महाराष्ट्रातील आजच्या राजकीय बातम्या : राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा जोमात सुरू असतानाच शिंदेसेनेतील प्रभावशाली नेत्याने पुन्हा ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला… शिंदे गटातील दोन खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली… अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ठाकरे गटाने दान केलेली २५ किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता झाल्याच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली… खाकी वर्दीतील अधिकारी की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने नांगरे पाटील यांच्यावर टीकेचा भडिमार केला… शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सहा खासदारांना एकनाथ शिंदे नक्कीच निवडून आणतील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला… या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
कोकणात शिंदेसेनेला मोठा धक्का
राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा जोमात सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कोकणात मोठा धक्का बसला. दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेसेनेत गेलेले ज्येष्ठ नेते बाळा पावसकर हे पुन्हा स्वगृही परतले. माजी आमदार व जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पावसकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तळ कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग आणि कुडाळ परिसरातील स्थानिक राजकारणात पावसकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेची पिछेहाट होत असताना त्यांच्या पक्ष प्रवेशाने ठाकरेंना बळ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे- कोकणात आपली पाळेमुळे रोवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान- ठाकरे गटाची मोट पुन्हा बांधण्यात पावसकर पुढाकार घेणार असल्याची माहिती आहे. तसेच जिल्ह्याचा राजकारणात वैभव नाईक यांनाही ते साथ देणार असल्याची चर्चा आहे.
शिंदेसेनेतील दोघांना केंद्रात मंत्रिपद?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटातील सहा खासदारांनी नुकताच शिंदेसेनेचा धनुषबाण हाती घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा केंद्रातील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा आहे. त्यातच हे सहा खासदार शिंदेसेनेत सामील झाल्यामुळे आघाडीचे केंद्रातील संख्याबळही वाढले आहे. त्यामुळे बक्षीस मिळून शिंदेसेनेला केंद्रात दोन मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्याबरोबर परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे, तर शिंदेसेनेचे मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केवळ आयुष खाते राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या चर्चांना राज्यातील भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांनी कुठलाही दुजोरा दिलेला नाही.
संजय राऊतांच्या आरोपांमुळे खळबळ
अयोध्येतील राम मंदिराला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच ठाकरे गटाने राम मंदिरासाठी दान केलेल्या चांदीच्या विटा बेपत्ता झाल्याचा आरोप केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंनी राम मंदिराला दिलेली चांदीची वीट आणि एक कोटी रुपये कुठे आहेत? असा सवाल उपस्थित करत याबाबत मंदिर ट्रस्टकडून अद्याप कोणतीही पावती किंवा माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणणारे मंदिरातून चोरी करत आहेत. दानपेटीतून कोट्यवधी रुपये चोरी करत आहेत. हा चोरीचा पैसा राजकारणात येतो आणि त्याच पैशांनी खासदार आणि पक्ष विकत घेतले जात, अशी टीका संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. त्यामुळे भाजपाकडून त्यांच्या आरोपांना काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नांगरे पाटील यांच्यावर काँग्रेसची टीका
ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून बदली होताच नवीन वाद उद्भवला आहे. सकल हिंदू समाजाच्या संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी गौरवोद्गार काढल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून ही चित्रफित शेअर करत नांगरे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. भारतीय संविधानाची शपथ घेऊन, सर्व नागरिकांना समान वागणूक देण्याची जबाबदारी स्वीकारून एक आयपीएस अधिकारी सेवेत प्रवेश करतो. त्याची ओळख कोणत्याही धर्म, जात, पक्ष किंवा विचारधारेशी नसते. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर जाऊन संघ, हिंदुत्व आणि डॉ. हेडगेवार यांचे गौरवगान करताना नांगरे पाटील यांचे भाषण पाहिल्यानंतर एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. ते संविधानाचे अधिकारी म्हणून बोलत होते की एका विशिष्ट विचारधारेचे प्रतिनिधी म्हणून? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. खाकी वर्दीतील अधिकारी की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर याचे उत्तर द्यावे, असेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले.
“सहा खासदारांना शिंदे पुन्हा निवडून आणतील”
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सहा खासदारांना एकनाथ शिंदे नक्कीच निवडून आणतील, असा विश्वास शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. ठाकरे गटातील फुटीर सहा खासदारांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर यांचा या खासदारांत समावेश आहे. त्यानंतर ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. आता या खासदारांचे पुढील राजकीय भवितव्य काय, असा प्रश्न चर्चेत असताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हे खासदार नक्कीच निवडून येतील, असेही ते म्हणाले. उदय सामंत यांनी अमरावती येथे शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख, प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. सामंत यांच्या विधानाची सध्या समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.
