंचे जिल्हाप्रमुख उद्या शिंदेसेनेत?
शिवसेना ठाकरे गटाचे जालना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर उद्या (तारीख १२ नोव्हेंबर) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. खुद्द अंबेकर यांच्या निकटवर्तीयांनी त्यासंदर्भातील माहिती दिली आहे. बुधवारी शिंदे यांच्या उपस्थितीत जालना शहरात होणाऱ्या जाहीर सभेत अंबेकर यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. यापार्श्वभूमीवर अंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. परंतु त्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या शक्यतेचा स्पष्ट इन्कारही केलेला नाही. गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ अंबेकर शिवसेनेत आहेत. पक्षात फूट पडल्यानंतरही त्यांनी ठाकरेंशी निष्ठावान राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ते ठाकरे गटाची साथ सोडून आमदार खोतकर यांच्याबरोबर त्यांच्या पक्षात येण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा : Cancer Symptoms : ‘या’ चाचणीने ओळखता येणार कॅन्सरचा धोका; संशोधन काय सांगतं? तज्ज्ञांचा दावा काय?
अजित पवारांच्या अडचणी वाढणार?
पार्थ पवार भागीदार असलेल्या कंपनीच्या पुण्यातील जमीन खरेदी व्यवहारावरून विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोपांची राळ उठवली आहे. या प्रकरणात दाखल एफआयआरमध्ये पार्थ पवार यांचे नाव दाखल न केल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्या (बुधवार) सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणाचे आणखी खुलासे करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीदेखील दमानिया यांनी केली आहे. ‘विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०११ मध्ये सिंचन घोटाळ्यावर बोलले होते. अजित पवार चक्की पिसींग-पिसींग असे त्यांनी म्हटले होते. मात्र त्यांच्याबरोबरच फडणवीसांनी तीनदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे मला फडणवीसांकडून कोणतीही अपेक्षा नाही’, अशी टीकाही दमानिया यांनी केली आहे.
रत्नागिरीत भाजपा आणि शिंदेसेनेत जुंपली
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाची खुमखुमी मिटवण्याची आमची तयारी आहे, असे आव्हान भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहे. खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात उघडपणे विरोध सुरू केला आहे. पालकमंत्री सामंत यांनी महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढण्याचे सांगितले असले तरी जिल्ह्यात भाजपाला हे मान्य नाही. त्यातच शिवसेनेची खुम खुमी मिटवायची आमची तयारी आहे, असे प्रती आव्हान मंत्री नीतेश राणे यांनी दिल्याने हा वाद आणखीच विकोपाला जाण्याची शक्यता आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना एक जागा देतो, दोन जागा देतो, तसेच सुक्या धमक्या किंवा खुम खुमी कोणाला काढायची असेल तर आम्ही तयार आहोत, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : Donald Trump Tariff : भारतावरील टॅरिफ होणार रद्द? डोनाल्ड ट्रम्प कशामुळे नरमले? अमेरिकेत काय घडतंय?
लाडकी बहीण योजना बंद होणार? नरहरी झिरवळ काय म्हणाले?
राज्यातील महायुतीचे सरकार टिकले तरच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू राहील, अन्यथा गडबड होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ यांनी दिला आहे. सरकारला कोणतीही अडचण नाही; पण पुढे जाऊन नवीन सरकार हा निर्णय बदलू शकते, अशी स्पष्टोक्ती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा ऐन निवडणुकीच्या तोंडावर उघडकीस आला, याचा मतांवर परिणाम होणार नाही. निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार यांना विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. फळ देणाऱ्या झाडाला दगड मारले जातात. स्वार्थासाठी काहीजण अजित पवार यांना बदनाम करत आहेत’, असा आरोपही मंत्री झिरवळ यांनी केला आहे.
