आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानंतर शिंदेसेनेत आणखी एक पक्ष विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… शिवसेना ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार पक्षनेतृत्वावर प्रचंड नाराज असल्याचे वृत्त झी २४ तासने सूत्रांच्या हवाल्याने दिले… सत्ता आणि पैशाच्या मस्तीत भाजपाने महाराष्ट्रात लोकशाहीचा लिलाव मांडला असल्याची काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली… जगातील युद्धजन्य परिस्थिती निवळताच भारताची अर्थव्यवस्था वेगाने झेप घेईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला… काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिंदेसेनेत आणखी एक पक्ष विलीन होणार?
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी आपला पक्ष शिंदेसेनेत विलीन केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बक्षीस म्हणून विधानपरिषदेची उमेदवारी दिली. या राजकीय घडामोडीनंतर आता आणखी एक पक्ष शिंदे गटात विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीचे (बविआ) प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना आपला पक्ष शिंदेसेनेत विलीन करण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बविआला शिंदे गटात विलीन केल्यास विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ठाणे-पालघर मतदारसंघातून माजी आमदार क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी दिली जाईल, अशी ऑफरही शिंदे यांनी दिल्याचे समजते. याबाबत बविआचे अध्यक्ष व माजी आमदार हितेंद्र ठाकूर व माजी आमदार क्षितीज ठाकूर यांच्याशी संपर्क केला असता कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही, त्यामुळे हा पक्ष शिंदेसेनेत विलीन होणार की त्यासंदर्भातील चर्चा हवेतच विरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेना ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता?
माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही आमदार आणि खासदार प्रचंड नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने त्या संदर्भातील वृत्त दिले आहे. पक्षनेतृत्वाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ठाकरे गटातील नेते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार पक्ष सोडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ बाबतही अनेक कयास बांधले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला मोठे अपयश आले होते. त्यानंतर पक्षातील काही महत्वाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची कास धरली होती. त्यातच आता ठाकरे गटात पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा सुरू झाल्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कथित नाराज नेत्यांची कशी समजूत काढणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विजय वडेट्टीवार यांची भाजपावर टीका
सत्ता आणि पैशाच्या मस्तीत भाजपाने महाराष्ट्रात लोकशाहीचा लिलाव मांडला आहे, अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे २३ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ असून, त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे आमिष दाखवून भाजपाने फोडल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. काँग्रेसच्या नगरसेवकांना पाच लाख रुपयांचा अॅडव्हान्स देण्यात आला असून, काँग्रेस जितके देईल त्याच्या दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवले जात आहे. यासंदर्भातील पुरावे आमच्याकडे असून योग्यवेळी ते समोर आणले जातील, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. या प्रकरणातील संबंधित लोकप्रतिनिधींविरोधात व्हीप जारी करून त्यांना अपात्र ठरविण्याची कायदेशीर प्रक्रिया काँग्रेसकडून सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात भाजपची सत्ता नसती, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्षांतराची हिंमत कोणी केली नसती, अशी टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
जगातील युद्धजन्य परिस्थिती निवळताच भारताची अर्थव्यवस्था वेगाने झेप घेईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाची नोंद घेणाऱ्या ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे मुखमंत्र्यांच्या हस्ते झाले. या विशेषांकामध्ये मोदी सरकारचे १२ वर्षांतील महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि विविध क्षेत्रांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात आला. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्याचे संपादन केले आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित आज जगातील जवळपास प्रत्येक देश, मग तो राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिका असो, रशिया, इस्रायल, इराण किंवा युरोपीय राष्ट्रे असो, भारत आणि मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा करत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्या असल्या तरी, मोदींच्या नेतृत्वाखाली भारत अत्यंत भक्कम आहे, असा विश्वास जगभरचे उद्योजक व्यक्त करत आहेत. ही परिस्थिती निवळताच भारताची अर्थव्यवस्था वेगाने झेप घेईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.
सपकाळ यांच्या टीकेचा शिंदेंकडून समाचार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला. विरोधक पंतप्रधान मोदींवर आरोप करत आहेत, पण मोदीजी खरे धुरंधर आहेत, त्यांच्यावर टीका करणारे हे दलिंदर आहेत, अशा शब्दात शिंदे यांनी सपकाळ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. हर्षवर्धन सपकाळ हे एक-दीड वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत, तर नरेंद्र मोदी हे आधी मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान म्हणून काम करत आहेत, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. त्यांचा १२ वर्षांचा कार्यकाळ हा केवळ सत्तेचा प्रवास नसून राष्ट्रसेवेच्या अखंड तपश्चर्येचा आदर्श आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे आणि देशाचे प्रधानमंत्री म्हणून सलग १२ वर्षे अशी २५ वर्षांची त्यांची सार्वजनिक जीवनातील कारकीर्द देशाच्या राजकीय इतिहासात प्रेरणादायी ठरली आहे. निष्कलंक कारकीर्द, अथक परिश्रम आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.
