आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिवसेना शिंदे गटाच्या अकोल्यातील प्रभावशाली नेत्याने आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला… शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बडा नेता भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत आदित्य ठाकरे यांना उद्देशून केलेल्या विधानावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला… मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारसंघ फेररचनेच्या विधेयकावरून केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले… काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघ फेररचना विधेयकावरून संसदेत सत्ताधाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळून आला. शिंदेसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला. पक्षातील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या स्वार्थी आणि त्रासदायक वर्तनाला कंटाळून आपण हा निर्णय घेतला असल्याचे नवले यांनी सांगितले. अश्विन नवले हे अकोल्यातील प्रभावशाली नेते मानले जातात. शिंदे यांच्या आदेशानुसारच त्यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडे अकोला पश्चिम, मूर्तिजापूर आणि अकोट या तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अश्विन नवले यांनी राजीनामा देताना भविष्यात कोणत्या पक्षात जाणार किंवा त्यांची राजकीय भूमिका काय असेल, याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. सध्या आपण फक्त समाजसेवक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपाच्या वाटेवर?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तनपुरे मनाने आमच्याबरोबर जोडले गेल्यास आनंदच होईल, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्याने या चर्चेला आणखीनच हवा मिळाली आहे. भाजपा नेत्यांनी व्यक्त केलेल्या थेट प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या विनंतीला मान देऊन तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती. यादरम्यान पोटनिवडणुकीच्या प्रचारानिमित्त राहुरीमध्ये आलेल्या रवींद्र चव्हाण यांनी जाहीर सभा घेतली. या सभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी तनपुरे मनाने आमच्याबरोबर आले तर त्यांचे आनंदच होईल असे सांगितले. त्यामुळे तनपुरे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.
आणखी वाचा : विधेयक तर मांडले, पण मंजूर कसे होणार? बहुमतासाठी जादूई आकडा किती? भाजपाचे टेन्शन का वाढले?
संजय राऊत यांचा भाजपावर संताप
संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांच्यात गुरुवारी तीव्र शाब्दिक चकमक उडाली. सावंत यांनी ब्रिजभूषण सिंह आणि कुलदीप सेंगर यांचा उल्लेख करताच, दुबे यांनी आदित्य ठाकरेंचे नाव घेत गंभीर आरोप केले, ज्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला. निशिकांत दुबे यांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी तातडीने माफी मागायला हवी, अशी मागणी ठाकरे गटातील नेत्यांनी केली. याच मुद्याला हाताशी धरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर संताप व्यक्त केला. महाराष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ठाकरे कुटुंबावर भाजपाचे खासदार अशी टीका करत असतील, तर एक दिवस हे सर्व तुमच्यावरच उलटणार आहे, हे लक्षात ठेवा, अशा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
भाजपाच्या भूमिकेवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारसंघ फेररचनेच्या विधेयकावरून केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. महिला आरक्षणाला आमचा अजिबात विरोध नाही, उलट महिलांना आरक्षण मिळतंय ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे आज या दुरुस्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतर राजकीय पक्ष जो विरोध करत आहेत तो काही महिला आरक्षणाला विरोध नाही हे समजून घ्यावं. मुळात महाराष्ट्राला महिला आरक्षण इत्यादी बाहेरच्यांनी शिकवू पण नये कारण याच राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थात महिला आरक्षण आणलं. आमचा विरोध हा लोकसंख्येनुसार लोकसभा मतदारसंघांच्या होणाऱ्या पुनर्रचनेला आहे, असे राज यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले. घटनेतील कलम ८१ आणि ८२ सांगतात की लोकसभेतील जागा राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटल्या जातील. याचा सरळ अर्थ ज्या राज्यांनी शिक्षण, आरोग्य, महिलांचं सक्षमीकरण करून लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांच्या मेहनतीला शिक्षा आणि ज्यांनी वाट्टेल तशी लोकसंख्या वाढू दिली आणि संपूर्ण राज्यच्या राज्य बर्बाद केली त्या राज्यांचा संसदेतील टक्का वाढणार हा कुठला अजब न्याय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाची मोर्चेबांधणी; आदित्य ठाकरेंचे नाव घेताच संसदेत गोंधळ, वाचा ५ घडामोडी…
प्रणिती शिंदेंचा भाजपावर गंभीर आरोप
काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघ फेररचना विधेयकावरून संसदेत सत्ताधाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. महिला आरक्षणाच्या आडून जनगणना न करता मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करणे, हे केंद्र सरकारचे मोठे षडयंत्र आहे, पण आम्ही या सरकारची बेईमानी यशस्वी होऊ देणार नाही. हे कसले सरकार आहे, मतांसाठी आपल्याच देशातील महिलांच्या भावनांशी खेळतंय. लाज वाटली पाहिजे, या सरकारला. मोदी सरकारला खरंच महिलांना आरक्षण द्यायचे असते तर २०२३ मध्ये लागू करून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून त्याची अंमलबजावणी केली असती, अशा शब्दांत त्यांनी महिला मोदी सरकारवर हल्लाबोल केला. भाजपा सरकारने विविध कारणे सांगून तीन वर्षे हे विधेयक लागू केले नाही. मात्र, आता हेच सरकार अचानकपणे हे महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी एवढे आतूर कसे झाले, असा सवालही प्रणिती शिंदे यांनी केला.
