Maharashtra Politics Top 5 News : सातारा जिल्ह्यात भाजपाला जाणून बुजून एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला, अशा शब्दांत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया दिली… काँग्रेसनंतर शरद पवार यांच्या पक्षानेही विधानपरिषदेसाठी नाव सूचवल्याने उद्धव ठाकरे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, अशी चर्चा सुरू झाली… आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या प्रकाशकांना सुरक्षा द्या, अशी मागणी काँग्रेसने केली… भविष्यात बारामतीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ लढाई होऊ शकते, असे संकेत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले… मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालयाच्या मागणीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
भाजपाला एकटे पाडण्याचा शिंदेसेनेचा प्रयत्न?
सातारा जिल्ह्यात भाजपाला जाणून बुजून एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला, अशा शब्दांत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात भाजपा विरुद्ध शिंदेसेना असा राजकीय सामना पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील सभेतून भाजपाला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पातळी सोडून राजकारण करण्यात आले. कोणीही कितीही दबावाचे राजकारण करू द्या, पण तुम्ही घाबरू न जाता निर्धाराने लढा, असा आदेश शिंदे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना दिला होता. त्याबाबत माध्यमांनी शिवेंद्रराजे यांना प्रश्न विचारला असता, जिल्हा परिषद निवडणूक वेगवेगळी लढली असली, तरी आपण राज्यात युती म्हणून एकत्र आहोत. जिल्हा परिषदेत भाजपाचे २८ सदस्य असूनही अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीत आम्हाला जाणूनबुजून बाजूला ठेवण्यात येत होते, असे शिवेंद्रराजे म्हणाले. शिंदे हे युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असून, आमचे नेते आहेत. जिल्हा परिषद निवडीचा विषय आता संपला असून, आता चांगले काम करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात?
राज्यात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून त्याकरिता सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एकच उमेदवार निवडून येण्याची शक्यता असल्याने तो कोण असेल याबाबत राजकीय वर्तुळाच चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याचीच उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. ठाकरे गटाने या जागेवर अंबादास दानवे यांचे नाव सूचवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यादरम्यान काँग्रेसनंतर आता शरद पवार यांच्या पक्षानेही उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी यासाठीचा आग्रह धरला आहे. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन काँग्रेसची भूमिका मांडली, तर विजय वडेट्टीवार यांनी ठाकरे यांच्याच नावाला समर्थन दिले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करीत उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेची निवडणूक लढवावी, अशी विनंती केली. त्यामुळे ठाकरे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा : महिला आरक्षणाचा आग्रह धरणाऱ्या भाजपात ‘ताईंचे’ प्रतिनिधित्व किती? आकडेवारी काय सांगते?
शिंदेसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल होणार?
शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशकांना दिलेल्या धमकीमुळे राज्यात मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच प्रकाशक प्रशांत आंबी यांनी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. या संदर्भात आपली भूमिका मांडताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वास्तव चित्रण गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकात केले आहे. त्याचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी धमकी दिली आहे. छत्रपती शिवरायांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी पानसरे यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले. अशा महान विचारवंताचा धर्मांध शक्तींनी खून केला, त्यांच्या गुन्हेगारांना अजूनही शिक्षा झालेली नाही. असे असतानाही सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने त्यांच्याच हत्येचा दाखला देत इतरांना धमक्या देणे लज्जास्पद आहे. या आमदाराविरोधात तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.
बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ लढत?
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचे संकेत दिले. भविष्यात बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबातील सदस्यांमधील थेट राजकीय सामना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बारामतीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. जय पवार यांनी २०१९ मध्ये उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सांगितले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना ‘कार्यकर्त्यांची आणि पक्षाची इच्छा महत्त्वाची असते. प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर उमेदवारी ठरवेल. जर २०२९ मध्ये जय पवार उमेदवार असतील, तर आमच्या पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते,’ असे रोहित यांनी स्पष्ट केले. भावनिक दृष्टिकोनातून आम्ही या पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकींसाठी काम केले, पण पुढील निवडणुकीत सर्वजण आपापल्या पक्षाच्या बाजूने उभे राहतील, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोडणार अजित पवारांचा विक्रम?
जरांगे यांच्या मागणीवर मंत्री विखेंची प्रतिक्रिया
मराठा समाजाचे प्रश्न सोडवून त्यांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला हवे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीबद्दल उघडपणे नाराजी बोलून दाखवली. तसेच, विखे यांनी उपसमितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या मागणीवर मंत्री विखे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझ्या अध्यक्षतेखालील उपसमिती आपले काम करत आहे. आतापर्यंत ५४ हजार मराठा समाज बांधवांना कुणबी दाखले देण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल आम्ही गेल्या आठवड्यातच मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालयाची आवश्यकता नाही, असे मंत्री विखे यांनी स्पष्ट केले. जरांगे पाटील यांच्या मनात कोणी तरी माझ्याबद्दल गैरसमज पसरवत आहे. मी स्वतः त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहे, असेही ते म्हणाले.
