Mumbai BMC Election 2026 : मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीतून त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईत सत्ताधारी महायुतीसमोर निर्माण केलेले आव्हान, भाजपाचे नेते अण्णामलाई यांच्या विधानावरून निर्माण झालेला वाद, मधल्या काळातील वादविवादानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपामधील संबंधांची सध्याची स्थिती, महायुती सरकारच्या विकासकामांचा लेखाजोखा, अशा विविध प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिली. त्याशिवाय मुंबईत महायुतीला सत्ता मिळाल्यास महापौर कोणाचा होणार? याबाबतही शिंदे यांनी भाष्य केले. त्याविषयीचा हा आढावा…
प्रश्न: ठाकरे बंधूंच्या अलीकडील मुंबईतील संयुक्त सभेला मोठी गर्दी जमली होती. तुमच्यासाठी हे मोठे आव्हान ठरेल का?
ठाकरे बंधूंच्या युतीमुळे आमच्यासमोर कोणतेही आव्हान निर्माण झाले नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. एखाद्या सभेला मोठी गर्दी जमली म्हणजे त्याचा थेट मतदानात फायदा होतोच, असे नाही. राज ठाकरे चांगले प्रवक्ते असल्याने त्यांच्या सभांना नेहमीच मोठी गर्दी होते; पण त्या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होणे महत्त्वाचे असते. राज्यातील मतदार सुज्ञ असून, ते फक्त विकासकामे आणि सकारात्मक कामगिरी पाहूनच मतदान करतात. गेल्या साडेतीन वर्षांत मुंबईत झपाट्याने विकासकामे सुरू आहेत. मेट्रोचे जाळे विस्तारत असून, कोस्टल रोड प्रकल्प सुरू झाला आहे. त्याशिवाय अनेक ठिकाणी सिमेंट-काँक्रीटचे रस्ते बांधले जात आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती महायुतीसाठी किंवा माझ्यासाठी आव्हान नाही. त्याउलट त्यांच्यासाठीच ही अस्तित्वाची लढाई आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
प्रश्न : कोस्टल रोडचे काम महायुतीच्या नव्हे, तर आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले, असे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे म्हणतात. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय?
केंद्रात आणि राज्यात भाजपा-शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार सत्तेवर आल्यानंतरच कोस्टल रोड प्रकल्पाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मुंबई महानगरपालिका ही केवळ या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा होती. १९९० च्या दशकात मंजुरी मिळूनही हा प्रकल्प आधी का सुरू झाला नाही? कारण- त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारची परवानगी आवश्यक होती. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी कोस्टल रोडच्या कामाला गती दिली. केंद्राकडून आवश्यक त्या सर्व मंजुऱ्या मिळवून निधी उपलब्ध केला. जर हे काम आधीच सुरू होऊ शकले असते, तर महापालिकेने ते का केले नाही? हे दावे केवळ लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी केले जात आहेत आणि त्यात काहीही तथ्य नाही. महाविकास आघाडीच्या काळात अनेक प्रकल्प रखडले होते. २०२२ मध्ये जेव्हा आम्ही पुन्हा सत्तेवर आलो आणि मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा मी ते सर्व प्रकल्प पुन्हा सुरू केले, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा : झेडपी-पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर; भाजपातून ५४ जणांची हकालपट्टी, महायुतीत टोकाचे वाद; वाचा ५ घडामोडी…
प्रश्न: ठाकरे बंधू सध्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर प्रचार करीत आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून हिरावून घेतली जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रत्येक वेळी निवडणूक आली की- त्यांना मराठीचा मुद्दा आठवतो. निवडणुका संपल्या की, हा मुद्दा गुंडाळून ठेवला जातो. त्यांच्यासाठी मराठी अस्मिता हा सोईचा विषय आहे. जेव्हा गरज असते तेव्हा ते त्याचा वापर करतात आणि उद्देश यशस्वी झाल्यानंतर ते या गोष्टी विसरून जातात. लोकांना भावनिक करून मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंकडून मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, असा अपप्रचार त्यांनी जाणीवपूर्वक केला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळे करू शकत नाही. हीच शिवसेनेची (शिंदे गट) ठाम भूमिका आहे, असे शिंदे म्हणाले.
प्रश्न : भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांमुळे मराठी अस्मितेला धक्का बसल्याचा अनेकांचा समज आहे. त्यांच्या विधानांमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. त्याबाबत तुमचे मत काय?
“कृपाशंकर सिंह म्हणजे संपूर्ण भाजपा नाही. त्याचप्रमाणे अण्णामलाई यांच्या विधानालाही मुंबईत भाजपाचे नेते जास्त महत्त्व देत नाहीत. तरीही त्यांनी केलेले विधान चुकीचेच होते, असे माझे ठाम मत आहे. त्याबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मी तक्रार केलेली आहे. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, असे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. विरोधकांनी उगाच राजकारण करू नये, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
प्रश्न: अंबरनाथ नगर परिषदेत भाजपाने काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. गणेश नाईक यांनीही तुमच्यावर टीका करणे सुरूच ठेवले आहे. नवी मुंबईसारख्या महापालिकांमध्ये तुम्ही एकमेकांविरुद्ध कसे लढत आहात?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी असतात. त्यामुळे त्या निवडणुकांमध्ये युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरून घेतला जातो. युतीची चर्चा फिस्कटल्यानंतरच महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. राहिला प्रश्न विधानांचा; तर एखादा नेता बोलला म्हणजे तो पक्षच माझ्या विरोधात बोलतोय, असे होत नाही. मला गणेश नाईक यांना उत्तर देण्याची गरज नाही. हा विषय मी आधीच मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला आहे आणि आमच्या पक्षाच्या मंत्र्यांनीही तसेच केले आहे. भाजपाच्या नियम आणि धोरणांनुसार ते या प्रकरणाचा तपास करतील, असे शिंदे यांनी सांगितले.
प्रश्न: शिवसेना आणि भाजपामध्ये सर्व काही आलबेल आहे का? कारण- निवडणुकांपूर्वी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार आणि एकमेकांचे नेते फोडण्याचे आरोप यांमुळे दोन्ही पक्षांत तणाव दिसून येत होता.
निश्चितच महायुतीतील तिन्ही मित्रपक्षांत समन्वय आहे. नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकांत एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यावरून आमचे नेते नाराज झाले होते; परंतु चर्चेद्वारे हा प्रश्न सोडविण्यात आम्हाला यश आले. आमची युती एका विशिष्ट विचारधारेवर आधारित आहे. स्थानिक पातळीवर काही समस्या नक्कीच निर्माण होतात; पण त्या सातत्यपूर्ण संवादातून सुटतात, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
प्रश्न: महायुतीला मुंबईत सत्ता मिळाल्यास महापौर कोणाचा? भाजपाचा की शिंदे गटाचा?
गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिका एकसंध शिवसेनेच्या ताब्यात आहे. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला विजय मिळाल्यास महापौर कोणाचा होईल, असा प्रश्न काहींना पडला आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमचे पहिले उद्दिष्ट निवडणूक जिंकण्याचे आहे. महापौरपदाचा निर्णय हा निकालानंतर घेण्यात येईल; पण मुंबईत महायुतीचाच मराठी महापौर विराजमान होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
हेही वाचा : ठाकरे बंधूंनी भाजपाला कसे कोंडीत पकडले? मुंबईतील प्रचारसभेत नेमके काय घडले?
प्रश्न: तुम्ही तुमच्या विरोधकांवर (ठाकरे गट) उद्योगपतींबाबत दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला. त्याचा नेमका अर्थ काय?
सत्तेची गरज असताना हेच लोक उद्योगपतींची आठवण काढतात आणि सत्तेबाहेर गेल्यावर राजकीय सोईसाठी त्यांच्यावर हल्ले करतात. धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि नवी मुंबई विमानतळाचे काम सत्तेत असताना अदानी समूहाला कोणी दिले? मुंबईतील मोकळी मैदाने आणि जमिनी कोणाच्या काळात दिल्या गेल्या? दोन वर्षांपूर्वी कलानगरला त्यांना भेटायला कोण गेले होते? तुम्ही जाहीरपणे उद्योगपतींवर टीका करता आणि रात्री त्यांना जेवायला घरी बोलावता. तुमची मुले त्यांच्या लग्नात नाचतात. हा दुटप्पीपणा आता सर्वांना स्पष्टपणे दिसत आहे, असा टोला शिंदेंनी ठाकरे बंधूंना लगावला.
प्रश्न: महायुती सरकारने मुंबईसाठी नेमके काय केले आहे?
मुंबईबाबत आम्ही नुसती पोकळ बडबड करत नाही. गेल्या वर्षभरात आम्ही २० हजार इमारतींना वास्तव्य प्रमाणपत्र दिले, मुंबई ‘पगडीमुक्त’ करण्याचा निर्णय घेतला, फनेल झोनमधील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पुन्हा सुरू केले आणि १७ क्लस्टर विकास प्रकल्पांना मंजुरी दिली, असे शिंदे यांनी सांगितले. महायुतीने १० ते १२ हजार गिरणी कामगारांना हक्काची घरे दिली आहेत. भविष्यात आणखी एक लाख कामगारांना घरे दिली जातील. आम्ही स्वतःची घरे भरत नसून, लोकांसाठी घरे बांधतो, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
